विवाह नोंदणी संस्थांकडे केल्या जाणाऱ्या अपेक्षा चक्रावणाऱ्या

  • भारतीय समाज रचना जी भक्कमपणे उभी आहे ती केवळ भारतीय विवाहसंस्का आणि एकजिनसी कुटुंब पद्धतीमुळे, हे आपण आजही दिमाखात सांगत असतो.
  • भारतीय कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्कार हे एक नात्यात गुंफलेले असल्याने इतर देशातील विवाह संस्कारापेक्षा ते अधिक बळकट असल्याचे सर्व जगाला मान्य आहे.
  • पण गेल्या काही दशकांपासून पाश्चात्य संस्कृतीचे वाढते आकर्षण आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार करण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे विवाह संस्कारावर त्याचा थेट परिणाम होत असून विवाह म्हणजे आयुष्यभर सोबत करणाऱ्या जोडीदाराची निवड, ही संकल्पनाच मोडीत निघाली की काय ? अशी भीती समोर प्रखरतेने येत आहे.
  • भारतीय समाजात अनेक जाती-धर्मांचा बंधुत्वाचा वावर शतकानुशतकापासून आहे. या बंधुत्वाच्या नात्यामध्ये वेळोवेळी घुसळण होत असते. कर्मठपणा पासून पुरोगामी, निधर्मीवादापर्यंत संघर्ष इथे आहे. त्यातूनही भक्कम भारतीय विवाहसंस्कार रुजलेले असल्याने आजवर तरी इथल्या समाजरचनेला धक्का बसलेला नाही. मात्र आता विवाह नोंदणी करणाऱ्या संस्थांमधून ज्या अजब प्रकारच्या मागण्या समोर येत आहेत ते पाहता केवळ ‘नर-मादी’ एव्हढेच नैसर्गिक नाते या नव्या शिक्षित, सुसंस्कारित समाजाला मान्य आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माझ्यासारखे वृत्तपत्रात काम करणारे बरेच जण रोज वृत्तपत्र बारकाईने वाचण्याची अजिबात तसदी घेत नाहीत. विशेषतः स्वतः लिहिलेल्या बातम्या किंवा स्फुटलेखन, आर्टिकल अगदी एखाद्या जाहिरातीला ‘टॅग लाईन’ सुचविली असेल तर ती देखील व्यवस्थित आली की नाही ? हे चाळणे म्हणजे वृत्तपत्र वाचणे असा एक समज करून घेतला आहे. त्यातही आपण लिहिलेल्या मजकुरात काही भयंकर चूक आढळल्यास ती अनावधानाने झालेली चूक असल्याचे सिद्ध करण्यात पुढील अनेक दिवस घालवतो. पण दुसऱ्याच्या चुका शोधण्यासाठी वृत्तपत्राची चाळण करणे हा एक आद्यकर्तव्य म्हणून फावल्या वेळेतील सदुपयोग म्हणता येईल. त्यामुळे वृत्तपत्रात काम करणारे वृत्तपत्राचे वाचन कश्यासाठी करतात हे एव्हाना लक्षात आले असेलच. बाकी रोजचे राशी भविष्य आणि क्लासिफाईड (छोट्या जाहिराती) वाचणे हा आशावाद जपणारा किंवा वाढविणारा एक सुसंधीचा लेखन प्रकार आहे असे व्यक्तिगत पातळीवर माझे मत आहे. बऱ्याचजनांची याला सहमती असू शकते. परवा रिकाम्यावेळेत असेच छोट्या जाहिरातीसाठी आलेला मजकूर चाळत असताना लक्ष वेधले गेले. वरकरणी व्यक्तिगत पातळीवरील समस्या वाटणारी ही छोटी जाहिरात समाज कोणत्या दिशेने वाटचाल करू पाहतोय हे दर्शविणारी ‘अलर्ट सिग्नल’च वाटली.

अजून कामाला सुरुवात देखील केली नव्हती तोपर्यंत छापण्यासाठी आलेल्या छोट्या जाहिरातीच्या या चार ओळीच्या मजकुराने मेंदूच्या खिडक्या उघडल्या. छोट्या जाहिरातीच्या कॉलमवर विश्वास ठेवून त्याला फॉलो करणाऱ्या सर्वसामान्य वाचकांचा खूप मोठा वर्ग असतो. त्यामुळे कदाचित एखादेवेळी मथळ्याच्या मजकुरात किंवा शीर्षकात मुद्रा राक्षसाचा विनोद झाला किंवा समाज धारणेला ‘पाचर’ बसेल असे लिखाण छापून आले तरी फारशी गडबड होत नाही. पण छोट्या जाहिरातीमध्ये असं काही-बाही छापून येणे ही त्या वृत्तपत्राची विश्वासहर्ता कमी करणारी गोष्ट ठरू शकते. त्यामुळे वादग्रस्त किंवा फसवेगिरी करणारा, संस्कारहीन, दर्जाहीन मजकूर शक्यतो छोट्या जाहिरातीमध्ये दिसत नाही. अर्थात जाहिरात म्हणून छापलेल्या मजकुराशी वृत्तपत्र सहमत नसते तसा इशाराही प्रसिद्ध केलेला असतो. तर सांगायचा मुद्दा म्हणजे जोडीदार हवी या कॉलमखाली आलेला हा मजकूर क्षणभर का होईना विचलित करणारा ठरला. नेहमीच्या विवाह नोंदणी संस्थेकडून आलेली ही छोटी जाहिरात असल्याने ती जाहिरात स्वीकारली गेली होती, अर्थात अजून प्रसिद्ध केली नसल्याने पुढील ‘महाभारत’ घडले नव्हते. जोडीदारीण कशी हवी त्या पद्धतीने स्वतः शोधणे हे एकवेळ वधू संशोधनाच्या प्रक्रियेचा भाग समजला जाऊ शकतो. मात्र ‘रिलेशनशिप’साठी सुशिक्षित आणि सुसंस्कृत महिला हवी अशी अपेक्षा एखाद्या विवाह नोंदणी आणि वध-वर संशोधन केंद्राकडे व्यक्त करीत स्वतःची नाव नोंदणी करणे हे कितपत समाज सभ्यतेचे लक्षण मानावे ? एकतर या जाहिरातीतील पुरुष हा तरुण नक्कीच नाही. म्हणजे त्याला उपवर तर कोणत्याही स्थितीत म्हणता येवू शकत नाही. शिवाय तो उच्च शिक्षित आणि स्वतःला सुसंस्कृत समजतो. आर्थिक संपन्नता ही त्याच्या ‘वेल सेटल्ड’ या शब्दप्रयोगातून दिसून येते. स्वतः घटस्फोटित असताना तो एक जोडीदारीण नाही तर ‘मादी’ शोधतोय. ते ही वर्तमानपत्रात जाहिरात देवून राजरोसपणे त्याला हा समाजाच्या साक्षीने ‘व्यभिचार’ करावयाचा आहे. तो घटस्फोटित आहे, यात तो किती निर्दोष आहे ? हा विषय इथं चघळण्यापेक्षा तो ज्या पद्धतीने ‘पार्टनर’ शोधू पाहतोय हे भारतीय समाज रचनेला बाधा आणणारे असेच आहे. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज हे अलीकडच्या काळात आर्थिक ताण-तणाव आणि महत्वाकांक्षी गुणदोषामुळे कमी-अधिक प्रमाणात अपयशी ठरत असताना आता रिलेशनशिप अर्थात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या ही पुढची पायरी गाठणारा हा दुराचार आता फक्त महानगरात नाही तर मध्यमवर्गीय शहरे आणि गावपातळीवर येवून थडकला आहे. कुटुंबव्यवस्था आणि स्त्री-पुरुष नात्यातील पावित्र्याचे नग्न स्वरूप सभ्य-शालीन अश्या भारतीय संस्कृतीला मानवणारे आहे का ? हाच प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

2

)

  1. Basavraj Shabade

    Barobar Saheba appa

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद बसू 🙏🙏

      Like

%d bloggers like this: