
सोलापूर शहरापासून अवघ्या १६ – १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या तामलवाडी येथील रासायनिक उत्पादनांची निर्मिती करणारी बालाजी अमाईन्स लिमिटेड ही कंपनी केवळ सोलापूर – उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र राज्य अथवा देशात नाही तर जगात नावलौकिक प्राप्त करणारी कंपनी ठरली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात बालाजी ग्रुपचे अनेक उद्योग प्रकल्प विस्तारलेले आहेत. १९८८ साली एका सयंत्रापासून सुरू करण्यात आलेल्या छोट्या प्रकल्पातून आता पाच मोठे प्रकल्प कार्यान्वित आहेत. अमाईन्स म्हणजे नक्की काय असते ? याची बहुतांश लोकांना नीटशी माहिती देखील नसते. पण जागतिक स्तरावर अमाईन्सची गरज पडणाऱ्या सर्व उत्पादक कंपन्यांना बालाजी अमाईन्सची ओळख आहे. तर रासायनिक उत्पादने तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन उत्पादित करणे हेच बालाजी अमाईन्सचे कार्य आहे. अमेरिका आणि जर्मनी या देशांसोबत भारत हा एक असा देश आहे की तो बालाजी अमाइन्समुळे या प्रकारच्या कच्च्या रसायन उत्पादनात स्वयंपूर्ण बनला आहे. यातही बालाजी अमाईन्सने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. जागतिक स्तरावर केवळ बालाजी अमाईन्सने सर्वात आधी अमाईन्ससाठीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे.

बालाजी अमाईन्सचा मूळ कच्चा माल हा वेगवेगळ्या रासायनिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये घटक म्हणून उपयोगात आणल्या जातो. म्हणूनच बालाजी अमाईन्सची सर्व उत्पादने आवश्यक मानली जातात. यात प्रामुख्याने जीवनावश्यक औषधी, प्राण्यांसाठीची खाद्य उत्पादने, शेतीपिकावरील फवारणीची औषधे, जलशुध्दीकरण प्रक्रियेसाठी, रबर उत्पादन रासायनिक प्रक्रियेसाठी बालाजी अमाईन्सची उत्पादने आवश्यक घटक म्हणून वापरात येतात. बालाजी अमाईन्सचे डायमिथाईल अमाईन हायड्रोक्लोराईड (डी एम ए एच सी एल) या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. कारण हे उत्पादन मधुमेहाच्या नियंत्रणासाठी तयार केल्या जाणाऱ्या औषधात प्रमुख घटक म्हणून उपयोगात आणले जाते. याचे जागतिक पातळीवर सर्वात जास्त उत्पादन करणारी कंपनी म्हणून बालाजी अमाईन्सचा लौकिक आहे. या बरोबरच कोविड वरील उपचारासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे औषध म्हणून रेमेडीसिवर इंजेक्शन ओळखले जाते. यामध्ये बालाजी अमाईन्समध्ये तयार होणाऱ्या ट्राय इथाईल अमाईन ( टी ई ए) या उत्पादनाचा घटक म्हणून प्रामुख्याने वापर केला जातो. इतकेच नव्हे तर कोविडवरील लसीत ही बालाजी अमाईन्सच्या उत्पादनाचा घटक म्हणून समावेश आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडण्यासाठी जगाच्या मदतीला जी औषधे आणि लसी उपयोगी ठरल्या त्यासर्व औषधी आणि लसी मध्ये बालाजी अमाईन्सच्या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे.

अडीच हजार कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेली बालाजी अमाईन्स लिमिटेड ही कंपनी जगभरात पंचेचाळीसहून अधिक देशांमध्ये आपल्या उत्पादनांचा पुरवठा करते. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दर्जेदार उत्पादनांमुळे कंपनीने जागतिक स्तरावर स्वतःचे स्थान निर्माण केले असून साहजिकच सोलापूर – उस्मानाबाद जिल्ह्यासह कंपनीने भारताचा जगभरातील औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक वाढवला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांच्या मते कंपनी निरंतरपणे संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करून काम करीत असल्यामुळे कंपनीचे विशेष रसायने निर्मित उत्पादनामध्ये वर्चस्व आहे. पूर्वी काही उत्पादने ही भारतात शंभर टक्के आयात करण्यात येत होती. परंतु बालाजी अमाईन्समुळे त्या उत्पादनांची निर्मिती भारतात सुरू झाली असून आजमितीस ही उत्पादने बालाजी अमाईन्स पर्यायाने भारत पूर्ण जगात निर्यात करीत आहे. याद्वारे बालाजी अमाईन्स मोठ्या प्रमाणात भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत वृध्दी करण्यासाठी आपले योगदान देत आहे. कोरोना महामारीमुळे जवळपास दीड वर्षे लॉक डाऊनमुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडली असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहिली त्यामागे बालाजी अमाईन्ससारखे अनेक उद्योग भक्कमपणे उभे आहेत. बालाजी अमाईन्स लिमिटेड ही कंपनी फक्त उत्पादनातच अग्रेसर नाही तर उद्योगाच्या विस्तारा बरोबरच कंपनीने आपले सामाजिक दायित्व नेहमीच जपले आहे. कंपनीने बालाजी फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, स्वच्छता या, क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देत सामाजिक कार्याला एक नवा आयाम दिला आहे. जलसंवर्धन आणि पाणी बचतीसाठी विशेष उपक्रम राबवित ग्रामीण भागात विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा