
स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमातून सोलापूर शहराने इतिहासात आपले अस्तित्व अग्रक्रमाने ठेवले आहे. महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशी ओळख असलेल्या श्री श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपती मंडळाची स्थापना ही १८८५ मध्ये झाली. याच गणपतीच्या पूजेसाठी आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुढे यातून प्रेरणा घेत महाराष्ट्रभर सार्वजनिक गणेशोत्सव राबविण्याची संकल्पना तडीस नेली. महाराष्ट्रातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मात्र सोलापूर अगोदर मुंबईत सुरू झाले होते. सोलापुरातील पहिल्या नवरात्रोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ ही जुन्या जमान्यातील प्रख्यात निर्माते-अभिनेता मास्टर भगवान यांचे धाकटे बंधू मारुती आबाजी पालव यांच्या प्रेरणेतून १९४३ मध्ये झाली. त्याकाळी ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीने सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण ढवळून निघालेले होते. संगीत मेळे, जलसे, व्याख्याने या माध्यमातून जनजागरण केले जात होते. सोलापुरात देखील असे कार्यक्रम व्हायचे. मास्टर भगवान यांचे धाकटे बंधू मारुती पालव हे मुंबईहून मेळा घेऊन सोलापूरला यायचे. त्याकाळी आझाद हिंद चौकात (आत्ताच्या मेकॅनिकी चौकात) सोलापुरातील तीन मजली टोलेजंग असे राजुशेठ उपाध्ये यांचे भारत भुवन नावाचे हॉटेल होते. या हॉटेलच्या समोरील मोकळ्या पटांगणात सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. सोलापूर दौऱ्यात मारुती पालव हे आझाद हिंद चौकातील जयभवानी लॉजवर मुक्कामी असायचे. भेटीगाठीतून मैत्री झालेले सोलापूरचे शेवटचे नगराध्यक्ष आणि पहिले महापौर पारसमल जयराम जोशी, विश्वनाथ पाटील, मंजन पुकाळे, पन्नालाल गुप्ता, मन्मथराव मेनकुदळे, मनोहर कोडगुळे, संगप्पा वाले, धोंडिबा धोत्रे, राजुशेठ उपाध्ये, भाऊ मार्डीकर या सामाजिक कार्यकर्त्यांना मारुती पालव यांनी मुंबईत सुरू झालेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव उपक्रमांची माहिती देवून सोलापुरात देखील सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्याची गळ घातली. यातून प्रेरणा घेत यासर्व मंडळींनी १९४३ मध्ये आझाद हिंद चौक नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना केली. त्याकाळी सोलापुरात नगरपालिका अस्तित्वात होती. ब्रिटिश कलेक्टर आणि नगरपालिकेची रीतसर परवानगी घेवून सुरू झालेले सोलापुरातील हे पहिले सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आहे. मंडळाचे यंदाचे ७९ वे वर्ष आहे. याकाळात मंडळाने पाचवेळा आदिशक्तीची मूर्ती बदलली आहे. तर दोन वेळा रथ बदलला आहे.
सोलापूर शहराशी पालव कुटुंबाचे एक वेगळेच नाते जोडलेले होते. त्याकाळी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले मास्टर भगवानदादा यांचे वडील आबाजी पालव हे मील कामगार होते. स्वतः भगवानदादा सिनेमाक्षेत्रात येण्यापूर्वी मील मध्ये काम करीत असत. सोलापूर हे गिरणगाव असल्याने मील कामगार कुटुंबातून आलेल्या पालव बंधूंबद्दल सोलापूरकरांमध्ये विशेष आत्मीयता होती. त्यामुळे मारुती पालव यांच्या संगीतमेळ्याला सोलापुरात प्रतिसाद मिळायचा. दरवर्षी मेळा सादर करण्यासाठी येत असल्याने त्यांचा मित्रगोतावळा देखील वाढलेला होता.
आजमितीस सोलापूर शहरात साडेचारशे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे कार्यरत आहेत. महाराष्ट्रात मुंबई नंतर सर्वाधिक जल्लोषात सार्वजनिक नवरात्रोत्सव सोलापुरात साजरा होतो. देवीचे मंदिर असणाऱ्या शहरातील मंदिराचा नवरात्रोत्सव वगळता सार्वजनिक ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करण्याचे प्रमाण सोलापुरात अधिक आहे हे नमूद करावेसे वाटते. घटस्थापनेच्या दिवशी पारंपारिक ढोल-ताशा, बेंजो आणि लेझीमच्या ठेक्यावर प्रतिष्ठापनेसाठी निघणाऱ्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या मिरवणुका लक्ष वेधून घेतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम खेळणारे मंडळाचे कार्यकर्ते, गुलाल-अरगजाची उधळण आणि ‘आई राजा उदो-उदो’चा जयघोष आसमंत दणाणून सोडतो. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात कोणतेच सार्वजनिक उत्सव साजरे झाले नव्हते. यंदाच्या वर्षी मात्र ही कसर मंडळांनी भरून काढली आहे. गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्रोत्सव देखील जल्लोषात होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘शोलापूर’ असलेले हे शहर आता ‘उत्सवाचे शहर’ म्हणून ओळखले जात आहे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा