कोरोना काळातही अन्नधान्याचा तुटवडा पडू न देणाऱ्या कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्यांना लॉक डाऊनमुळे बंद असलेल्या बाजारपेठांनी गेल्या दीड वर्षात जरी उभारी दिली नसली तरी देखील यंदाच्या मोसमात वेळेवर पडलेल्या पावसाने खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पदरात झुकते माप टाकले आहे. मात्र ‘दैव देते आणि कर्म नेते’ अशी गत गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांची झाली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील मका, तूर, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात रोज रात्री रानडुकरांच्या झुंडी जो हैदोस घालत आहेत त्यामुळे डवरलेल्या उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. विशेषतः मक्याच्या शेतात घुसणाऱ्या रानडुकरांच्या झुंडींना रोखण्यासाठी रात्रभर हलगीवादन आणि फटाक्यांची आतषबाजी करीत शेतकऱ्यांना रात्र जागवावी लागत आहे. वन्यजीव सुरक्षा कायद्यामुळे पिके फस्त करणाऱ्या रानडुकरांचा कायमचा ‘बिमोड’ देखील शेतकऱ्यांना करता येत नाही. मका उत्पादनात गेल्या तीन वर्षांच्या सरासरी पेक्षाही यावर्षीच्या खरीप हंगामात मक्याचे पीक जोमाने आले असताना आता पीक हाती येण्याच्या वेळेत दाणेदार कणसांना फस्त करण्यासाठी घुसखोरी करणाऱ्या रानडुकरांच्या झुंडीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
चांगलं पुरुषभर ऊंच मक्याचं पीक उभारलं की आलेल्या कणसात दाणे बाळसं धरू लागतात. रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर पहिली समाधानाची रेष उमटते ती त्यावेळीच. मक्याच्या दाण्यांनी भरलेल्या कणसांना डवरून यायचा कालावधी म्हणजे बळीराजाच्या घालमेलीचा काळ असतो. गर्भधारणा झालेल्या कारभारिणीला जसं बळीराजा काळजीनं जपत असतो, अगदी तसंच डोळ्यात तेल घालून डवरलेल्या पिकाला जोपासावं लागतं. कीड लागू नये, टोळधाड पडू नये म्हणून वेळेवर फवारणीसाठी प्रसंगी सावकाराकडून व्याजाने कर्ज घेणाऱ्या बळीराजाला अपेक्षा असते ती दाणेदार कणसांनी खळे भरून ओसंडावे यासाठी घर गहाणवट ठेवून आपली शेती फुलविणाऱ्या शेतकऱ्याला मात्र नेहमीच कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटांचा सामना करीत पोटच्या लेकरासारखं मायेनं जपत पिकाचा सांभाळ करावा लागतो.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने २०२२-२३ च्या खरीप हंगामातील पहिला प्राथमिक अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मका आणि ऊसाचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २०२२-२३ साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनात देशात मक्याचे उत्पादन विक्रमी २३.१० दशलक्ष टन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या सरासरी १९.८९ दशलक्ष टन उत्पादनापेक्षा तो ३.२१ दशलक्ष टन एव्हढा जास्तीचा आहे. महाराष्ट्रात ऊस हे नगदी पीक असल्याने ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. महाराष्ट्रात साखर कारखानदारी फोफावली ती केवळ शेतकऱ्यांच्या वाढत्या ऊस शेतीमुळेच. मात्र ऊसाला लागणारे जादा पाणी ही आता ऊस शेतीची मोठी अडचण बनली आहे. अनियमित पाऊसकाळामुळे आता शेतकरी ऊसापाठोपाठ येणाऱ्या नगदी पिकांच्या पाठीमागे लागला आहे. शेतीला उर्जितावस्था यावी हाच त्यामागचा हेतू असतो. मात्र बाजारात मिळणाऱ्या भावातील चढउतार शेतकऱ्यांना हंगामी पीक घेताना बुचकळ्यात टाकतात. गेल्या हंगामात ज्या पिकाला जादा भाव मिळाला ते पीक घेण्याच्या प्रयत्नात पुढच्या वर्षी उत्पादन जास्त झाल्याने मालाला उठाव मिळत नाही. परिणामी कमी भाव मिळाल्याने शेतकरी नुकसानीत जातो. एकतर पीक घेताना येणारी संकटे त्याला आर्थिक फटका देत असतात. त्यात हाती शिल्लक राहिलेल्या पिकाला रास्त भाव मिळाला नाही तर शेतकरी कर्जबाजारी व्हावे लागते. आता यंदाच्या वर्षी देखील मका हे पीक जोमात आले आहे. मक्याचे क्षेत्रही वाढलेले आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून रानडुकरांच्या उच्छादाने शेतकरी हैराण झाला आहे. सरासरी एका रात्रीत दोन एकराहून अधिक पीक रानडुकरे फस्त करतात. नुकसानीचा हा वेग बघितला तर शेतकऱ्याच्या हाती किती पीक शिल्लक राहील अन् त्याला किती भाव मिळेल हे अजून गुलदस्त्यात आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भ-खान्देशातील जिल्ह्यातून डवरलेल्या मक्याच्या कणसांना रानडुकरांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी ठिकठिकाणी शिवारात रात्री हलग्यांचा कडकडाट आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. आता बळीराजाला एकतर सरकारने वाचवावे किंवा त्याने नेहमीप्रमाणे आपली मेहनत देवाच्या हवाली करावी. तूर्त इतकेच.
(या लेखातील सर्व व्हिडीओ क्लिप वडगाव (काटी), ता.-तुळजापूर, जि.-उस्मानाबाद येथील प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब गायकवाड यांच्या सहकार्याने)
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा