
थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांचे देशाप्रती व्यक्त झालेल्या अनेक सुंदर सुभाषितांपैकी एक कोट अलीकडे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असते.
“देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो अन या देशाचे आपण देणे लागतो”
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हिंदुत्वविरोधी विचारधारा अंगिकारणाऱ्या अनुयायांमध्ये अनेक प्रवाद आहेत. अगदी सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शिंतोडे उडविण्यापर्यंत या वाचाळवीरांची मजल जात असते. अलीकडे भारतीय राजकारणात धर्मातील आस्थेचे विषय, राष्ट्रपुरुष, देवमाणसे यांच्याबद्दल वादंग माजविणारी विधाने करण्याचा टाईमपास खेळ अगदी मन लावून खेळल्या जातो. तर सांगायचा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वर नमूद केलेले विधान कधी केले ? कोणत्या स्थितीत केले असेल ? याच्या सत्यतेबद्दल काही पुरावे आहेत का ? असे विकृतीजन्य प्रश्न उपस्थित करणारे जसे आहेत तसेच हे विधान स्वातंत्र्यवीरांनीच केले आहे हे सत्य समजून राष्ट्रधर्म पाळणारी मंडळी देखील या देशात आहेत. हे सांगण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीला विरोध करताना मोदी किती धूर्त आहेत हे सांगण्यात आपले रक्त आटवणे ही विचारधारा सध्या मोदी विरोधकांमध्ये सळसळत असते. सध्या देशातमोदीला विरोध म्हणजेच हिंदुत्वाला विरोध हे नवीन समीकरण रुजू पहात आहे. हे असं का होतंय ? कारण भारतात स्वातंत्र्यानंतर रूढ असलेल्या सत्ता समिकरणाला नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षात मोडीत काढले. सतत कार्यमग्न असलेल्या मोदींवर व्यक्तिगत पातळीवर हीन दर्जाची टीका केल्यानंतरही मोदी जरासेही विचलित होत नाहीत. मोदी यांना मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करून सत्तेपासून दूर करण्याचे सर्व डावपेच निष्प्रभ होत असल्याने आलेली हतबलता, एकीकडे मोदींच्या जगभरात उंचावणाऱ्या प्रतिमेला देशांतर्गत तितकीच उंची मिळाली तर आपल्या घराणेशाहीच्या सत्ताकारणाला तिलांजली मिळेल या भीतीने मोदी विरोधक कमालीचे गडबडून गेलेले आहेत. मोदी यांच्या प्रत्येक कृतीला विरोध करताना ते लोकशाही बुडवत हुकूमशाहीकडे चालल्याचा कांगावा करण्यात धन्यता मानणाऱ्या मोदी विरोधकांना दिवसागणिक आपण सत्तेपासून अधिक दूर चाललो असल्याच्या जाणिवेने बुद्धी कुंठीत करून टाकले आहे. त्यांना मोदींच्या कोणत्याही कृतीला थोपविण्याचे सामर्थ्य सध्यातरी मोदी विरोधकांमध्ये नसल्याने मोदींची प्रतिमा धुसर कशी करता येईल ? या विचारानेच मोदी विरोधक ग्रस्त झाले आहेत.

आता बांधून सज्ज होत असलेल्या नव्या संसद भवनावरून विरोधकांची कुजबुज सुरू झाली आहे. नव्या संसदेच्या सभागृहात लोकप्रतिनिधींच्या आसन संख्येवरून मोदी किती धूर्त आहेत. आगामी काळात विरोधी पक्ष कसा संपवता येईल याचेच डावपेच मोदी आखत असल्याच्या चर्चा आता विरोधी तंबूमध्ये झडू लागल्या आहेत. सध्याची संसदभवनची इमारत सोडून जनतेच्या मिळालेल्या टॅक्सरूपी पैशातून नवी इमारत बांधण्याची गरज काय ? असा सवाल करीत विरोधकांनी गदारोळ केला होता. मुळात सध्याची इमारत ही ८५ वर्षे जुनी असून खासदार आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहे. शिवाय युनोस्कोतर्फे या इमारतीला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या इमारतीचे चांगल्या प्रकारे जतन करणे हीच आता सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे २०१९ मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संसदेच्या नव्या इमारत उभारणीचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठेवला होता. यानुसार सभागृहात मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार नव्या संसद भवनच्या इमारत उभारणीचे काम कोरोनाकाळातही वेगाने सुरू होते. सभागृहात विरोध करायला पुरेसे बळ नसणाऱ्या विरोधकांची हीच खरी दुखरी बाजू आहे. एकतर सभागृहाबाहेर जनतेत मिसळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेताना अत्यंत असभ्यतेने मुक्ताफळे उधळल्यावर सभागृहात सत्ताधारी गटाने यांच्या सुचविलेल्या मागण्यांना दुजोरा द्यावा ही विरोधकांची अपेक्षाच अतिशय पोरकट वाटणारी अशीच आहे. आता नवीन सुसज्ज इमारत, त्यातील मिळणाऱ्या सुविधा ह्या सर्वांनाच हव्या आहेत. आता एव्हढ्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक घोटाळा होतो की नाही जेणेकरून मोदींना अडचणीत आणून धारेवर धरता येईल याची वाट बघत बसलेल्या विरोधकांना आता या नव्या इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर भविष्यात वाढणाऱ्या खासदार संख्येचे दडपण येवू लागले आहे. कशीबशी दोन अंकी संख्या गाठू शकलेले विरोधक एकत्र येवून फक्त नरेंद्र मोदी यांना विरोध करू शकतात. सत्तापालट करू शकत नाहीत हे देशवासीयांनी गेल्या आठ वर्षात बघितलेले आहे. त्यामुळे सध्या आहे तेव्हढ्या जागाच ताकदीनिशी लढवू न शकणाऱ्या विरोधकांना लोकसभेच्या नव्या वाढीव जागा लढविणे तोंडाला फेस आणणारे ठरणार आहे. म्हणूनच नव्या संसद भवनच्या उभारणीवरून विरोधकांना नरेंद्र मोदी हे धूर्त अन कावेबाज वाटतात.

भविष्यकाळाचा विचार करून जवळपास १३५० खासदार या नव्या इमारतीच्या सभागृहात संयुक्त अधिवेशन काळात अगदी आरामात बसू शकतील एव्हढ्या क्षमतेची आसनव्यवस्था करण्यात येत आहे. आता लोकसभेतील खासदारांची संख्या वाढविण्याची कृती ही काही नवीन राजकीय खेळी नाही. यापूर्वी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी लोकसंख्येवर आधारित खासदारांची संख्या वाढविली होती. १९७१ च्या जनगणनेनुसार त्यावेळी भारताची लोकसंख्या ५५ कोटी होती. त्यानुसार ५४४ हा खासदारांचा आकडा तुलनात्मक दृष्ट्या पुरेसा नसला तरी जवळपास जाणारा होता. आता ५० वर्षानंतर लोकसंख्या १४० कोटींच्या घरात पोहोचत असताना जवळपास १६ ते १८ लाख लोकसंख्येच्या पाठीमागे एक खासदार हे प्रमाणच खूप व्यस्त ठरणारे असेच आहे. त्यानंतर २००१ च्या जनगणनेनुसार सुरू करण्यात आलेल्या मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया २००८ मध्ये पूर्ण झाली. सध्या खासदारांचे मतदारसंघ याच पुनर्रचनेवर आधारित आहेत. आता पुन्हा नव्याने पुनर्रचना करणे क्रमप्राप्त आहे. इथेच सगळ्यात मोठी गोची आहे. ज्या राज्यांना लोकसंख्या नियंत्रणात ठेवता आली नाही त्यांच्या राज्यात नव्या रचनेनुसार खासदारांची संख्या वाढणार आहे. तर ज्या राज्यात लोकसंख्या नियंत्रणात आहे त्यांना फटका बसणार आहे. वाढीव संख्येचा फायदा खासदार निधीच्या रुपात त्या राज्यांना मिळणार आहे. त्यामुळे ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यांना मात्र नुकसान होईल. विकासनिधी संदर्भात होणारा हा संभाव्य असमतोलपणा सध्या चर्चेचा विषय आहे. विशेषतः खासदार संख्या वाढीचा फायदा उत्तरेतील राज्यांना अधिक प्रमाणात होईल तर दक्षिणेतील राज्यांना याचा फटका बसू शकतो. अर्थात निधी वाटपाचा हा असमतोलपणा विशेष तरतुदीने भरून काढणारा नवा कायदा देखील अस्तित्वात आणून यावर तोडगा काढला जावू शकतो. पण विरोधकांची अडचण दुसरीच आहे. मोठी धावसंख्या पार करून सामना आपल्या खिश्यात टाकणे जसे दुबळ्या संघाला अवघड असते अगदी तशीच अवघड परिस्थिती विरोधकांच्या वाट्याला येणार आहे. म्हणून त्यांना खासदार संख्या वाढविण्याचा प्रयोग आत्ता नकोय. तर सत्तेवर मांडी ठोकून बसलेल्या भाजपाला तो हवाय. कारण त्यांच्याकडे नरेंद्र मोदी सारखे हुकुमी पान आहे. दुर्दैवाने मोदींशी टक्कर देवू शकेल अशी नेतृत्वाची छबी विरोधकांकडे नसल्याने विरोधकांना नरेंद्र मोदी हे धूर्त चाली रचणारे राजकारणी वाटतात. तर घराणेशाहीचा वारसा पुढे नेवू पाहणाऱ्या राजकारण्यांना मोदी हे कावेबाज वाटतात. मग नरेंद्र मोदी नेमके कसे आहेत..? नरेंद्र मोदींना घराणेशाही नकोय हे एकवेळ मान्य होईल. पण विचारांचा वारसदार निर्माण होवू नये अशी भूमिका तर कधीच मांडणार नाहीत. म्हणूनच मग स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘त्या’ विधानाचा इथे संबंध येतो. काही माणसे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये येणाऱ्या राष्ट्राचे देणे फेडण्यासाठी आपले जीवन समर्पित करत असतात. आता तुम्हीच ठरवा नरेंद्र मोदी हे धूर्त आहेत की दृढनिश्चयी..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा