नकली दागिन्यांनी प्रत्यक्ष देवाची बोळवण……!

विठुराया भक्तीचा भुकेला

अठ्ठावीस युगांपासून आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी कर कटीवर ठेवून विटेवर उभारलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला देखील नवस पूर्ण करण्यासाठी बनावट दागिने अर्पण करणारे भक्त भेटतात. भक्तांच्या फक्त भक्तीचा भुकेला असणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाचे हे शल्य प्रत्यक्ष पांडुरंगच समजू जाणे….’ एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मै किसी की भी नही सूनता ‘ हा आदर्श बाळगणाऱ्या भक्तांच्या नव्या पिढीकडून प्रत्यक्ष देवाला देखील कमिटमेंटचा हा असा अनुभव घ्यावा लागतो. परवा म्हणजे नव्या वर्षाच्या आरंभी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरातील सर्व दानपेट्या उघडून भक्तांनी श्री विठ्ठल चरणी अर्पण केलेले दान मोजणीसाठी घेतले. त्यात पोते भरून देवाला अर्पण केलेले नकली सोने-चांदीचे दागिने आढळले. जवळपास ३० किलो वजनाचे एक पोते भरेल एव्हढे दागिने असे सध्या मंदिर समितीकडे ३ पोते नकली दागिने जमा आहेत. भक्तांच्या संकटाला धावून जाणाऱ्या विठुरायाची हीच ती कमाई…?नवस बोलणे हा खरं तर श्रध्देचा विषय आहे, शास्त्राचा नाही. कोणताही देव भक्तांकडून काहीच मागत नसतो. देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. पण आपल्या इच्छेनुसार सर्व काही मंगल होऊ दे असं म्हणत भक्तच देवाच्या चरणी आपण होवून काहीतरी अर्पण करण्याचा नवस बोलत असतो. मुळातच नवस हा यथाशक्तीचा विषय आहे. तो आता प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे ऐपत नसताना बोललेला नवस पूर्ण करताना आपल्या आप्तगणात मोठेपणा मिळविण्यासाठी स्वार्थी भक्त चक्क अंतर्यामी परमेश्वराच्या देखील डोळ्यात धूळ फेकत आपली कमिटमेंट पूर्ण करतात.

गेली अठ्ठावीस युगे भक्तांच्या भेटीसाठी आसुसलेल्या पांडुरंगाचे पंढरपूर हे भागवत धर्माचे आद्यपीठ आहे. हिंदुधर्माची शिकवण, संस्कार, परंपरा, आचार-विचारांच्या समृद्धीचे दान रंजल्या-गांजल्या लोकांमध्ये वाटून त्यांना अध्यात्मिकतेच्या वाटेवर घेवून जाणाऱ्या आजवर झालेल्या हजारो संतांचे तीर्थक्षेत्र असलेल्या या पंढरीत देवभेटीसाठी जमणारी लाखों भक्तांची मांदियाळी हा तर जगामध्ये उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा विषय ठरला आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेवून ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करीत शेकडो किलोमीटर अंतर अनवाणी पायाने विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेल्या देवभोळ्या वारकरी बहुजनांचा हा देव आहे. प्रेम-वात्सल्याचे प्रतीक असलेल्या पांडुरंगाचे आपल्या रंजल्या-गांजल्या भक्तांकडे काहीच ‘एडव्हान्स’चे मागणे नसते. या देवाने प्रसन्न होण्यासाठी कुणा भक्ताकडून काही मागीतल्याची आख्यायिका देखील नाही. मग हा देव ‘नवसा’चा देव कसा काय होवू शकतो..? म्हणजेच पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी जे काही सोने-चांदीचे दागिने, रोकड रक्कम अर्पण होते ती फक्त आणि फक्त श्रध्देपोटीच होते, यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. मग आता प्रश्न उरतो तो श्रध्देने नकली दागिने अर्पण करण्याचा. ‘सोने आणि रूपे आम्हा मृत्तिके समान’ अशी शिकवण देणाऱ्या तुकोबांची पांडुरंगाप्रती असलेली आर्तता या ढोंगी भक्तांना दिसणार कशी ? देवापेक्षाही समाजाला सांगण्यासाठी नवस पूर्ण करण्याचे प्रयोग अलीकडच्या काळात निर्लज्जपणे सुरू असतात. यामध्ये आपण प्रत्यक्ष देवालाच फसवतोय या भीतीपेक्षाही इतर समाजबांधवांना मूर्खांत काढतोय याचे विकृत समाधान अधिक असते. तर काही जण देवाला बोलल्याप्रमाणे सध्या तरी खरे दागिने देवू शकत नाही. आता देवच माझी परिस्थिती समजून घेईल (देव अंतर्यामी आहे ना..!) या निर्ढावलेपणातून ‘भगवान को सब कुछ चलता है’ म्हणत नकली दागिने अर्पण करीत आपला नवस पूर्ण करतात.

प्रत्यक्ष पांडुरंगाचा अधिवास असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीला लाखोंच्या संख्येने दिंडी-पालख्यांसह पायी चालत येणाऱ्या वारीला हजाराहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. ज्ञानदेवांच्याही आधी कैक वर्षे संतांनी सुरू केलेल्या या पायी चालत जाण्याच्या प्रथे मधूनच भागवत धर्माचा प्रसार होत गेला. इतिहासात डोकावून पाहिले तर मोगल काळात आणि आदिलशाही राजवटीत पंढरपूरचे मंदिर नष्ट करण्यासाठी कितीतरी हल्ले झाले. या हल्ल्यातून सुरक्षिततेसाठी काहीकाळ विठुरायाची मूळ मूर्ती देखील अन्यत्र हलविण्यात आल्याची आख्यायिका सांगितली जाते. तरी देखील भक्तांची विठुराया वरील श्रद्धा यत्किंचितही ढळली नव्हती. गेल्या शतकभरात १९११-१२ या वर्षभराचा काळात प्लेग आणि कॉलराच्या पसरलेल्या साथीपासून बचाव म्हणून विठ्ठल मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर २०२० मध्येच कोरोना महामारीच्या काळात मंदिर बंद ठेवावे लागले. लॉक डाऊनचे निर्बंध उठल्यानंतर पहिल्यांदाच गत आषाढी एकादशीला दहा लाखांच्या वर भाविकांनी वारीत आपला सहभाग नोंदवला होता. महामारीतील वेदना अन कैफियत विठुराया समोर मांडली होती. मरणाच्या दारातून परत आलो म्हणून अनेकांनी खरे सोने-चांदीचे दागिने विठू चरणी अर्पण केले. तर कित्येकांनी जवळ असलेली रोकड दानपेटीत टाकली. अनेकांनी या काळात मृत्यू पावलेल्या आपल्या आप्तेष्टांची शेवटची इच्छा म्हणून विठुरायाच्या चरणी नवस अर्पण केला. हा भक्तिभाव आणि श्रद्धा एकीकडे आणि खोट्या दागिन्यांनी नवस फेडण्याचा ‘इव्हेन्ट’ करणारे ढोंगी एकीकडे. शेवटी फसगत ही देवाची नाही तर श्रध्देची होते म्हणून हा लेखन प्रपंच.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

7

)

  1. jnzende

    खूप छान, डोळसपणे आणि नेमक्या शब्दात

    Liked by 1 person

  2. jnzende

    खूप छान, डोळसपणे आणि नेमक्या शब्दात लिहितोस.

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      अक्का 🙏🙏🙏

      Like

  3. rituved

    छान 👍

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद ऋतुवेद 🙏🙏

      Like

  4. kekaderajesh

    मला वाटतं ज्या भक्ताने दागिने विठुरायास अर्पण केले त्या भक्ताला सोनारानेच मुद्दाम हुन नकली दागिने देऊन फसविले असावे
    शिवाय हे दागिने दानपेटीत न टाकता जर मंदिर समितीकडे सुपूर्द केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      राजेशजी हा एका भक्ताचा प्रश्न नाही. गेल्या वर्षभरात ३० किलो वजनाचे एक पोते भरून नकली दागिने मिळाले. असे मंदिर समितीकडे ३ पोते भरून नकली दागिने जमा आहेत.

      Like

%d bloggers like this: