- महाराष्ट्र हा गड – किल्ल्यांचा प्रदेश. मऱ्हाटी संस्कृती आणि संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला प्रदेश.
- गड – किल्ल्यांची सफर करायचा नुसता विचार जरी मनात आला, तरी डोंगर – दऱ्यांनी लपेटलेली हिरव्यागार वनराईची शाल, दऱ्याखोऱ्यात ‘ घुम – घुम् ‘ आवाज करीत घुमणारा तो बेलाग वारा अन् शतकानुशतकांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी बळ एकवटून उभ्या असलेल्या एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या पण आता भग्नावस्थेत पोहोचलेल्या दगड – चुन्याच्या इमारती चटकन डोळ्यासमोर तरळतात.
- कोणत्याही गड – किल्ल्यांची सफर करायची म्हणजे ऐतिहासिक स्थळापर्यंत नेणारा एक वाटाड्या हवा असतो. त्या बरोबरच अगदी आत्मीयतेने तुमचं स्वागत करणारा एक आप्त बंधू, मित्र, मार्गदर्शक, गाईड हवा असतो.

कोल्हापूर पासून अवघ्या २०-२२ किलोमिटर अंतरावर असलेल्या किल्ले पन्हाळगडावर कधी मुशाफिरी केली आहे का..? तर तुम्हाला ‘ राजाची झोपडी ‘ आणि प्रवेशद्वारावरच अतिशय आत्मीयतेने ” या पाव्हणं….राजाच्या झोपडीत तुमचं स्वागत आहे ” असं म्हणत दिलखुलासपणे स्वागत करणारा डॉ. राज होळकर ही मैत्र जपणारी व्यक्ती नक्कीच माहीत असेल. माहीत नसेल तर एकदा जावून पहा….एका भेटीत देखील हा राजा कुणाचाही चटकन मित्र बनून जातो. बरं ही मैत्री फक्त तेव्हढ्या सफरी पुरती नसते बरं का..! राजा तुमचा आयुष्यभराचा मित्र बनून जातो.

डॉ. राज होळकर आणि माझ्या मैत्रीतील दुवा म्हणजे कोल्हापूरचा माझा मित्र आणि प्रसिध्द नाट्यलेखक विद्यासागर अध्यापक. हा देखील कोल्हापूरला येणाऱ्या कलावंतांच्या, मित्रांच्या स्वागतासाठी तत्पर असणारा….येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करणे ही रांगड्या कोल्हापूरकरांची ‘ खासियत ‘ असावी. तर डॉ. राज होळकर आणि डॉ. नीता होळकर या दाम्पत्याची ओळख झाली ती या माध्यमातून पण गहिरी मैत्री व्हायला आणखी एक कारण आहे, मी सोलापूरचा आहे अन् डॉ. राज होळकर यांची सोलापूर ही ‘ प्रेमभूमी ‘ आहे. १९७७ मध्ये डॉ. राज होळकर हे एमबीबीएस शिक्षणासाठी सोलापुरातील डॉ. व्ही.एम.मेडिकल कॉलेज मध्ये दाखल झाले. इथेच त्यांना आयुष्याची जीवनसाथी डॉ. सौ. नीता होळकर भेटल्या. त्यादेखील त्यांच्या सोबतच एमबीबीएस शिकत होत्या. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. राज आणि डॉ. नीता होळकर यांनी पन्हाळा आणि परिसरातील वाड्या वस्त्यांवरील गोरगरिबांची आरोग्यसेवा अतिशय निर्लेप भावनेने सुरू ठेवली. डॉ. राज आणि डॉ. नीता यांची मुले प्रीतमकुमार आणि निलमकुमार हे दोघेही अमेरिकेत नॅनो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने कॅन्सर बरा करण्यावर संशोधन करीत आहेत. तर डॉ. राज यांचे बंधू जयदीप हे देखील आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. पन्हाळ्यावर फक्त डॉ. राज, डॉ.नीता आणि डॉक्टरांच्या नव्वदी पार केलेल्या मातोश्री एव्हढेच राजाच्या झोपडीत राहतात.
रुग्णसेवा, मित्रप्रेम, कथा – कविता, कलाप्रेमी डॉ. राज होळकर यांच्या भोवती सतत जसा माणसांचा गराडा असतो, अगदी तसाच गराडा वन्य प्राण्यांचा देखील असतो. बिबट्या, रानडुक्कर, साळिंदर, रानमांजर पाहुणचार झोडायला राजाच्या झोपडीत येणे अगदी नित्याचेच झाले आहे. पूर्वी शिकारीचा नाद असलेल्या डॉ. राज यांनी आता शिकार करणे सोडले आहे. निसर्गप्रेमी असलेल्या राजाला प्राणी हत्त्या आता अमान्य आहे. आपल्या राजाच्या झोपडी भोवती सीसीटीव्ही कॅमेरे लावून स्वसंरक्षण करणारा राजा आता हिंस्त्र प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी बंदुकीचा ‘ बार ‘ आकाशात उडवतो. आजवर पाहुणा म्हणून आलेल्या बिबट्याने राजाच्या चोवीस कुत्र्यांची ‘ शिकार ‘ केलेली आहे. पण अतिथी देवो भव म्हणणाऱ्या राजाने निसर्ग चक्राच्या विरोधात जात बिबट्याची शिकार केली नाही. अगदी परवा – परवा बिबट्याने राजाच्या पाळलेल्या शिकारी कुत्र्याची शिकार केली. राजाने सीसीटीव्ही फुटेज आपल्या दोस्त कंपनीला मोठ्या कौतुकाने दाखवले. काहींनी काळजीवाहू अनाहुत सल्ले दिले. पण राजाचे प्राणीप्रेम तसूभरही कमी झाले नाही.

काल – परवा परत राजाच्या भेटीचा योग आला. डॉ. राज होळकर यांच्या मित्रप्रेमाने आकर्षित झालेल्या दै. दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीचे युनिट हेड नौशाद शेख यांनी सरळ पन्हाळा ट्रिपचे आयोजन केले. दिवाळी उत्सवानिमित्त जाहिरात उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल आपल्या सहकाऱ्यांना प्रवास आणि जल्लोषाचा आनंद देण्यासाठी पन्हाळा ट्रीपचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. राज होळकर यांना निरोप धाडताच सगळा चोख बंदोबस्त त्यांनी केला होता. डॉ. राज यांच्या या अगत्यशील व्यवस्थेने नव्या मित्रांची जोडणी झाली. रुग्णसेवेत कधी पैसे कमावणे कटाक्षाने टाळलेल्या राजाने आपल्या गोड स्वभावाने माणसे मात्र कमावली…राजाच्या झोपडीच्या दिशेने पाहुण्यांच्या पावलांची गर्दी वाढतच जावो एव्हढीच आता मनोकामना…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा