भारतीय संस्कृतीची गंमतच न्यारी आहे. बदलत्या ऋतुमनाचे स्वागत असो किंवा धार्मिक रूढी-परंपरा असोत, सगळ्या सादरीकरणाला उत्सवाचं स्वरूप दिलेलं असतं. देवाधिकांच्या पूजनाचे सणवार असले तरी देखील सर्व समाज एकजिनसी रहावा असेच त्याचे उत्सवी स्वरूप योजून दिलेले आहे. सणवारात तर पुरुषवर्गापेक्षाही स्रीजातीचा अधिक आदराने समावेश केलेला दिसतो. नुकताच नवरात्र आणि दसरा उत्साहात संपन्न झाला. या नवरात्री पर्वात माहेरवाशीण म्हणून आलेल्या नवविवाहिता आणि तरुण मुलींचा ‘भोंडला’ हा पारंपारिक उत्सवी खेळ म्हणजे महिलावर्गासाठी पर्वणीच असते. अलीकडे नव्या पिढीला सोशल मीडियाच्या तावडीत सापडल्याने हा खेळ खेळायला सवड मिळत नाही. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांचा सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळ खेळला जातो. घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात, गच्चीवर, मोकळ्या जागेत, पटांगणात ‘भोंडला’ खेळला जातो. एका पाटावर ‘हत्ती’चे चित्र काढून त्याची पूजा केली जाते. पावसाळ्यातील हस्त नक्षत्राचा पाऊस व्हावा म्हणून हत्तीचे पूजन केले जाते. मग जमलेल्या तरुणी-मुली त्या पाटाभोवती फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणतात. काही ठिकाणी याला ‘हादगा’ तर विदर्भात याला ‘भुलाबाई’ म्हणतात. भूलोबा म्हणजे भगवान शंकर आणि भुलाबाई म्हणजे पार्वती. या भोंडल्याच्या गाण्यांमधून रूढी-परंपरा, चालीरीती, नातेसंबंध आणि सासर-माहेरच्या लटक्या भेदांचे वर्णन सुरेखपणे पेरलेले असते. आता चोविसतास मोबाईलमध्ये गुंतलेल्या युवापिढीला हा प्रकार खुळचट किंवा कालबाह्य वाटेल पण हीच भारतीय संस्कृती आणि समृद्ध परंपरा आहे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा