- कोरोना काळात सर्व उद्योग-व्यवसाय पूर्णपणे ठप्प असताना हॉटेल व्यवसायाला मिळत असलेली गती कशाचे द्योतक आहे ?
- उत्पादन, विक्री आणि सेवा या त्रिसूत्रीवर आधारलेला हॉटेल व्यवसाय कोरोना लाटेनंतर खरोखरीच तेजीत आहे का ?
- द्रुतगतीने बांधण्यात येत असलेल्या महामार्गांमुळे रस्त्याच्या दुतर्फा संख्यात्मक दृष्ट्या हॉटेल्सची होणारी वाढ व्यवसायातील अस्थिरता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे का?

अठराव्या शतकात ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहती मधून क्लबच्या माध्यमातून सुरू केलेली हॉटेल्स हीच भारतीय हॉटेल इंडस्ट्रीची सुरुवात समजली जाते. त्या अगोदर भारतात मंदिर, मठ, धर्मशाळा, राजा अथवा अमीर-उमराव यांच्या मदतीने चालविली जाणारी अन्नछत्र ही पर्यटक, प्रवासी, अनाहूत, अशांची दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था लावत होती. भारतीय संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असे मानल्या जात असल्याने अन्नदान हा एक संस्कार आहे. त्यामुळेच भारतात इंग्रज येण्यापूर्वी अन्न दान करणारे भारतीय याकडे व्यवसाय म्हणून कधीच पहात नव्हते. पुढे ब्रिटिश राजवटीत चाकरमानी जमात वाढीला लागल्यावर खानावळ या उपजीविकेच्या साधनाचा जन्म झाला. त्यातूनच उपहारगृह, हॉटेल ही संकल्पना मोठी होत गेली. स्वातंत्र्यानंतर देशांतर्गत दळणवळणाची सुविधा वाढल्यानंतर गाव तिथे एसटी याप्रमाणे गाव तिथे उपहारगृह दिसू लागले. पुढे १९७० नंतर खऱ्या अर्थाने हॉटेल व्यवसायाला आकार यायला सुरुवात झाली. सरकारने पर्यटन विकासाला चालना देताना हॉटेल उद्योगाला विशेष सवलती बहाल करीत त्यांचा दर्जा निर्माण केला. यातूनच व्यावसायिक चुरस निर्माण होत गुणवत्ता आणि सेवा-सुविधा या निकषांवर हॉटेल व्यवसायाची भरभराट सुरू झाली. १९८० नंतर खवय्ये ग्राहक आणि पर्यटकांची गरज लक्षात घेऊन उभारणारा हॉटेल व्यवसाय जोमात असला तरी संख्यात्मक दृष्ट्या निश्चितच नियंत्रणात होता. या व्यवसायाचे अर्थकारण देखील मोठे असल्याने संभाव्य नुकसानीच्या भीतीने या व्यवसायात प्रवेश करणाऱ्या नवख्यांचे प्रमाण बोटावर मोजण्या इतकेच होते. ज्यांच्या घरात हॉटेल हा परंपरागत व्यवसाय आहे अशीच मंडळी व्यवसायाचा विस्तार म्हणून मोक्याच्या ठिकाणी नव्या हॉटेलची उभारणी करू लागली होती. मात्र मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीने जीवनपद्धतीत मोठ्याप्रमाणात बदल झाले. कोरोना नंतर जग बदलू लागले तसे प्रत्येक उद्योग-व्यवसायात देखील बदल होवू लागले.

कोरोनामुळे सर्वात मोठा बदल दिसून आला तो विरुद्ध प्रवाही स्थलांतरामुळे. रोजगार, शिक्षण, व्यवसाय-उद्योग, आरोग्य आदी सुविधांच्या ओढीने होणारी स्थलांतरे ही प्रामुख्याने अविकसित भागातून विकसित भागाकडे होतात. म्हणजेच ग्रामीण भागातून शहराकडे होतात. मात्र कोरोना काळात पहिल्यांदाच सुरक्षेच्या कारणास्तव शहरी भागातून गावाकडे स्थलांतराचे प्रमाण वाढले याचा ग्रामीण जीवनशैलीवर होणारा परिणाम देखील आगामी काळात दिसणार आहे. हाती रोजगार नसताना गावाकडे परतणाऱ्या लोंढ्याचा कुटुंबाच्या, गावाच्या अर्थकारणावर हळूहळू होणारे परिणाम आत्ता प्रकर्षाने दिसू लागले. यातच केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयांतर्गत रस्ते विकास महामंडळाच्या योजनांनी गती घेतली. कोरोना काळात गावाकडे परतलेल्या मजूरवर्गाला उपजीविकेचे तात्पुरते काम मिळाल्याने मजूरवर्ग सुखावला. मात्र नॅशनल हायवे, स्टेट हायवे, रस्ते विस्तारीकरणामुळे, उड्डाणपुलांच्या उभारणीमुळे हमरस्त्यावरील अनेक गावांच्या बाजारपेठा विस्थापित होवू लागल्या. विस्थापित होणाऱ्या व्यवसाय-दुकानांनी गावाबाहेर पुन्हा एकदा नव्या रस्त्यांच्या दुतर्फा आपला व्यवसाय सुरू केला. ग्रामीण अर्थकारणावर एकीकडे हा आघात होत असतानाच शहरातून गावाकडे आलेल्या पदवीधर आणि अर्धशिक्षित तरुणांनी हायवेच्या शहरी संस्कृतीला पूरक ठरणाऱ्या हॉटेल व्यवसायाकडे आपले लक्ष वळविले. हायवे मुळे देशांतर्गत दळणवळण वाढणार असले, त्यामुळे भविष्यात पर्यटनात वाढ होईल या गृहितकानुसार नव्या रस्त्यांच्या दुतर्फा हॉटेल्स, लॉज, गार्डन रिसॉर्ट, ढाब्याची गेल्यावर्षभरात मोठ्याप्रमाणात उभारणी झाली आहे. हॉटेल व्यवसायाचा अनुभव नसतांनाही या व्यवसायात आकर्षणापोटी उतरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचा ग्रामीण जीवनशैलीवर देखील आगामी काळात विपरीत परिणाम झाल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळणार आहे. रस्ते हे जनजीवनाचा खरं म्हणजे अविभाज्य भाग आहेत. जिथे रस्ते पोहोचले तिथे विकास पोहोचला हे समीकरण तर्कानुसार नेहमीच मांडले जाते. पण हेच रस्ते विस्थापितांच्या विकासाला अडथळा ठरण्याची भीती सध्यातरी दिसत आहे. पहिल्यांदाच अंधानुकरणामुळे व्यवसाय आणि संस्कृती धोक्यात येवू पहात आहे. अगदी दोन वर्षांपूर्वी ग्रामीण भागात अभावाने दिसणारे हॉटेल आता हायवेच्या दुतर्फा मोठ्या संख्येने दिसू लागली आहेत. महामारीनंतर, दुष्काळानंतर खावखाव वाढते असं ग्रामीण भागात वडीलधारी मंडळी नेहमी म्हणतात. एकाच व्यवसायातील ही संख्यात्मक वाढ त्या व्यवसायाला नुकसानदायक ठरू शकते. खाद्यप्रेमी आणि पर्यटकांना तारांकित सुविधा देण्याच्या नादात ग्रामीण संस्कृती आणि सभ्यतेला धक्का पोहोचू शकतो. याबरोबरच गतिमान दळणवळणाबरोबरच तेव्हढ्याच गतीने व्यसनाधीनता गावपातळीवर पोहोचत आहे याकडे आज नाही तर कधी गंभीरतेने पाहणार…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा