शाहरुखचा ‘पठाण’ अन संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे’…!

  • चित्रपटांचं राजकारण आणि राजकारणाचा चित्रपट हे दोन्ही विषय सर्वसामान्य रसिकांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय असतो.
  • आजकाल चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सुरुवातीपासूनच त्याच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी तथाकथित संघटना आंदोलनाची मोट बांधायला सुरुवात करतात.
  • चित्रपटाच्या प्रदर्शनाला जेव्हढा तीव्र विरोध होईल, तेव्हढा जास्त कमाई करणारा तो चित्रपट ठरतो. चित्रपट हिट करण्याचा हा मार्केटिंगचा फंडा भलेही घासून गुळगुळीत झाला असेल पण तो व्यवसायाला नक्कीच फायदेशीर ठरतो.
  • बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या तीन खानपैकी कोणत्याही खानाचा सिनेमा असुद्यात राष्ट्रविरोधी आणि राष्ट्रप्रेमी किंवा एच-एम (हिंदु-मुस्लिम) वादाची किनार आपोआपच लावली जाते. या तीनही खानांना हे तोंडपाठ असल्याने या प्रपोगंड्यावर सिनेमाचा गल्ला कसा जमवायचा ? याची स्ट्रॅटेजी ते प्रमोशनच्या आधीच मांडायला सुरुवात करतात. एकाचवेळी जगभर चित्रपट प्रदर्शित करून उत्पन्नाचे नवनवे रेकॉर्ड आपल्या नावे करतात. थिएटर बाहेर बेंबीच्या देठापासून घोषणा देत विरोध करणारे सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र आंदोलनासाठी नोंदविल्या गेलेल्या भारतीय दंडविधान कलमातून आपली मान सोडवून घेण्यासाठी पुढे वर्षानुवर्षे न्यायालयाच्या चकरा मारत राहतात.

बऱ्याच वर्षानंतर हिरो म्हणून कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा एकतर बिग बजेट असून बऱ्याच गॅप नंतर एका सुपर-डुपर हिटसाठी आसुसलेल्या शाहरुखचा सिनेमा असल्याने हा सिनेमा चालला तरच बॉलीवूड तरणार अन्यथा बॉलीवूडचे अस्तित्व धोक्यात येईल असं मानणारे चित्रपट उद्योगातील अनेक अभ्यासक, कलावंत आणि किंग खानला आपला हिरो मानणाऱ्या चाहत्यांना वाटते. त्यामुळे तद्दन मसाला चित्रपट असला तरी शाहरुखचा चित्रपट म्हणून त्याला प्रदर्शनापूर्वीच सुपर हिटचा दर्जा दिला जातो. नेमके खान कंपनीच्या या प्रपोगंड्याच्या विरोधातच बॉलीवूड मधील एक उघडपणे विरोध करू न शकणारा गट आहे जो खान कंपनीच्या प्रत्येक चित्रपटाला विरोधी वातावरणाची झालर चढवू पहात असतो. चित्रपट उद्योगातील या राजकारणात काही तथाकथित संघटना आपला वेगळाच अजेंडा घेऊन उतरत असतात. अलीकडच्या काळात विरोधाला देखील समाजहित आणि राष्ट्रहिताची फोडणी दिलेली असते. त्यामुळे सर्वसामान्य भावनाप्रधान लोक या विरोधाच्या लाटेवर सारासार विचार बाजूला ठेवून स्वतःला झोकून देताना दिसतात. विशेषतः पौराणिक कथाबीज असलेले, तात्कालिक सामाजिक अथवा राजकीय घटनांवर आधारित सिनेमे अथवा धार्मिक रंगांचा अनावधानाने किंवा मुद्दामहून वापर केलेली कथानके ही समाजातील विशिष्ट आक्रमकवादी समूहाच्या रोषाला कारणीभूत ठरतात. बरं हे आत्ताच होतंय किंवा केलं जातंय असं अजिबात नाही. सिनेमामुळे सामाजिक रोषाने वातावरण कलुषित होण्याचे प्रकार आजच घडत नाहीत. राजकारण्यांच्या आणि त्यांना पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या संघटनांचे हे आद्य कर्तव्य बनले आहे.

हा विषय इथं चर्चेला घेण्याचं मुख्य कारण हेच आहे. २६ जानेवारी हा भारतीय गणतंत्र दिवस एकीकडे राष्ट्रप्रेमाने भारावून जात उत्साहात साजरा होत असताना या पार्श्वभूमीवर २५ जानेवारी रोजी दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. एक म्हणजे शाहरुख खान याचा ‘पठाण’ आणि दुसरा सिनेमा राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे..एक युद्ध’. आपोआपच या दोन्ही सिनेमात तुलनात्मकदृष्ट्या आणि किती गल्ला जमा केला ? यावर दोन विचारधारांमध्ये इर्षेचे वातावरण निर्माण होणार हे सांगायला कुणा विश्लेषकाची किंवा कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही. अलीकडच्या काळात भारतात हिंदु-मुस्लिम संघर्षाबरोबरच महात्मा गांधी, नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर, दहशतवाद हे विषय समाज अस्वस्थतेचे कळीचे मुद्दे बनले आहेत. यात इतिहास पुरुषांच्या तात्कालीक वैचारिक भूमिकांमधून समाज ढवळून काढत अस्वस्थता पेरण्याचे काम केले जात आहे. यात कट्टरवादी आणि सर्वधर्म समभाववादी या दोन्हीही विचारधारेचे अनुयायी कायम अग्रेसिव्ह मूड मध्ये दिसतात. लोकांपर्यंत हे विषय प्रभावीपणे नेण्यासाठी चित्रपटासारखे अन्य माध्यम नसल्याने चित्रपट उद्योगातील अनेक नावाजलेले बडे निर्माते-दिग्दर्शक आघाडीवर आहेत. रंजनाची सवलत म्हणून बऱ्याचवेळा मूळ ऐतिहासिक कथा-प्रसंगांची मोडतोड केली जाते. यातूनच समाजात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होते. निगेटिव्ह पब्लिसिटीचा आधार घेत सिनेमा बघायला लोकांना आकर्षित करण्यासाठी हे सर्व उद्योग केले जातात. काय चांगलं आणि काय वाईट ? हे लोकांना चांगलेच कळते, त्यांनाच ठरवू द्या. मात्र असे होताना दिसत नाही.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

1

)

  1. rajiv shete

    Chan

    Liked by 1 person

%d bloggers like this: