मार्शल लॉ च्या काळातील सोलापूरचे राष्ट्राभिमानी नगराध्यक्ष माणिकचंद शहा

ब्रिटिशांच्या जोखडात संपूर्ण देश असताना ‘युनियन जॅक’ उतरवून ‘तिरंगा ध्वज’ फडकवत साडेतीन दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या सोलापूर शहरावर ब्रिटिशांनी ‘मार्शल लॉ’ सारखा जुलमी कायदा लागू केला. मुळातच भारतावर राजवट करणाऱ्या ब्रिटिशांनी मार्शल लॉ या जुलमी कायद्याची निर्मिती केल्यानंतर राजकीय उठाव दडपून टाकण्यासाठी या कायद्याचा वापर अखंड भारतात फक्त दोन शहरांवर केला होता. सोलापूर आणि पेशावर (फाळणी नंतर पेशावर पाकिस्तानात समाविष्ठ झाले.) त्यानंतर ब्रिटिशांनी पुढे कधीच या काळ्या कायद्याचा अंमलबजावणी केल्याचा उल्लेख आढळत नाही. ब्रिटिश सरकारच्या विरोधात १९३० साली सोलापुरात रक्तरंजित क्रांती झाली. या जनआंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या चौघा क्रांतीपुत्रांना ब्रिटिश सरकारने फासावर लटकावले. तर सोलापूर नगरपालिकेवर फडकविलेला ‘तिरंगा ध्वज’ उतरविण्यास बाणेदारपणे नकार देणाऱ्या नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांना सक्तमजुरीची आणि आर्थिक दंडाची शिक्षा देत त्यांना विजापूरच्या तुरुंगात डांबले. मार्शल लॉ नगराध्यक्ष म्हणून प्रसिद्ध झालेल्या स्व. माणिकचंद शहा यांचा मात्र पुढे सोलापूर महापालिका आणि शहरवासीयांना विसर पडला. त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी महापालिकेने ना चौकाला नाव दिले ना अंतर्गत रस्त्याला नाव दिले. त्यांच्या नावे शहरात कुठेही सभागृह नाही किंवा बगीचाही नाही. सोलापूर नगरपालिकेचे महापालिकेत परिवर्तन झाल्यानंतरही तोंडदेखलेपणा करणारे एक-दोन प्रकार झाले. ते देखील पुढे फायलींच्या ढिगाऱ्यात गडप करण्यात आले. पुढे मात्र पहिले पाढे पंचावन्न. माणिकचंद शहा हे कोण होते ? हे आता सोलापूरच्या देखील नव्या पिढीला सांगावे लागते.

मार्शल लॉ नगराध्यक्ष म्हणून प्रसिद्ध पावलेले स्व. माणिकचंद रामचंद शहा

‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे योगदान’ या पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी ‘तिरंग्याचे अभिमानी शेठ माणिकचंद रामचंद शहा’ या प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार गर्भश्रीमंत घराण्यात जन्मलेल्या, ब्रिटिश अधिकाऱ्यांशी जवळीक असून सुद्धा मार्शल लॉ च्या काळात नगराध्यक्ष असताना नगरपालिकेवरील तिरंगा ध्वज उतरविण्यास नकार दिल्याबद्दल शिक्षा भोगलेल्या माणिकचंद शहा यांचे नाव स्वातंत्र्यलढ्यात अजरामर झाले आहे. सोलापूरच्या भूमीने पारतंत्र्याच्या काळात अनेक राष्ट्राभिमानी, करारी बाण्याच्या, निर्भीड सुपुत्रांना जन्म दिला होता. त्यापैकी एक होते शेठ माणिकचंद रामचंद शहा. त्यांचा जन्म १८९२ साली सोलापुरात एका श्रीमंत घराण्यात झाला. माणिकचंद आईच्या पोटात असतानाच त्यांचे वडील वारले आणि जन्मदात्या आईनेसुद्धा पतीच्या निधनाचे दुःख असह्य झाल्याने काही महिन्यातच आपली इहलोकीची यात्रा संपविली. माणिकचंद यांचे आजी-आजोबाही हयात नसल्याने त्यांचा सांभाळ त्यांची पणजी रतनबाई यांनी केला. त्यांचे शिक्षण सहावी पर्यंतच झाले होते. व्यायामाची आवड तसेच कुस्त्यांची आवड असल्याने माणिकचंद यांनी कुस्त्यांचे पंच म्हणूनही लौकिक कमावला होता. त्यांना पेंटिंगची देखील आवड होती. सावकारी आणि मोत्यांचा व्यापार हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. ज्या-ज्या वेळी ब्रिटिश सरकारला पैश्यांची कमतरता पडायची तेंव्हा अधिकारी जमिनी विकायला काढत, त्या जमिनी माणिकशेठ विकत घेत असत. त्यांच्याकडे ब्रिटिश कलेक्टर नाईट आणि अधिकाऱ्यांचे येणे-जाणे होते. १९३० सालाच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी सभा आणि मिरवणुकीत सामील होत स्वातंत्र्य चळवळीत आपला क्रियाशील सहभाग नोंदवला होता. ब्रिटिश सरकारने त्यांना देवू केलेले ऑनररी मॅजिस्ट्रेटचे पद नाकारून त्यांनी देशाभिमान दाखविला होता.

ब्रिटिश काळातील सोलापूर नगरपालिकेची इमारत, सध्या इथे महापालिका शिक्षण मंडळाचे काम चालते.

शेठ माणिकचंद शहा हे १९२० सालापासून सोलापूर नगरपालिकेचे १० वर्षे ५ महिने लोकनियुक्त सदस्य होते. २२ एप्रिल १९३० रोजी ते सोलापूर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. दि. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधी यांना अटक केल्याची बातमी सोलापूर शहरात समजताच ब्रिटिशांच्या विरोधात जनक्षोभ उसळला. जाळपोळ झाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांना शहरातून जीव वाचवून पळून जावे लागले. याकाळात साडेतीन दिवस पारतंत्र्यात असलेल्या देशात सोलापूर शहर मात्र स्वतंत्रतेचा अनुभव घेत होते. शहरावर पुन्हा ताबा मिळविण्यासाठी ब्रिटिश सरकारने दि. १२ मे १९३० च्या रात्री शहरात मार्शल लॉ लागू केला. यापूर्वीच म्हणजे दि. ६ एप्रिल १९३० रोजी डॉ. वि. वा.मुळे नगराध्यक्ष असताना पुण्याचे समाजसुधारक, पत्रकार अण्णासाहेब भोपटकर यांच्या हस्ते सोलापूर नगरपालिकेवर तिरंगा झेंडा फडकविण्यात आलेला होता. तो तसाच डौलाने फडकत होता. दि. १३ मे १९३० रोजी नेहमीप्रमाणे नगरपालिकेतील कामकाज पाहण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष माणिकचंद शहा हे नगरपालिकेत गेले होते. त्यावेळी कर्नल पेज याने नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांना मार्शल लॉ च्या जाहिरनाम्याप्रमाणे राष्ट्रीय निशाण फडकविणे हा गुन्हा असल्याचे सांगत तिरंगा ध्वज उतरविण्याचे फर्मान सोडले. Take out that rag, which is called your flag असा अवमानकारक शब्दप्रयोग करीत कर्नल पेज याने आपला उर्मटपणा दाखविला. त्यावेळी नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी निर्भीडपणे उत्तर दिले की, लोकप्रतिनिधींनी एकमताने ठराव संमत करून उभारलेले राष्ट्रीय निशाण स्वतःच्या जबाबदारीवर काढू शकत नाही. त्यासाठी पुन्हा सभा बोलावून सभासदांची संमती घ्यावी लागेल. त्यांचे हे बाणेदार उत्तर ऐकून कर्नल पेज संतापला. त्याने तात्काळ माणिकचंद शहा यांना लष्करी अधिकाऱ्याच्या आज्ञेचा भंग केला म्हणून अटक केली आणि नगरपालिका मधील तिरंगा आपल्या लष्करी गोऱ्या शिपायाकडून उतरविला. त्यानंतर माणिकचंद शहा यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला दाखल करून त्यांना १० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु अडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कोठावाला यांनी शिक्षेचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे सांगितल्यामुळे कर्नल पेज याने पहिली शिक्षा रद्द करून माणिकचंद शहा यांना ६ महिने सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड ठोठावला. त्यांना पुढे विजापूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे ते मार्शल लॉ नगराध्यक्ष म्हणून प्रसिद्ध झाले. नगराध्यक्ष म्हणून त्यांना अवघा २० दिवसांचा कालावधी मिळाला होता. दि. १९ सप्टेंबर १९५१ रोजी त्यांचे अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले.

महापालिका शिक्षण मंडळाच्या इमारतीच्या दर्शनी भागात बसविलेला हाच तो शिलालेख.

स्व. शेठ माणिकचंद रामचंद शहा यांना हिरालाल, जयकुमार आणि विजयकुमार अशी तीन मुले होती. थोरला मुलगा हिरालाल यांचा मुलगा हर्षवर्धन आणि सौ. माधवी हर्षवर्धन शहा या दाम्पत्याला डॉ. उदयन शहा, प्रियदर्शन शहा ही दोन मुले आणि डॉ. मयूरप्रिया विराणी ही विवाहित कन्या आहे. प्रियदर्शन शहा हे हॉटेल आणि बांधकाम व्यावसायिक म्हणून सोलापुरात लौकीकप्राप्त आहेत. माणिकचंद यांचे दुसरे चिरंजीव जयकुमार यांची एकुलती एक विवाहित कन्या प्रतिभा घिवाला ह्या मुंबईत असतात. तर माणिकचंद यांचे तिसरे चिरंजीव विजयकुमार यांना डॉ. अंजली व अनुजा ह्या दोन विवाहित कन्या आहेत. स्वातंत्र्यानंतर यथावकाश सोलापूर नगरपालिकेचे सोलापूर महापालिकेत परिवर्तन झाल्यावर या देशभक्ताच्या स्मृतींची खरी परवड झाली. १९८५ च्या सुमारास शेठ माणिकचंद शहा यांचे निवासस्थान ‘जीवन महल’ लगतच्या चौकाला माणिकचंद चौक असे महापालिकेतर्फे नामकरण करण्यात आले होते. मात्र आता सभागृहातील ठरावाचे रेकॉर्डच पालिकेला सापडत नाही. पुढे १९९६-९७ च्या काळात पालिका सभागृहात शेठ माणिकचंद शहा यांची भली मोठी तसबीर बसविण्यात आली होती. कालांतराने ती तसबीरही नाहीशी झाली. शेवटी सध्याच्या शिक्षण मंडळाच्या इमारतीच्या दर्शनी भागात बसविलेला शिलालेख आजमितीस स्व. शेठ माणिकचंद शहा यांच्या स्मृती जागवत ठेवण्याची एकाकी धडपड करताना दिसतोय. शहरात अनेक रस्ते, चौक, बगीचे, मैदाने देखील या देशभक्तांच्या स्मृती जागवत ठेवणाऱ्या असू नयेत हे या शहराच्या भविष्याचे दुर्दैवच म्हणायला हवे. कारण ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो त्यांचे वर्तमान उपेक्षित तर भविष्यकाळ अंधारमय असतो.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

7

)

  1. smitahingne

    माहित नसलेला इतिहास,वाचनीय.👌👍

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद 👍👍

      Like

  2. Yuvraj Hirapure

    Khup sundar likhan sir.

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद युवराज 🙏🙏

      Like

  3. Basavraj Shabade

    chan likhan

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      हा आपल्या सोलापूरचा इतिहास आहे. 🙏🙏

      Like

  4. मार्शल लॉ च्या काळातील सोलापूरचे राष्ट्राभिमानी नगराध्यक्ष माणिकचंद शहा – avatibhavati.in

    […] […]

    Liked by 1 person