नव्या वर्षाची सेल्फ प्रॉमिसची टूथ पेस्ट…!

तसं पहायला गेलं तर बारा महिन्यांचा काळ लोटला की नवे वर्ष सुरू होते. कालमापनाची ही सनावळी शतकानुशतके सुरू आहे. दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून वर्षे सरत असतात. वर्षाच्या शेवटच्या दिवशी सूर्यास्ताच्या नंतर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आख्खी रात्र जागवली (नाचवली) जाते. सरणाऱ्या वर्षाचा ३१ डिसेंबर हा दिवस (अख्खी रात्र म्हणा हवं तर) तेव्हढ्या साठीच योजिलेला आहे. पारतंत्र्यातील गुलामांनासुद्धा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळावी हा उदात्त हेतू ठेवून ब्रिटिशांनी इंग्रजी वर्ष गणनेनुसार नववर्षाच्या स्वागतासाठी सरणाऱ्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून जल्लोष करण्याची प्रथा रूढ केली असावी, किंवा गोऱ्या लोकांच्या आकर्षणापोटी आम्ही ही प्रथा स्वीकारली. जगभर एकच वर्षगणना स्वीकारार्ह असल्याने आता ती अंगवळणी पडली आहे इतकेच.

कन्फेशन बॉक्समध्ये जावून स्वतः केलेल्या गुन्ह्याचा पाढा वाचून परमेश्वरापुढे सरेंडर होणाऱ्या आरोपी प्रमाणेच गतवर्षात किंवा आजवर केलेल्या चुका पुन्हा करणार नाही असा पाढा वाचून नववर्षाचा आदर्श संकल्प करण्याचा मनसुबा दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवाती पासूनच आठवून-आठवून केला जातो. लहानपणापासून हा प्रयोग आमची पिढी सातत्याने करीत आली आहे. अर्थात वाईट सवयी आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्या सवयीचं सोडून देण्याचे संकल्प शंभर टक्के यशस्वी झाल्याचे आजवर तरी ‘याची डोळा याची देही’ मी तरी पाहिलेले नाही. लहानपणी चहा आरोग्याला चांगला नसतो त्यामुळे चहा पिण्याची सवय सोडून देण्याचा संकल्प आजही पूर्ण करता आलेला नाही. यंदा खच्चून अभ्यास करायचा हा संकल्प देखील कधी पूर्ण झाला नाही. याउलट संकल्पात नसणाऱ्या गोष्टी वारंवार वेगाने घडत राहिल्याचा दोष मात्र माथ्यावर चिकटला. असो, या सेल्फ प्रॉमिस पुराणावर माझा तरी विश्वास नसल्याने हॅपी न्यू इयरच्या पार्टीला कोण बोलावते किंवा आपण कुणाला झब्बू द्यायचा ही अटकळ बांधण्यातच आजवर माझा डिसेंबर महिना गेला आहे. अर्थात महिनाभराच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे मी दरवर्षी हॅपी न्यू इयरची जंगी पार्टी अनुभवतो. आता राहता राहिलं ते वाईट सवयी सोडण्याचं किंवा फार तर चांगल्या सवयी लावून घेण्याचं…..तर फार मोठे नुकसान करणाऱ्या किंवा कुटुंबाला, समाजाला बाधा आणणाऱ्या सवयी नसतील तर जे काही आपल्या हातून घडते ते चांगल्या साठीच घडते हा अहं ब्रह्मा स्मि असा बाणा ज्याच्या ठायी असेल तो असल्या प्रॉमिस पेस्टच्या नादी लागत नसतो. तरी देखील सुधारण्याच्या वयात आहे असा तर्क मांडणाऱ्या जमातीकडून दरवर्षी हा प्रॉमिसरी प्रयोग केल्याच जातो.

२०१९ च्या सरतेशेवटी म्हणजेच डिसेंबर २०१९ मध्ये चीन मध्ये कोविड 19 चा उद्रेक झाला होता. २०२० सालाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या जगाला या भीषण महामारीची चाहूल लागायलाच मुळात उशीर झाला. एक तर चीन जगापासून या महामारीची तीव्रता लपवू पहात होता किंवा चीनला या उद्रेकाच्या भीषणतेची पुरेशी कल्पना नसावी. या चीनच्या प्रयोगशाळेतच जैविक अस्त्र म्हणून कोविड व्हायरसचे संगोपन करण्यात आल्याचा दावा करत अमेरिकेने सर्वात प्रथम चीनला जगासमोर दोषी ठरवले. जगभरात हाहाकार माजविणाऱ्या नियंत्रणात आणताना दोन वर्षे संपूर्ण जग रोज मृत्यू बघत होते. ही आठवण येण्याचं कारण पुन्हा एकदा २०२२ च्या डिसेंबर महिन्यात कोविडच्या BF.7 या नव्या विषाणूने चीन मध्ये हाहाकार उडवत जगासमोर महामारीची भीती कायम ठेवली आहे. पुन्हा एकदा कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा मुद्दा जगभर चर्चिल्या जात असताना आपण २०२३ चे स्वागत करणार आहोत. आता अश्या वातावरणात येणाऱ्या नव्या वर्षात आरोग्य सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोर पालन करणे हाच संकल्प सिद्धीस नेणे आपल्या हाती आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

4

)

 1. rituved

  Happy New Year In Advance

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद, तुम्हाला पण ऍडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर 🙏🙏

   Like

 2. smitahingne

  Happy New Year in advance…

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद 🙏🙏🙏

   Like

%d bloggers like this: