

सतत पाण्याचे दुर्भिक्ष असणारा जिल्हा म्हणून मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या दशकापासून पारंपारिक शेती पद्धतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे. २०१५ सालापासूनच गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती करण्याचा प्रयत्न उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातून यशस्वी होताना दिसत आहेत. विशेषतः तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगामी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून ‘मोत्यांची शेती’ करीत लाखों रुपयांची कमाई करीत कृषी अर्थकारणाला एक नवी दिशा दिली आहे. तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथील प्रगतिशील शेतकरी संजय नरसिंग पवार यांनी आपल्या सोबत सात-आठ शेतकरी सहकारी घेत गट शेतीच्या माध्यमातून मोत्यांच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करीत पन्नास लाखांच्या वर उत्पन्न घेतले आहे. त्यांचा हा यशस्वी प्रयोग उस्मानाबाद, लातूर, सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरक प्रयोग ठरत आहे.
मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे आणि ते मोलास्का नावाच्या शिंपल्यामध्ये तयार होते. भारतासह जगभरात मोत्यांची मागणी वाढत असली तरी त्यांचा नैसर्गिक पुरवठा मात्र अतिवापरामुळे आणि प्रदूषणामुळे कमी होत चालला आहे. भारतातच घरगुती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातील रत्न व्यावसायिक, सराफी व्यावसायिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात संस्कारित मोत्यांची आयात करतात. ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ऍग्रीकल्चर या राष्ट्रीय संस्थेने साध्या गोड्या पाण्यातील शिंपल्यातून गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. त्यातूनच देशभरातील शेतकऱ्यांना कृषी अर्थकारणाला गती देणाऱ्या पूरक व्यवसायाची वाट सापडली.

जेंव्हा एखादा परकीय कण किंवा लहानसा कीटक चुकून शिंपल्यामध्ये घुसला आणि शिंपला त्याला बाहेर घालवू शकला नाही किंवा तो कीटक शिंपल्यामध्ये अडकला तर शिंपला त्या कणा भोवती किंवा किटकाभोवती एक चमकदार आवरण तयार करतो. या आवरणाचे थरावर थर जमून मोती तयार होतो. भारतात गोड्या पाण्यातील शिंपल्याच्या तीन प्रजाती उपलब्ध आहेत. लॅमेलिंडस मार्जिनालीस, एल. कोरिआनस आणि पारेसीआ कोरुगारा या तीन प्रजाती उपलब्ध आहेत. यापासून चांगल्या दर्जाचे मोती तयार होतात. भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ऍग्रीकल्चर या संस्थेने विकसित केलेले तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या अनेक ऍग्रो प्रोड्युसर कंपन्या कार्यरत झाल्या. यातूनच आता पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या दुष्काळी जिल्ह्यात देखील शेतकरी आपल्या शेततळ्यामधून मत्स्य व्यवसायाप्रमाणेच मोत्याची शेतीचा यशस्वी प्रयोग करू लागले आहेत. तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील दहा तरुणांनी यापूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये भवानी शंकर ऍग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन करीत आत्ता म्हणजे २०२२ मध्ये मोत्यांच्या शेती सुरू केली. त्यानंतर तालुक्यातील दहिटणा येथील म्हंतप्पा कांबळे यांनी देखील हाच प्रयोग यशस्वी केला. म्हंतप्पा कांबळे यांच्याकडून प्रेरणा घेत शहापूर येथील संजय पवार यांनी शेतकरी मित्रांचा गट बनवून मोत्यांच्या शेतीचा प्रयोग करण्याचे निश्चित केले. यासाठी इंडो-पर्ल कंपनीने मार्गदर्शन-साहाय्य दिले. इंडो-पर्ल कंपनी ही शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने मोत्यांची शेती कशी करावी ? याचे प्रशिक्षण देते. त्याचबरोबर वेळोवेळी मोती संवर्धन कसे करावे ? याबाबत मार्गदर्शनही करते. इंडो-पर्ल कंपनीचे संचालक अरुण अंभोरे यांनी वेगवेगळ्या देशातील मोत्यांच्या शेतीचा अभ्यास केला आहे. याबरोबरच त्यांनी भुवनेश्वर येथील राष्ट्रीय संस्थेतून पर्ल फार्मिंग संबंधात प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर त्यांनी इंडो-पर्ल कंपनी स्थापन करून त्यामाध्यमातून २०१५ पासून शेतकऱ्यांना पर्ल फार्मिंगचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यातून आजवर जवळपास ३५०० शेतकऱ्यांना त्यांनी पर्ल फार्मिंगसाठी प्रशिक्षित केले आहे.
शहापूरच्या संजय पवार यांनी पर्ल फार्मिंगचा प्रयोग करण्याचे निश्चित केल्यानंतर इंडो-पर्ल कंपनीत जाऊन याबाबतचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर शहापूरच्या आठ शेतकऱ्यांचा मिळून समूह गट तयार करून समूह गट शेतीच्या माध्यमातून ही मोत्याची शेती जुलै २०२१ मध्ये म्हणजेच ऐन कोरोनाकाळात सुरू केली. या समूह गटात संजय पवार यांच्यासह गोविंद शिंदे, विजय पवार, जीवन मोजगे, अजित पवार, चंद्रसेन सोमवसे, नईम पटेल आणि सुप्रिया कदम या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी दि. १३ जुलै २०२१ रोजी संजय पवार यांच्या शेतातील ३०० बाय १०० फुटाच्या आणि २० फूट खोल असणाऱ्या शेततळ्यामध्ये २५ हजार शिंपले सोडले. यावेळी ९० रुपयांना एक शिंपला याप्रमाणे शिंपल्यांची खरेदी करून ही मोत्याची शेती सुरू केली. महाराष्ट्रात नागपूर जवळील कोराडी प्रकल्पात हे शिंपले मिळतात. खरेदी केलेल्या २५ हजार शिंपल्यांपैकी १५ हजार शिंपले मृत निघाले म्हणजेच ते मोती उत्पादित करू शकले नाहीत. त्याचा १४ लाखांचा विमा मोबदला मिळाला. तर उर्वरित १० हजार मोतीयुक्त शिंपल्यांचे खर्च वजा जाता ३६० रुपये निव्वळ नफा प्रमाणे ३६ लाख असे एकूण ५० लाख रुपये उत्पन्न बारा महिन्यात मिळाले. या पर्ल फार्मिंगमध्ये खर्च वगळता सरासरी अडीच पट उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हा प्रकल्प आपल्या शेतात राबवावा. जेणे करून तोट्यात जाणाऱ्या शेती व्यवसायाला शेती पूरक व्यवसायाने उभारी देता येईल असे मत प्रगतिशील शेतकरी संजय पवार यांनी व्यक्त केले आहे. अधिक माहिती साठी शेतकऱ्यांनी संजय पवार यांच्याशी (मोबाईल क्रमांक- 9890939730) संपर्क साधावा.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा