
श्रद्धा, भक्तिभाव आणि मौखिक माहिती परंपरेने जतन करण्याच्या संस्कारातूनच हिंदू धर्माची पाळेमुळे शतकानुशतका पासून घट्ट रुजलेली आहेत. म्हणूनच स्थळ-काळ आणि वेळेची आत्ता सांगड घालता येत नसली तरीही अश्या पुराणकालीन वदंतांना समाज मान्यता असते. विशेषतः धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांबाबत प्रगत शास्त्राचे तर्क गुंडाळून ठेवले तरच पुरातन संस्कार आणि संस्कृतीचे महत्व समजू शकते. मुळात रामायण घडलेच नाही असे मानणारे प्रभू श्रीरामचंद्रांचे अस्तित्व सर्वोच्च न्यायालयात पुराव्यानिशी सिद्ध करायला भाग पाडतात, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य सोडून मुघलशाहीत कश्याला आले असतील ? असे खोडसाळ प्रश्न उपस्थित करून स्थान महात्म्य गढूळ करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. म्हणूनच या देशात सध्या प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज ही मराठी जनतेची दैवते वादग्रस्त बनविली जात आहेत. शालिवाहन साम्राज्याची राजधानी असलेल्या प्रतिष्ठाननगरीला (आताचे पैठण ) हजारों वर्षांचा प्राचीन आणि अर्वाचीन वारसा लाभलेला आहे. त्यामुळेच या शहरातील पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या लोकवदंता समाजमान्य आहेत. बऱ्याच वर्षांनंतर पैठणला घरगुती कार्यक्रमासाठी जाण्याची संधी मिळाली. दर दिवशी आपल्या आजूबाजूचा परिसर बदलत असतोच. या तर्कानुसार पैठण शहर देखील बदललेले आणि अधिक विस्तारलेले दिसले. धाकटे बंधू अविनाश हिंगणे (सर) यांना सोबत घेवून विविध मंदिरांची दर्शन फेरी पूर्ण करताना पुन्हा एकदा श्रद्धाभाव नव्याने अनुभवायला मिळाला.

शक-संवत्सराचा निर्माता सम्राट शालिवाहनाची राजधानी आणि संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांची पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण या शहराचा पुराणात धर्मपीठ म्हणून दक्षिण काशी म्हणूनही उल्लेख आढळतो. तर प्रतिष्ठान महात्म्य या ग्रंथात इथल्या देवालयांची विस्तृत माहिती आढळते. या ग्रंथात उल्लेखल्या प्रमाणे दोलेश्वर मंदिराबाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. वनवासात मार्गक्रमण करत असताना श्री प्रभू श्रीरामचंद्रांनी भगवान भोलेनाथांची पूजा करण्यासाठी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली ते हेच दोलेश्वर मंदिर. प्रतिष्ठान महात्म्य या ग्रंथात वर्णील्या प्रमाणे धर्मवर्मा नावाच्या कुरूप ब्राह्मणाने आपली कुरूप पत्नी निंद्यरूपा हिच्यासह गोदावरीत स्नान करून महादेवाची पूजा बांधली. ब्राह्मण दाम्पत्याच्या उपासनेने महादेव प्रसन्न झाले. त्यांनी वर दिल्याने कुरूप ब्राह्मण दाम्पत्याला सौंदर्य प्राप्त झाले. या अख्यायिकेने दोलेश्वर मंदिर प्रसिद्ध पावले. पुढे यवनी आक्रमण काळात या मंदिरावर अनेकदा आक्रमण झाले. शिवलिंगाला साखळदंडाने बांधून उखडून टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र साखळदंडाच्या करकचण्याने पिंडीतून रक्तस्त्राव वाहू लागला. ते पाहून आक्रमणकारी पळून गेले. आजही शिवलिंगावरील साखळदंडाचे व्रण त्याची साक्ष देतात.

संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांना गुरू शोधासाठी जनार्दन स्वामी यांच्याकडे जावे असा दृष्टांत याच दोलेश्वर मंदिरात झाला. तर छत्रपती शिवाजी महाराज जालन्यावर स्वारीला जात असताना आपेगावला भेट देऊन पैठणला दोलेश्वर मंदिरात पूजा बांधून गेल्याची देखील लोकवदंता प्रसिद्ध आहे. सध्या या मंदिराची देखभाल पिढीजात वारसा हक्काने चक्रे घराण्यातील रेणुकादास, दुर्गादास आणि सुहास या भावंडांकडे असून जीर्ण झालेल्या मंदिर वास्तूच्या दुरुस्तीसाठी न्यासाद्वारे भाविकांकडून देणगी स्वरूपात अर्थ सहाय्य गोळा करीत आहेत. भाविकांनी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सढळ हाताने देणगी द्यावी असे आवाहन विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले असून देणगीसाठी मोबाईल क्रमांक :- 9422462905, 9822500447, 9881558507 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा