
उपाशी पोटी इतिहास जपल्या जातो…तर भरल्या पोटी त्याची विटंबना….
परवा म्हणजे ५ नोव्हेंबरला दै. दिव्यमराठीच्या टीम सोबत किल्ले पन्हाळगडावर मुशाफिरी करण्याचा योग जुळून आला होता. तशी किल्ले पन्हाळगडावर जाण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. महाराष्ट्रातील गड – किल्ले कोणतेही असोत….भलेही अनास्था आणि दुर्लक्षामुळे कितीही जर्जर झालेले असोत. त्या पावन भूमीवर पाय ठेवल्या क्षणी एका विलक्षण स्फुर्तीचा, चैतन्याचा शरीरात प्रवेश झाल्याचा साक्षात्कार होतो. आपल्या पूर्वजांच्या शौर्यावर आणि उपलब्ध साहित्य लेखनावर जर आपला अतोनात विश्वास असेल तर ही अनुभूती नक्कीच मिळते. कोणत्याही ऐतिहासिक स्थळावर क्षणभर स्तब्ध झालात तर तिथले भग्नावशेष देखील तुमच्याशी बोलू लागतात. बेगुमान वारा देखील इतिहासाची दबलेली साक्ष तुमच्या कानी घालतो. अट फक्त एकच आहे त्याठिकाणी काही क्षण का होईना तुम्ही ध्यानस्थ व्हायला हवं. मग बघा गड – किल्ल्यांची मुशाफिरी खरा इतिहास तुमच्यासमोर कसा उलगडून ठेवते. पहिल्यांदाच जात असाल तर एक काम करा…केवळ थ्रिल म्हणून गड भ्रमंती करू नका. आपण देवदर्शनाला गेल्यावर मंदिराच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होतो. कारण आपली श्रध्दा असते की या पायऱ्याच आपल्याला भगवंताचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. अगदी याच श्रध्देने गड सर करायचा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गडाची माहिती सांगणारे स्थानिक गाईड तुम्हाला तिथे विनम्रसेवेसाठी तत्पर असलेले दिसतील. भाजी मार्केटमध्ये पावकिलो भाजी खरेदी करताना मध्यमवर्गीय फणा काढून जशी घासाघीस करतो, कृपया तशी घासाघीस करू नकात. ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी बहुतांश शिक्षित बेरोजगारांचा उपजीविकेचा हाच सन्माननीय मार्ग आहे. भ्रमंती साठी येणाऱ्या गडप्रेमी वरच तिथले अर्थकारण असते. सगळ्यात महत्त्वाचे सोशल मीडिया आणि वाद निर्माण करणाऱ्या तथाकथित इतिहास तज्ज्ञांनी ओकलेली गरळ डोक्यात साठवून गड आणि गडाचा इतिहास समजून घ्यायला जावू नकात. आधीच भग्नावशेष असलेल्या त्या ऐतिहासिक वास्तू आणि वास्तुपुरुष अधिक भेसूर वाटू लागतील.
इतिहासाचा अभ्यास, संशोधन, खंडण – मंडण जोपर्यंत इतिहासाचार्य विद्वानांच्या विद्वत परिषदेत होते तोपर्यंत जीर्ण अवस्थेत का होईना त्याचे जतन केले जात होते. आता मात्र परिस्थिती वेगळीच दिसत आहे. विद्वत परिषदेतील कपाटात विसावलेला इतिहास आता प्रत्येक जाती – धर्माच्या संघटनांच्या माध्यमातून राजकीय नेत्यांच्या हातात पोहोचला आहे. महाराष्ट्रात दर पंधरा दिवसाला इतिहास कालीन मुद्दा उकरून त्यावर राजकीय चिखलफेक सुरू असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही उठतो अन् आपला अजेंडा चालविण्यासाठी इतिहासाच्या शुद्धीकरणाच्या नावावर चिखलफेक करतो. हा प्रकार संघटनेचा कार्यकर्ता या गोंडस पदावलीच्या आवरणाखाली सुरू असतो. त्याला बळ मिळतं ते सोशल मिडियाचं. कोरोनाच्या विषाणू पेक्षाही वेगाने हा व्हायरस समाजमेंदू मध्ये प्रवेश करून नवथर तरुणांचा मेंदू पोखरत आहे. कोणे एकेकाळी आपल्याकडे जाती व्यवस्था प्रबळ होती हे जितके प्रखर सत्य आहे तितकेच ही व्यवस्था मोडीत काढण्याचे कार्य आपल्याकडील संतांनी केले हे देखील वास्तव आहे. याच संतांच्या समकालीन राजवटींचा इतिहास जर आपण पुन्हा एकदा मोडलेल्या जातींच्या चौकटीत नेऊन बसविणार असूत तर आपल्यासारखे कपाळ करंटे आपणच. त्याकाळी भलेही धर्माधिष्ठित राजवटी निर्माण झालेल्या असल्या तरी राज्य विस्तारासाठी होणाऱ्या संघर्षात धर्म संघर्ष नव्हता. धर्मदंड आणि राजदंड दोन्हींची स्थापित ठिकाणे वेगळी होती. आता धर्मदंड आणि राजदंड दोन्ही हातात उंचावित सत्ताकारण करण्याचे दिवस आल्याने इतिहास देखील आता राजकारण्यांच्या जिभेवर झिरपू लागला आहे.

मुळातच भारतीय इतिहासाचे लेखन हे इतिहासकालीन घटना घडल्यानंतर तात्काळ लिहिलेले लेखन नाही. एखादी घटना घडून गेल्यानंतर बराच काळ उलटून गेल्यावर त्यावर लिखाण झालेले आहे. शिवाय त्या – त्या राजदरबारी सेवा रुजू केलेल्या लेखनिकाच्या लेखणीतून ते प्रसवलेले आहे. त्यामुळे त्या लेखनातही मांडलिकत्व स्वीकारलेले दिसते. म्हणजेच उपलब्ध ऐतिहासिक लेखन हे शंभरटक्के सत्य प्रमाण मानणे देखील शंकास्पद ठरू शकते. एकतर हे लिखाण संस्कृत, फारसी, उर्दू, मोडी, राजदरबारी सांकेतिक भाषा, प्रादेशिक बोलीभाषा आणि इंग्रज राजवटीत इंग्रजी भाषेत नोंदवून ठेवलेले टिपण म्हणजे भारतीय इतिहास आहे. मूळ प्रसंग घडल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर ऐकीव माहिती, पिढी दर पिढी सांगत आलेल्या गुजगोष्टी यावर इतिहासाची मदार आहे. त्यामुळे इतिहासातील एकाच प्रसंगाचे वर्णन वेगवेगळ्या इतिहासकारांकडून त्यांच्या शैलीला अनुसरून वेगवेगळ्या पध्दतीने समोर आलेले दिसते. बराच कालावधी उलटून गेल्यानंतर लेखन केले असल्याने साधार पुराव्या पेक्षाही तर्काला अधिक प्राधान्य दिलेले आढळते. त्यातही परकीय आक्रमणात वेळोवेळी भारतीय इतिहासाचा मूळ दस्तऐवज बऱ्याच अंशी नष्ट झाल्याने पुढे तर्कावर आधारित आणि लोकवदंतेवर आधारित लिखाण झालेले दिसते. ब्रिटिशांनी आपल्या डायरीमध्ये नोंदवलेल्या नोंदी ह्या प्रमाणित आहेत. ते लिखाणाबाबत खूप प्रामाणिक होते हाच निखालस खोटा प्रचार स्वातंत्र्यानंतरही चार पिढ्या आपल्या मानगुटावर बसविण्यात जनरल मेकांले याची शिक्षणपद्धती यशस्वी ठरली. फोडा आणि झोडा हे तंत्र विकसित करताना बहुभाषिक आणि बहुधर्मीय भारतीयांच्या इतिहासाचे खरे विद्रुपीकरण तर याच काळात झाले. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या लिळा चरित्रातील सात आंधळ्यांना हत्ती कसा दिसला ? या दृष्टांतानुसार भारतीय इतिहासाकडे बघण्याची गरज निर्माण झाली आहे.
इतिहासाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन मी नव्याने सांगत नाही हे नम्रपणे नमूद करतो. आपल्या अगोदरच्या पिढीला हे ज्ञात आहे. पण गेल्या काही वर्षात समाजसेवेच्या नावाखाली ज्या काही जाती संघटनांचे पेव फुटले. त्यांनी इतिहासाचे संदिग्ध आणि कच्चे दुवे अन्यायकारक असल्याची हाकाटी पिटत समाजाआधार मिळविण्यासाठी व्यासपीठावर आणले. त्याला मतांचे राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी हत्त्यार समजून परजले. लॉर्ड थॉमस मेकॉले याला अभिप्रेत असलेली शिक्षणपद्धती स्वीकारीत आपण गुलामी मानसिकता पोसत गेलो. आज स्वातंत्र्यानंतर देखील बहुधर्मिय आणि बहुजातीय असलेल्या लोकशाहीत लॉर्ड मेकॉले याची पिलावळ इतिहासाची मोडतोड आणि विद्रुपीकरण करायला पुढे सरसावलेली दिसते. व्हॉटस् अप, फेसबुक, ट्विटर सारख्या समाज माध्यमांच्या मुक्त विद्यापीठाचे स्वयंघोषित कुलगुरू म्हणून हीच पिलावळ रोज गरळ ओकताना दिसत आहे. आता इतिहासातील कच्च्या दुव्यांना जाती द्वेषाचे बीज समजून विषवल्लीची लागवड केली जात आहे. यासगळ्या प्रदूषित वातावरणात सरळ सरळ तुमच्या इतिहासाला अरबी समुद्रात नेवून बुडवायचे का ? थॉमस मेकॉलेला हेच तर हवे होते. स्वातंत्र्यानंतर ही विघटनवादी विचारांची पाळेमुळे या समाजाला काढता येवू नयेत. तेच तर आत्ता घडतंय. तुमचा इतिहासच बुडवला तर तुमचा उज्ज्वल भूतकाळ पुसल्या जाईल. ज्यांना भूतकाळ नसतो त्यांना भविष्यकाळ ही नसतो. केवळ वर्तमानाची वटवाघळे म्हणून जिणे हाती असते. इतिहासाचा त्यालाच अभिमान असतो ज्याला उद्याचे भविष्य घडवायचे असते. म्हणूनच उपजिविकेसाठी का होईना आपल्या पूर्वजांचा स्फूर्तीदायी इतिहास कथन करणारे गड – किल्ल्यांवरील गाईड मला इतिहासाचे खरे अभ्यासक वाटतात. ते कधी वादंग माजविणारे ऐतिहासिक विधाने करीत नाहीत. किंवा अश्या वादांना पाठिंबा देखील देत नाहीत. गाईडच्या वादग्रस्त कथनामुळे महाराष्ट्रात वाद पेटला असे एकतरी उदाहरण आहे का….?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा