बालपणी मनावर कायमची कोरल्या गेलेली स्मृती स्थळे..!

मला वाटतं भ्रमंती हा माणसाचा स्थायी भाव असावा किंवा फारतर भ्रमंती म्हणजेच आयुष्य असं म्हणायला हरकत नाही. फक्त यातली गंमत एकच असते, ही भ्रमंती खूप उशिराने आपल्या आठवणीत येते. मग मेंदूमध्ये आकाराला आलेल्या ‘ त्या ‘ स्मृती स्थळांचा मनाच्या वेगाने आपण पाठलाग करायला लागतो. पुन्हा एकदा भटकंती करीत ती स्थळे पाहण्याची मनाला ओढ लागते. हे असं सगळ्यांच्याच बाबतीत होत असतं. आता मलाही या विषयावर लिहायची ‘ सुरसुरी ‘ आलीय ना ती याच ‘ नॉस्टॅल्जिया ‘ मधून. अस्मादिकांचे पिताश्री कै. मधुकरराव हिंगणे हे साखर कारखान्यात ‘ यांत्रिकी अभियंता ‘ म्हणून नोकरी करीत असल्याने ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या उक्तप्रमाणे पगारवाढीच्या आमिषाने महाराष्ट्रातील अनेक कारखान्यातून वडिलांनी सेवा बजावली. याकाळात मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होवू नये म्हणून आम्ही मुले आईसोबत रहायचो. १९७७ चा काळ होता. वडील दुसरबीड ( जि.- बुलढाणा ) येथील कारखान्यावर नोकरीला होते. तर आम्ही मुले आईसह बीड येथे शिक्षणासाठी घर भाड्याने घेवून राहिलो होतो. माझे मोठे मामा मधुकरराव काळे हे शासकीय सेवेत बीड येथेच होते. त्यामुळेच आमच्या शिक्षणासाठी बीड शहराची निवड केली होती. मामाच्या घराजवळच करीमपुऱ्यात आम्ही रहात होतो. राजस्थानी विद्यालयात प्रवेश घेतलेला होता. तेंव्हा मी सातवी इयत्तेत होतो. दर रविवारी कंकालेश्र्वर जल मंदिर किंवा टेकडी वरच्या खंडेश्र्वरी दिपमाळेवर दिवसभर हुंदडायला जायचे हे नित्याचे बनले होते. बीडचे ऐतिहासिक महत्त्व हा विषय समजण्या एव्हढे वय नव्हते ते. पण कंकालेश्र्वर मंदिराभोवती असलेल्या चौरस आकारातील तलाव आणि त्यात असलेले रंगीत मासे हा बालपणाचा आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू असायचा. वेगवेगळ्या रंगाचे मासे पण असतात. हे तेंव्हा समजले. कंकालेश्र्वराचे दर्शन घेतले की तलावाच्या पायऱ्यांवर पाण्यात पाय सोडून तासनतास बसायचं. माश्यांना सोबत आणलेले चुरमुरे, लाह्या टाकल्या की झुंडीच्या झुंडी गोळा व्हायच्या. पाण्यात सोडलेल्या पायांच्या तळव्याला हलकेच स्पर्श करणाऱ्या माश्यांमुळे ‘ गुदगुल्या ‘ व्हायच्या. हा खेळ तासनतास खेळण्याची मजा पुन्हा कधीच मिळाली नाही.

करीमपुऱ्यापासून अगदी पायी चालत जाता येईल एवढ्या अंतरावर टेकडीवर असलेली खंडोबाची दीपमाळ हे एक आमच्या बालपणी आकर्षणाचे ठिकाण होते. विटा आणि चून्यातून तयार झालेली सत्तर फूट उंचीची दीपमाळ जवळपास तीनशे वर्ष जुनी आहे. हे आत्ता समजते. त्या वयात एव्हढी वर्ष मोजण्या इतपत उजळणीचे पाढे देखील पाठ नसायचे. जगात सर्वात उंच मनोरा हाच असेल जिथून स्वर्ग जवळ असावा असा आमच्या बालबुद्धीचा शोध असायचा. खंडोबा प्रसन्न झाला तर तो आपल्याला स्वर्गात जाण्यासाठी शिडी देईल या समजापोटी आम्ही वर्गमित्र दिपमाळेकडे आशाळभूतपणे पहायचो. दिपमाळेचा दगडी चौथरा चांगला चार – साडेचार फूट उंचीचा असल्याने त्या कठड्यावर चढल्या शिवाय पाच मजली दिपमाळेच्या गगनचुंबी अनुभूतीचा थरार अनुभवायला मिळत नसल्यामुळे खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांपैकी कुणाला तरी विनंती केली की ते आपल्या बखोट्याला धरून भिरकावत कठड्यावर पोहोचवायचे. मग तिथून आतील बाजूने असलेल्या जिन्याने पायऱ्या चढत दिपमाळेचा एक – एक मजला पार करायचा. प्रत्येक मजल्यावर तीनही बाजूंनी असलेली खुली गवाक्षे अगदी क्षितिजा पर्यंतचा परिसर नजरेत भरून घेण्यासाठी आपल्या समोर सताड खुली असतात. अरुंद बोळाचा जिना चढून गेल्यावर जो काही शिनवटा येतो तो गवाक्षातून येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या झुळकी सोबत क्षणार्धात नाहीसा व्हायचा.

या दिपमाळांचे आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे या दिपमाळेवर कोरण्यात आलेल्या मुर्त्या आणि नक्षीकाम… विटांवर कोरलेल्या मुर्त्या आणि नक्षीकाम फार अभावानेच पहायला मिळते. बालपणी मनावर कायमची कोरलेली जी काही स्मृतीस्थळे आहेत त्यामध्ये बीडची ही दोन स्थळे आजही खुणावतात. आजही प्रवासात बीड मार्गे येताजाता गाडीच्या खिडकीतून दीपमाळा दिसल्या की बालपणीच्या स्मृती चाळवतात.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

11

)

  1. aaliya sayyad

    Nice 👍👍👍

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद आलिया 🙏🙏🙏

      Liked by 1 person

  2. kekaderajesh

    पर्यटन हा विषय मुळातच अतिशय सखोल आहे. त्यातही बालपणीच्या आठवणीत ताज्या होणाऱ्या काही सुंदर स्थळे आठवली अथवा पाहिली की मन कसं प्रफुल्लित होऊन जातं….
    . (बालबुद्धी:-मला सुद्धा बालपणी “बीड”म्हटलं की बिडी चं माहेरघरच आहे,असं वाटायचं….😂😂)

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      बालबुद्धीची विशेष टीप आवडली. 😄😄

      Liked by 1 person

    2. मुकुंद हिंगणे

      मित्रांनो, सोशल मीडियावरून मी आपल्याला माहीत व्हावे म्हणून जरी प्रत्येक आर्टिकल शेअर करीत असलो आणि आपण वाचून त्यावर कमेंट देत असला तरी त्यासर्व कमेंट ब्लॉगवर उमटण्याची आपण माझ्या avatibhavati.in या ब्लॉगला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे. 🙏🙏

      Like

  3. rituved

    मस्त 👌

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद ऋतुवेद 🙏🙏

      Like

  4. Rakesh Narwani

    👍👍👍👍👍👍👍👍

    Liked by 1 person

  5. Vijay Pawar

    खरंच बालपण खूप गमतीच असत

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      होय खरंय…

      Like

      1. Vijay Pawar

        होय खरंच आहे

        Liked by 1 person