एक सिनेमा सत्तांतर घडवू शकतो का ?

अलीकडच्या काळात राजकीय व्यक्तींवरील चित्रपट बनविताना ते अधिक चर्चेत यावेत म्हणून वादग्रस्त आणि वास्तववादी बनविण्याचा ‘ट्रेण्ड’ भारतीय चित्रपट क्षेत्रात दिसत आहे. समाजावर चित्रपटांचा प्रभाव पडतो. या एकाच प्रचारवादी तत्वाला हाताशी धरून राजकीय क्षेत्रात उलथापालथ घडविणारे यापूर्वीही चित्रपट येवून गेले आहेत. पण खळबळ उडवून देण्याबरोबरच ‘गल्ला’ जमवण्याचा उद्देश साध्य झाल्यानंतर असे चित्रपट पडद्यावरून कधी गायब झाले ? याचा मागोवा फारसा कुणी घेतला नाही. कधीतरी चित्रपट समीक्षाच्या गोळाबेरजेच्या आढाव्यात समीक्षक मंडळी अश्या चित्रपटांचा धावता उल्लेख मात्र आवर्जून करताना दिसतात. अगदी ‘आंधी’ पासून सुरू झालेला हा सिलसिला ‘द अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’, ‘ठाकरे’, ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटांपर्यंत येवून ठेपला. याकाळात राजकीय वातावरण ढवळून काढणारे अनेक चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतले. रेकॉर्डब्रेक कमाई देखील झाली. मात्र एखाद्या चित्रपटामुळे सत्तांतर झालेले निदान भारतात, महाराष्ट्रात पहिलेच उदाहरण ठरावे. १३ मे २०२२ रोजी एकाचवेळी महाराष्ट्रातील चित्रपटगृहातून प्रदर्शित झालेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा मराठी चित्रपट शिवसेना पक्षाच्या विभाजनाचा आणि त्यातून महाराष्ट्रात सत्तांतराचे नाट्य घडविणारा ठरत आहे की काय असे वाटावे इतके स्वप्नवत कथानक सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. ठाण्याचा ‘ढाण्या वाघ’ अशी ओळख मिळविलेल्या शिवसेना नेते, धर्मवीर कै. आनंद दिघे यांच्या संघर्षमय जीवनपटाची मांडणी करणारा हा मराठी चित्रपट ‘दिघे’ यांच्या असामान्य कर्तुत्वाला नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यात जितका यशस्वी झाला त्यापेक्षाही अधिक शिवसेनेत बंड करीत बाहेर पडलेल्या दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्यात यशस्वी ठरला आहे असेच म्हणावे लागेल.

देशात निवडणुकांचे वातावरण असेल तर त्या पार्श्वभूमीवर आलेले चित्रपट काही प्रमाणात राजकीय पक्षांना, नेतृत्वाला हानिकारक ठरतात. कारण ज्याप्रमाणे चित्रपटांचे कथानक हे भावनिक मुद्द्यांना हात घालणारे असते. अगदी त्याच पद्धतीने राजकीय पक्षांचा प्रचार देखील भावनिक मुद्द्यांना ‘हवा’ देणारा असाच असतो. चित्रपट आणि राजकारण किंवा समाज यांच्या संदर्भात महत्वाचा मुद्दा असतो तो वास्तव चित्रणाचा. त्यामुळे अश्या राजकीय चित्रपटातून जे व्यक्ती चित्रण केले जाते ते कितपत वास्तव असते ? या प्रश्नाबरोबरच त्यातून संबंधित व्यक्ती किंवा राजकीय पक्ष यांच्या प्रतिष्ठेला कितपत फायदा किंवा नुकसान होते हा विषय नेहमीच चर्चेचा होत राहिला आहे. म्हणूनच ‘धर्मवीर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दिघे कुटुंबियांना किती फायदा झाला यापेक्षा दिघे यांचे शिष्य असलेले एकनाथ शिंदे यांना किती फायदा झाला हा विषय समाज माध्यमातून चर्चिला गेला. नुकसानीचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांचे सर्वात जास्त नुकसान करणारा हा चित्रपट ठरला. धर्मवीर कै. आनंद दिघे यांची पक्षनिष्ठा आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती असलेल्या श्रध्देचे उदात्तीकरण करताना स्व. बाळासाहेबांच्या पश्चात असलेली शिवसेना आणि त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे पक्षनेतृत्व अवतीभवती जमलेल्या कोंडाळ्यात अडकल्याची जाणीव करून देते. हाच सुरुंग काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जवळीक साधत सत्तेवर बसलेल्या उद्धव ठाकरे यांना पदभ्रष्ट करणारा ठरला आहे. ‘गद्दारांना क्षमा नाही’ असं स्लोगन पोस्टरवर ठळकपणे उमटवत आलेल्या या चित्रपटाने पुढे काही दिवसातच शिवसेनेतील उभ्या फुटीची नवी स्क्रिप्टच मांडली. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पुढे काही दिवसातच एकनाथ शिंदे यांचे बंड आणि ठाकरे सरकार बरोबरच शिवसेना कोसळण्याचे जे नाट्य महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडले हा निव्वळ योगायोग समजायचा का ?

स्वामिनिष्ठा आणि गुरुप्रति आदरभाव व्यक्त करणारा धर्मवीर सिनेमातील सीन प्रेक्षकांना जितका भावनिक करणारा आहे तितकाच हा सीन राजकीय अभ्यासकांना हादरवून सोडणारा आहे. या दृश्यात स्व.बाळासाहेब यांची गुरुपौर्णिमेनिमित्त पाद्यपूजा करण्यासाठी आलेल्या धर्मवीर कै. आनंद दिघे यांना स्व. बाळासाहेब विचारतात, हे सोबत आणलेले दाढीवाले कोण ? ज्यात तरुण कार्यकर्ते एकनाथ शिंदे देखील असतात. तेंव्हा कै. आनंद दिघे म्हणतात की हे उद्याचे भविष्य आहे. हा एकच सीन सत्तांतराच्या नाट्याचे सूतोवाच करणारा आहे हे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जागे करणारा असाच होता. त्यानंतर पाद्यपूजेवरून परतताना वाटेत गाडी थांबवून एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी धर्मवीर आनंद दिघे यांची पाद्यपूजा करतात. तुम्ही तुमच्या गुरूंची पूजा केली आता आम्ही आमच्या गुरूंची पूजा करतो. या आशयाचा संवाद त्यावेळी आहे. कदाचित मी पटकथा लेखक नसल्याने चित्रपटातील संवाद जसेच्या तसे नसतील पण आशय मात्र उघड आहे. आता यातून खुपकाही स्पष्टपणे समजण्यासारखे आहे. संपूर्ण राज्याची आणि पक्षाची धुरा खांद्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना चित्रपट पाहून काहीच समजला नाही असं म्हणणं ‘हास्यास्पद’ ठरेल.

मतदानावेळी जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी, हिंदुत्ववादी विचारांना साथ देण्यासाठी सोबत ४० आमदारांना घेत पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथराव शिंदे यांनी प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत नुसतेच उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार केले नाही तर ‘खरी शिवसेना आमचीच’ म्हणत पक्षाचे ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्यापर्यंत हा अंतर्गत संघर्ष नेला. याकाळात सामान्य शिवसैनिकांना भडकावणारे शब्दप्रयोग आणि भाजपाला दूषणे देणारी ‘पारायणे’ करण्यातच शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे यांनी धन्यता मानली. शिवसेना हा शब्दच मुळात मराठी माणसांच्या नसानसात स्फुल्लिंग चेतवणारा आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला तो अमूल्य वारसा आहे. हा वारसा जपत पुढच्या पिढीला देताना अक्षम्य असा निष्काळजीपणा कुणाचा झाला ? राजकीय डावपेच आणि न्यायालयीन लढाईत होणाऱ्या नुकसानीचा अंदाज घेण्यात उद्धव ठाकरे सपशेल कमी पडले आहेत. खरं म्हणजे यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिकांची माफी मागितली पाहिजे. ‘जो बुंद से गई वो हौद से नही आती’ या उक्तीप्रमाणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावाने आपल्या पक्षाची नव्याने ‘मोट’ बांधणे हे उद्धव ठाकरे यांना किती सोपे होईल हे नजीकच्या काळात समजेल. कदाचित अंधेरीची पोटनिवडणूक आणि मुंबई महापालिकेची निवडणूक देखील ठाकरे यांना विजय मिळवून देणारी ठरेल. पण ‘ शिवसेना’ नावाच्या ५६ वर्षे तळपलेल्या अस्मितेला धुळीस मिळविण्याचा जो गलथानपणा झाला त्याचे ‘पापक्षालन’ कोण करणार ?

आता ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावाने खरी शिवसेना म्हणत नव्या पक्षाची ‘मोट’ बांधणारे आणि भाजपाच्या ‘पॉवर गेम’च्या सहाय्याने महाराष्ट्रात सत्ता स्थापित करणारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासमोर आता ‘अग्निदिव्य’च आहे. अंर्तमनाची घुसमट थांबविताना बंड करीत स्वतंत्र चूल मांडणे हा काही गुन्हा होत नाही. राजकारणात हे अनेकवेळा घडले देखील आहे. मात्र हे करताना राजकीय डावपेचांचा भाग म्हणून पर्यायाने आपल्याच स्वपक्षीयांना अडचणीत आणणाऱ्या राजकीय खेळी ह्या ‘सूड नाट्य’ होवू नयेत याची दक्षता घेतच एकनाथराव शिंदे यांना पुढील वाटचाल करावी लागणार आहे. अन्यथा हा राजकीय ‘भावकी’चा वाद महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरेल. मूळ स्थानावरून ‘देव’ स्वतःहून स्थानांतरीत झाला तर ‘त्या’ स्थानाला पण तिर्थक्षेत्राचा दर्जा भाविक देतात. पण ‘देव आणि उपदेव’ उचलूनच नेणार असाल तर भक्तांच्या भक्तीमध्ये तेव्हढा जोर असेल तरच देव आणि उपदेव नव्या जागेत रमतात. हे एकनाथरावांनी कायम लक्षात ठेवावे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

3

)

 1. Ramdas Katkar

  nice

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद काटकरजी 🙏🙏

   Like

 2. smitahingne

  👍

  Liked by 1 person

%d bloggers like this: