घडून गेलेल्या सर्वच गोष्टी आपल्या मेंदूवर कोरल्या जातात असं अजिबात नसतं. मात्र काही ठळक गोष्टी कायमस्वरूपी मनात घर करून राहतात.

हा जीर्ण अन कोणत्याही क्षणी कोसळण्याची वाट पहात असलेला बंगला….हा मेंदूत घर करून बसलाय. अर्धवट किलकिले पण सताड उघडे दरवाजे, काही तावदाने निखळून पडलेल्या खिडक्या, भिंतींचा रंग पार उडालाय. स्वतःहून कोसळणाऱ्या मलब्याला स्वतःच्याच ओंजळीत घेवून कुणाच्या प्रतीक्षेत असेल बरं ही वास्तू…? आता इथं कुणीही येणार नाही, डागडुजी करून वास्तव्याचे धाडस कुणीच करणार नाही, मग का या वास्तूला कुणाच्या येण्याची प्रतीक्षा असावी. सुमारे ४० वर्षांपूर्वी उभारलेली ही वास्तू मी त्यावेळी अनुभवली आहे. तिचे आदरातिथ्य, तिची मायेची ऊब, भक्कम अन सुरक्षित निवारा माझ्या अस्वस्थ पण स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या काळातील एकमेव पाठराखण करणारी निश्चल पण हितगुज साधणारी वास्तू म्हणून माझ्या मेंदूच्या एका कोनाड्यात कायमची कोरली गेली आहे.

१९८५ च्या सुमारास माझे वडील कै. मधुकरराव रंगनाथ हिंगणे हे अभियंता म्हणून वैरागच्या भोगावती सहकारी साखर कारखाना (मु. पो.- तुळशीदासनगर, वैराग, ता.- बार्शी, जि.- सोलापूर) इथे रुजू झाले. तसं पाहिलं तर वडिलांच्या नोकरीपेशाचा तो उतरतीचा काळ होता. आम्ही भावंडं शिक्षणाच्या निमित्ताने पैठण-औरंगाबाद येथेच रहात होतो. त्यामुळे वैरागच्या कारखाना साईटवर माझ्या व्यतिरिक्त बाकीच्या भावंडांचा फारसा संबंध आला नाही. सणासुदीला ते वैरागला यायचे. माझा मात्र चांगला दोन-अडीच वर्षे वास्तव्याचा काळ राहिला. कारखाना व्यवस्थापनाने साईटवरच अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या ट्विन बंगलोमध्ये एक बंगलो आम्हाला मिळाला होता. सुरुवातीपासूनच कारखान्याचा गळीत हंगाम एक-दोन अपवाद वगळता कमी-अधिक प्रमाणात क्षमतेने झाले होते. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी कै. तुळशीदास जाधव होते त्यावेळी त्यांच्या हयातीत कारखाना उभारणीच्या टप्प्यात असल्याने वेगाने वैराग परिसराचा कायापालट होताना दिसत होता. वैराग हे तसं बार्शी तालुक्यातील बाजाराचं मोठं गाव, पंचक्रोशीतील पाच-पन्नास गावांची बाजारपेठ म्हणून वैरागला महत्व मिळालेले. त्यातच वैराग तालुका व्हावा ही जुनी मागणी राजकारणाचा केंद्रबिंदू होती. बार्शी आणि वैरागच्या आर्थिक विकासाची ईर्षा नेहमी याच मुद्द्यावर राजकीय धुमशान घडवायची. त्याचे पडसाद सहकारी कारखानदारीवर पडायला सुरू झाले अन तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून भोगावती सहकारी साखर कारखाना राजकीय कुरघोड्यांचा आखाडा बनला. कै. तुळशीदास जाधव आणि त्यांच्या कन्या माजी आमदार श्रीमती निर्मलाताई ठोकळ यांच्या हातातून कारखान्याची सत्ता निसटल्यानंतर एक-दोन अपवाद वगळता निवडून येणाऱ्या संचालक मंडळात बेबनावच अधिक राहिला. याचा परिणाम कारखान्याच्या अर्थकारणावर अधिक प्रमाणात झाला.

८० च्या दशकात सुरू झालेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याला ९० च्या दशकात घरघर लागायला सुरुवात झाली. कारखान्यावर कर्जाचा डोंगर आणि हंगामात पूर्ण क्षमतेने ऊसाचे गाळप होत नसल्याने साखरेच्या उत्पादना अभावी कर्जाचा डोंगर कमी होईना. त्यात ऊसाला योग्य भाव आणि वेळेत बिले मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यापासून दुरावायला लागला. त्यातच नियमित वेतनाअभावी कामगार-कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची आर्थिक हेळसांड सुरू झाली. वर्ष-वर्ष विनावेतन घरगाडा चालविणे कामगारांना अशक्य होवू लागले. कित्येक कर्मचाऱ्यांची बायकापोरे दुसऱ्याच्या शेतावर मजूरीसाठी जावू लागले. ज्यांना शक्य झाले ते लोक दुसऱ्या कारखान्यावर गळीत हंगामापूरते स्थलांतरित होत होते. माझे वडील देखील एक वर्ष लातूर जिल्ह्यातील नळेगाव येथील जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना येथे रुजू झाले होते. त्यांच्या नोकरीपेशाच्या उतरत्या काळात त्यांना होणाऱ्या आर्थिक कुचंबणेचा परिणाम आमच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात होत होता. शिक्षणासाठी आम्ही गावाकडे असलो तरी मुख्य आर्थिक स्रोत वडिलांची नोकरी हाच असल्याने ती परवड आम्हाला खूप यातना देणारी ठरली होती. कै. तुळशीदास जाधव यांच्या आग्रहाखातर चांगला कारखाना सोडून आलेल्या वडिलांना पश्चाताप करायला देखील परिस्थिती सवड देत नसायची.

आर्थिक कुचंबणेने जर्जर झालेल्या अवस्थेतही मनाला उभारी देणारी एकच गोष्ट त्यावेळी आमच्याकडे होती. कारखाना साईटवर आम्हाला रहायला मिळालेला हा ट्विन बंगलो. आजूबाजूला तार कंपाऊंडच्या आत फुलविलेला बगीचा, कारखान्याचा हंगाम काळातील यंत्रांचा आणि भोंग्याचा आवाज सोडला तर एरवी माळरानावरची निरव शांतता……माझ्यातला लेखक फुलला तो याच बंगल्यातील वास्तव्यात. या बंगल्याचे माझ्याशी अनामिक नाते जुळले ते बहुदा याच कारणाने. १९९३-९४ पर्यंत आम्ही या बंगल्यात रहात होतो. पुढे वडिलांच्या निवृत्तीनंतर आम्ही सोलापूरला आलो. त्यानंतर कधी फिरून त्या वास्तुकडे बघायला जमलेच नाही. पुढे वृत्तपत्र क्षेत्रात पत्रकारितेची नोकरी करताना अनेकदा कारखान्याचे राजकारण आणि कामगारांची परवड हे विषय बातम्यांच्या, लेखाच्या माध्यमातून पुढे येत राहिले. २००५ च्या सुमारास कारखान्याने कायमस्वरूपी शेवटचे आचके दिले. आता बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू होईल या आशेपोटी काही कामगार कुटुंबे अजूनही साईटवरील पत्र्याच्या घरातून तग धरुन आहेत. तर अधिकारी वर्गासाठी बांधलेले ट्विन बंगलोज जमीनदोस्त होत आहेत. एखादं दुसरा अवशेष सांगाड्यासह उभा आहे……कारखाना कधीतरी सुरू होईल म्हणून वेडी आशा बाळगून. माझ्या मेंदूत कोरलेल्या या आठवणींना पुन्हा एकदा खरवडून काढण्याची वेळ परवा साधून आली. वैरागला कामानिमित्त गेलो असता बार्शीचे सहकारी मित्र गिरीश कुलकर्णी आणि वैरागचे पत्रकार मित्र दळवी यांनी ‘वास्तुभेट’ घडवून आणली. आज आई-वडील दोघेही हयात नाहीत. पण त्या तावदान तुटलेल्या खिडकीतून अस्पष्ट आभास मात्र झाला. कुणीतरी वास्तव्याला यावं ही आर्त मागणी ते भग्नावशेष करतायत या कल्पनेने अंगावर सर्रकन काटा आला.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा