जन्मस्थळाचे महात्म्य मोठे की समाधीस्थळाचे….?

अगदी हे आर्टिकल लिहायला बसलो तेंव्हा माझ्या मनात चमकून गेलेला हा प्रश्न आहे. कोणत्याही धर्माचे, पंथाचे, विचारांचे संत-महात्मे किंवा राष्ट्रपुरुष असू द्यात. त्यांचा अनुनय करताना आपल्याला त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या अवतार समाप्ती पर्यंत त्यांचा जीवनपट आपल्यासाठी प्रेरणादायी असतो. मग या अवतारी पुरुषांच्या जन्मस्थळापेक्षा त्यांच्या समाधीस्थळाचे महात्म्य मोठे का असते ?

अतिशय जिज्ञासेपोटीच मी ही शंका उपस्थित करतोय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगतगुरु तुकाराम महाराज, पैठणचे एकनाथ महाराज, रामदास स्वामी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा सोलापूरचे ग्रामदैवत असलेले श्री सिद्धरामेश्वर महाराज अशा अनेक विद्वत संत प्रभूतीची नावे डोळ्यासमोर तरळतात. या संतांच्या समाज जागृतीच्या कार्याचा, त्यांच्या अवतारी लीलांचा भाविक म्हणून आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडलेला असतो. म्हणूनच त्यांच्या जन्मस्थानाचे (आपण त्याला प्रकटस्थान असेही म्हणू शकतो) पावित्र्य आपल्या मनावर ठसलेले असते. आपल्या बहुतांश संतांनी समाज जागृतीसाठी भ्रमंती केली आहे. त्यामुळे जन्मस्थळ सोडून त्यांचे अलौकिक कार्य अन्य ठिकाणी झाले आहे. शिवाय ज्यावेळी त्यांना आपले अवतार कार्य संपले असे वाटले, त्याठिकाणी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी त्याठिकाणी समाधी मंदिरे बांधली. संतांच्या जन्म आणि अवतार समाप्ती या दोन्हीही घटना आपण दैवी संकेत असल्याचेच मानतो. म्हणूनच अश्या विभूतींच्या जन्मस्थळ आणि समाधीस्थळाविषयी आपल्याला तेव्हढाच ओढा असायला हवा. पण तो ओढा अलीकडच्या काळात कमी झालाय किंवा आपली भक्ती देखील याबाबतीत दुजाभाव करतेय की काय ? असाच प्रश्न उपस्थित राहतो. बहुतांश समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळलेली असते. तेच जन्मस्थळी असलेल्या मंदिरात, जन्म झालेल्या वास्तूतील देवघर अथवा स्मृती मंदिरात भक्तांची तेव्हढी गर्दी उसळलेली दिसून येत नाही. मग हा दुजाभाव का ? सध्या मकरसंक्रांतीच्या पर्वापासून सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा सुरू झालीय (गड्डा यात्रा). याकाळात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र-तेलंगणातून लाखोंच्या संख्येने भाविक सोलापुरात गर्दी करीत आहेत. इथेही सिद्धरामेश्वरांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते. पण गावातील साखर पेठेत असणाऱ्या सिद्धरामेश्वरांच्या जन्मस्थळ असलेल्या मंदिरात तेव्हढी गर्दी दिसत नाही

काही अवतारी पुरुषांचे जन्मरहस्य आपण मनोमन स्वीकारतो. तरी देखील त्यांच्या बालपणीच्या वास्तव्यातील जागेला आपण पुण्यस्थळाचे महत्व देतो. जगाच्या कल्याणासाठी अवतारी जन्म प्रकटल्याचे स्थळ आणि अवतारकार्य संपल्याचे जाहीर करीत घेतलेल्या समाधीचे स्थळ दोन्हीही आपल्यासाठी पवित्र, श्रध्येय अशीच ठिकाणे आहेत. पण जागृत ठिकाण म्हणून आपण समाधी स्थळाची निवड करतो का ? अलीकडच्या काळात जागृत मंदिर हा नवा प्रकार ठिकठिकाणी दिसतो. नवसाला पावणारे अथवा भक्तांचे गाऱ्हाणे ऐकणारे देव अथवा अवतारी संत-महात्मे हे काही त्याच ठिकाणी सदरेवर बसून न्यायनिवाडा करणारे कोतवाल होते का ? इतर मंदिरे ही देवादिकांचे शयनकक्ष असते का ? मंदिराच्या गाभाऱ्यातून रात्री देव शयनाला निघून जातो, ही मानवी संकल्पना आहे. देवादिकांचा देखील मनुष्यासारखाच दिनक्रम असतो हे सांगण्याचा हा प्रयत्न. याबरोबरच दिवसातील शुभ प्रहरामध्ये दर्शन घेऊन प्रसन्नचित्ताने दिनक्रमाला सुरुवात करावी म्हणून देव रात्रीच्या प्रहरी निजधामी गेले ही कल्पना रूढ केली गेली. बाकी अष्टोप्रहर देव कुठेही संचार करीत असतो अन तो जागृतच असतो. अमुक ठिकाणीच तो जागृत असतो ही भाकडकथा भाविकांची गर्दी खेचण्याची क्लुप्ती असू शकते.

मागच्या महिन्यात खूप दिवसांनी पैठणला जाण्याचा योग आला होता. तिथेही एकनाथ महाराजांचे वास्तव्य असलेले गावातील देवघर (आतला नाथ) आणि गावाबाहेर गोदावरी नदीकाठी असलेले समाधी मंदिर (बाहेरचा नाथ) अशी दोन मंदिरे आहेत. इथेही बाहेरून येणाऱ्या भाविकांचा दुजाभाव दिसून येतोच. गावात राहणारे पैठणकर दोन्ही मंदिराबाबत कधीच दुजाभाव करत नाहीत. आम्हीही जेंव्हापासून कळते झालो तेंव्हापासून आतला आणि बाहेरचा अशा दोन्हीही मंदिरात जावून दर्शन घेतो. पण कुणीतरी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांचा अपसमज करून देतो अन मग जागृत ठिकाणाचा मुद्दा उसळी मारून वर येतो. यापाठीमागे व्यावसायिक अटकळ असते हे मात्र नक्की. अलीकडे गर्दी अभावी जन्मस्थळे दुर्लक्षित होत एकाकी पडू लागलीत. किंवा गर्दी नाही म्हणून भक्तांकरिता सुविधाही नाही. तर सुख-सुविधांचा अभाव म्हणून भक्तही फिरकत नाहीत अशा दुष्टचक्रात ही जन्मस्थळे सापडली आहेत. अवताराचा जन्म झालेले ठिकाण आपल्या मनावर तितका प्रभाव टाकू शकत नाही जेव्हढा प्रभाव अवतार समाप्तीचे ठिकाण टाकते. भक्ती आणि श्रध्देने भरलेल्या भाविकांच्या खोल मनाचा अंत काही लागत नाही. संतच काय यातून राष्ट्रपुरुष देखील सुटले नाहीत. जे जे आम्हाला जीवनात मार्गदर्शक आणि प्रेरक आहेत त्यासर्व प्रभूतींची समाधीस्थळे आम्हाला त्यांच्या जन्मस्थळांपेक्षा जास्त आकर्षित करतात हे मात्र नक्की.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

2

)

 1. Avinash Hingne

  खूपच छान

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद अवि सर 🙏🙏

   Like

%d bloggers like this: