
मागच्या आठवड्यात माझे व्यावसायिक मित्र राकेशजी नारवानी हे कामानिमित्त दिल्ली मुक्कामी होते. जाताना आणि येताना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीनही टर्मिनल वर साक्षात् प्रभूरामचन्द्र,सीतामाई,लक्ष्मणाला वानरसेना आणि बजरंगबलीसह शॉपिंग गॅलरीत रावण सेना आणि महा पराक्रमी लंका अधिपति रावण यांच्याशी भीडताना हजारो विदेशी पर्यटकांनी पाहिले. उत्तर भारतात ‘ रामलीला ‘ हा प्रचलित आणि पुरातन नाट्य प्रकार असला तरी कुठल्याही मैदानावर आयोजित केला जाणारा हा नृत्यनाट्य प्रकार आजवर कधीच दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सादर झालेला नाही. स्वातंत्र्य मिळवताना खऱ्या ‘ रामराज्या ‘ ची संकल्पना पहिल्यांदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मांडली होती. मात्र पुढे स्वतंत्र भारतात प्रभुराम हे अप्रत्यक्षपणे निवडणुकांमधून मतपेटीचे ‘ सिम्बॉल ‘ बनले. सनातनी अर्थात वैदिक धर्माचे हृदय असलेले प्रभू रामचंद्र आपोआपच वैदिक धर्म अर्थात आजच्या प्रचलित कडव्या हिंदुत्वाचे प्रतीक बनले. लोकशाहीतील अनेक राजकीय विचारधारा मधून प्रत्येकाचा वेगळा ‘ राम ‘ तयार झाला. सतयुगातील चौदा वर्षे वनवास भोगून परत अयोध्येचा राज्यकारभार पाहणाऱ्या प्रभू रामचंद्र यांना कलियुगात मात्र नृत्य नाट्याच्या रूपाने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाय ठेवायला चक्क पंच्याहत्तर वर्षे लागली.
हिंदू सभ्यता, धर्म संस्कृती मध्ये जरी असंख्य देव – देवतांचे पूजनीय असे अधिष्ठान असले तरी मन में राम, तन मे राम ही रामराज्याची संकल्पना अगदी पुरातन काळापासून भारतीयांच्या तन- मनात भिनलेली आहे. म्हणूनच पूर्वीची राजेशाही असो अथवा स्वातंत्र्यानंतरची लोकशाही असो रामराज्याची संकल्पना मांडत राजकीय पक्षांना मतांचा ‘ जोगवा ‘ मागावा लागतो. कारण भारतीय विचारधारेत, इथल्या सभ्यतेत, संस्कृतीमध्ये ‘ राम ‘ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच नृत्य नाट्य रुपात का होईना आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाऊल ठेवल्या – ठेवल्या विदेशी पर्यटकांना भारतीय सर्वकालीन प्रचलित अश्या ‘ रामायण ‘ कथानकातील महानायक प्रभू रामचंद्र यांचे दर्शन झाले. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तीनही टर्मिनल वर शॉपिंग एरियात दि. १४ ते २३ ऑक्टोंबर या दहा दिवसांच्या काळात दहा मिनिटांचे विविध ठळक घटनांचा समावेश असणारे रामायण नृत्य नाट्य दिवसभरात एकूण सहा वेळा म्हणजे साठ मिनिटे सादर झाले. दहा दिवसात एकूण चौदा तासांचे रामायण नृत्य नाट्य रूपाने दिल्ली विमानतळावर पहिल्यांदाच सादर झाले. दिल्लीच्या ‘ नृत्यांश प्रोडक्शन’ या संस्थेच्या नितीन शर्मा आणि दिग्दर्शिका रितू शर्मा या दोघांनी हा उपक्रम राबविला आहे.
रामायण हे नृत्य नाट्य सादर करीत भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचा वारसा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेल्या ‘ नृत्यांश प्रोडक्शन’ या संस्थेचे प्रमुख नितीन शर्मा यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांना देखील आपली दखल घेतल्याचे अप्रूप वाटले. संस्थेमार्फत ते सामाजिक विषयाची मांडणी करणाऱ्या नृत्य नाटिका देखील ते सादर करीत असतात. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्यांदाच सादर होत असलेल्या रामायणाची दखल ‘ avatibhavati ‘ ब्लॉगवर घ्यावी म्हणून मित्रवर्य राकेश नारवाणी यांनी नितीन शर्मा यांची भेट घेवून त्यांचा मोबाईल क्रमांक मिळविणे, व्हिडिओ क्लिप मिळविणे हे सगळे सोपस्कार पूर्ण केले. राजकीय पक्षांमध्ये असलेला राम, सर्वसामान्यांच्या हृदयात विसावलेला राम, नृत्य नाट्यातून विमानतळावर सुमारे चौदा तास वास्तव्य केलेला राम आणि विदेशी पर्यटकांना भेटलेला राम वेगवेगळा कसा असेल ? काया, वाचा, मनी सदैव राम वसे हीच भारतीय सभ्यता आणि संस्कृती. यापेक्षा दिवाळीच्या वेगळ्या ‘ भेटी ‘ ची अपेक्षा का धरावी……?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा