भारतीय राजकीय पक्षांची टेराकोटा फौज

आदीमकाळापासून भाजलेल्या मातीच्या (टेराकोटा) वस्तू तयार करणाऱ्या मनुष्याने अश्मकाळापासून धातूकाळ आणि यंत्रयुगातील प्रगतकाळापर्यंत झेप घेतलेली असली तरी आपल्या आदिम खुणा तो पुसू शकलेला नाही. इसवीसन पूर्व २२१ म्हणजेच जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी चीनचा पहिला सम्राट किन शी हुअंग (Qin Shi Huang) याने आपल्या बलाढ्य फौजेच्या जोरावर चीनवर आपले मजबूत साम्राज्य निर्माण केले होते. मृत्यूनंतरही एक जीवन असते या विचारांचा पगडा असणारा तो काळ होता. मृत्यूनंतर आणखी एक जग आहे हा विचार सर्वच प्रांत, भाषा आणि जातीधर्मात रुजलेला होता. या विचारातूनच मृत्यूनंतर हेच वैभवशाली आणि ऐश्वर्यसंपन्न आयुष्य उपभोगायला मिळावे म्हणून राजे, सम्राट, महान व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या सेवेसाठी मनुष्यबळी देण्याची प्रथा होती. अश्यावेळी अश्या महान व्यक्तीला अंत्यसंस्कारावेळी पुरताना त्याच्या थडग्यात त्याची जिवंतपणी सेवा करणाऱ्या लाडक्या गुलामांना जिवंत पुरले जायचे. क्लिओपात्राने मृत्यूचा स्वीकार करताना पिरॅमिडमध्ये आपल्या सोबत दास-दासींना देखील घेतले होते. अशी अनेक उदाहरणे सापडतात. मृत्यूपश्चात जीवनावर विश्वास असणाऱ्या चीनचा सम्राट किन शी हुअंग याची मात्र मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलची असुरक्षिततेची भावना त्याच्या जिवंतपणी देखील बळकट होती. त्यावेळी दास-दासी आणि गुलामांना बळी देण्याच्या प्रथेविरुद्ध जगभरात ओरड सुरू झाल्याने किन शी हुअंग याने मृत्यूच्या आधीच त्याच्या फौजेच्या टेराकोटा मूर्त्यांचे काम हाती घेतले. हजारो मजूर, कलाकार याकामी लावून त्याने ३६ वर्षात आपल्यासोबत थडग्यात संरक्षणासाठी म्हणून हजारोंच्या संख्येने असलेल्या टेराकोटा सैन्याची फौज उभारली. कित्येक शतके जमिनीत गडप झालेला हा इतिहास १९७१ मध्ये चीनमध्ये झालेल्या एका उत्खननातून प्रकाशात आला.

घटनांची पुनरावृत्ती हाच मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे असं मानलं तर सध्या भारतीय राजकारणात सर्वच राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत त्यांच्यासोबत जी निष्ठावान कार्यकर्ता नावाची जातिवंत फौज तोफेच्या तोंडी दिसते ती टेराकोटा फौजेमध्ये रुपांतरीत झालेली असते का ? हा गूढ प्रश्न निर्माण होतोय. मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी जशी असुरक्षेची भावना त्याकाळी सम्राटांच्या मनात घर करून बसलेली असायची. अगदी तशीच असुरक्षिततेची भावना सध्याच्या राजकीय नेत्यांमध्ये दिसून येते. खुर्ची स्पर्धेत जेंव्हा आपल्या अस्तित्वाचा सूर्य मावळेल त्यावेळी पुन्हा सत्तेवर मांडी ठोकून बसणे म्हणजे एका मृत्यूनंतरच्या दुसऱ्या आयुष्याची सुरुवातच समजली जाते. तेंव्हा गतजन्मा सारखेच वैभव मिळावे म्हणून हे नेतेलोक ‘टेराकोटा कार्यकर्त्यांची’ फौज आपल्याभोवती उभी करतात हेच आत्ताचे चित्र आहे.

आता मुख्य मुद्दा हा आहे की, कार्यकर्ता हा टेराकोटा असतो का ? किंवा तो मृतप्राय अवस्थेत कधी भाजलेल्या मातीचा पुतळा होत असेल. असे असंख्य प्रश्न उभारतात. सळसळत्या रक्ताचा, पक्षीय विचारधारा आणि नेत्याच्या प्रभावात आपला उद्योगधंदा आणि कुटुंब प्रसंगी वाऱ्यावर सोडणाऱ्या कार्यकर्त्यांचा ‘टेराकोटा’ फौजी केंव्हा बनत असेल ? आपला नेता आणि त्याची अनिर्बंध सत्ता या विश्वातच स्वतःला कुर्बान करणारा कार्यकर्ता खरं म्हणजे जेंव्हा नेत्याच्या दरबारात पहिल्यांदा सलाम ठोकायला जातो तेंव्हाच त्याचा टेराकोटा व्हायला प्रारंभ होतो. आपला नेता आणि त्याचा विचार हाच आपला भविष्यकाळ आहे असं समजणारा ‘निष्ठावान’ कार्यकर्ता हा त्याच्या नेत्यासोबतच अस्तंगताच्या प्रवासाला जात असतो. लोकशाही प्रणालीने जरी व्यापकतेने लोकसहभागाची सत्ताकेंद्रे निर्माण करण्याची आदर्श निवडणूक संहिता जनतेला बहाल केली असली तरी तिचा स्वीकार करणाऱ्या जनतेच्या मानसिक बदलाचा विचार या प्रणालीने गृहीत धरलेला असावा. म्हणूनच ब्रिटिश राजवट हद्दपार केल्यानंतर नव्याने स्वतंत्र राजवट निर्माण करताना पुन्हा राजेशाही सारखे ठराविक मूठभर लोकांच्या हातीच सत्तेची स्थाने अबाधित राहिली. भारतीय लोकशाही प्रणालीची हीच खरी शोकांतिका आहे. घराणेशाहीचा पुरस्कार करणारे राजकीय पक्ष भलेही लोकांना आकर्षित करणाऱ्या बदलांची विचारधारा मांडत असतील. पण वेळ पडली तर सत्तेसाठी आपल्या विचारसरणीला अडगळीत फेकून सत्तेसाठी परस्परविरोधी विचारधारेशी जवळीक साधताना दिसतात. अगोदर म्हंटल्याप्रमाणे भारतीय मानसिकता हीच मुळात राजेशाहीच्या आधीन जाणारी मानसिकता असल्याने इथे व्यक्ती महात्म्याला सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे लोकमानस हे देखील सत्तेच्या आधीन झालेले दिसते. इथे सत्तेच्या विरोधातील उठाव हा भलेही जनतेच्या ताकदीवर होत असेल, मात्र त्याचे सर्व श्रेय हे विरोधी पक्ष, त्याचे नेतृत्व आणि स्थानिक नेतृत्व घेत असते. म्हणजेच लोकाभिप्रेत असणारी लोकशाही ही भारतात व्यक्तीअभिप्रेत बनलेली दिसते. म्हणूनच सर्वसामान्यांमधून आलेल्या कार्यकर्त्यांचे शेवटी टेराकोटा फौजेत रूपांतर झालेले ही लोकशाही मूकपणे पहात असते.

सत्तरच्या दशकात झालेला उठाव हा देखील सुरुवातीला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली वैचारिक आणि नितीप्रधान धोरणांचा पुरस्कार करणारा होता. मात्र सत्तेत परावर्तित होताना तो विविध विचारधारेचा बनला. भारतात कॉंग्रेसवादी-काँग्रेसविरोधी, हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वविरोधी अशाच विचारधारांचा राजकीय पटलावर संघर्ष दिसतो. यामध्ये पुरोगामी आणि समाजवादी विचारसरणी औषधालाही सापडत नाही. यासर्व वैचारिक धुमश्चक्रीत सत्तेत असलेल्या पक्षाशी एकतर किमान समान धोरणावर सोयरीक करायची किंवा सतेच्या विचारधारेत स्वतःला झोकून द्यायचं हेच धोरण राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते राबवितात. त्यामुळे ते नेमक्या कोणत्या विचारधारेशी एकनिष्ठ आहेत हेच कधी कळून येत नाही. नेते कितीही भ्रष्ट असले तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र आपल्या नेत्यांशी एकनिष्ठच असावे लागतात. राजकीय धुमश्चक्रीत जर नेत्याच्या अथवा पक्षाच्या विचारधारेचा शेवट झाला तर त्या विचारधारेला चिटकून बसलेल्या कार्यकर्त्यांचा टेराकोटा व्हायला वेळ लागत नाही. इतक्या शतकांनंतर देखील चीनच्या सम्राटाची टेराकोटा फौज जशी आपल्याला नवलाईची वाटते. अगदी तशीच भारतीय लोकशाहीतील टेराकोटा कार्यकर्त्यांची फौज वाटते का ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

0

)

%d bloggers like this: