
मराठी कॅलेंडरप्रमाणे भाद्रपद महिन्यातील अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर येणाऱ्या भाद्रपद पौर्णिमेला चातुर्मास्य समाप्ती होते आणि महालयारंभ होतो. यालाच पितृपक्ष पंधरवडा अर्थात श्राद्ध काळ समजतात. हा काळ थेट सर्वपित्री दर्श आमावस्ये पर्यंत असतो. या श्राद्ध काळात हिंदू धार्मिक मान्यतेनुसार पितृसत्ताक काळात आत्म्याच्या शांतीसाठी पितरांना खाऊ घातले जाते. धार्मिक रिवाजाप्रमाणे या विधीसाठी कावळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कावळा हा यमाचे प्रतीक मानल्या जातो. श्राद्ध पक्षात आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्यांना अन्न देत असतो. पितृपक्षाच्या काळात कावळा अंगणात येणे अत्यंत शुभ शकुनाचे समजले जाते. एरवी देखील कावळा अंगणात छपरावर, झाडावर कावकाव करू लागला की पाहुणे येण्याचे संकेत समजण्याची पूर्वापार प्रथा आहे. यासर्व हिंदू धर्मरूढी आणि परंपरा पाहता कावळा हा पक्षी धर्मसंस्कार पद्धतीत अतिशय महत्वाचा मानला गेला आहे. एरवी कुरूप आणि कर्कश्य आवाजाचा पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कावळ्यांची श्राद्धपक्ष काळात मात्र पितरांच्या अगोदर आळवणी केली जाते. कारण पितरांसाठी तयार केलेल्या अन्नाला कावळा शिवला नाही तर पितृशांती होत नाही. म्हणूनच श्राद्धपक्ष काळात कावळ्यांची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली जाते. मुळात विद्रुप आणि कर्कश्य आवाजाच्या कावळ्यांचे पालन कोणताही पक्षीप्रेमी करत नाही. अलीकडे मात्र श्राद्धविधी करणाऱ्या विशेष धार्मिक स्थळांवर अश्यापद्धतीने विधिनुसार पिंडाला स्पर्श करण्याची शिकवण देणारे ‘कावळे पालन’ केल्या जाते. नाशिकच्या गोदा घाटावर हा उद्योग चव्हाट्यावर आलेला आहे. त्यावर धर्मप्रेमींची साधक-बाधक चर्चा देखील झाली आहे. त्यामुळे तो विषय आता पुन्हा चघळण्यात अर्थ नाही.

मानवनिर्मित वाढते सिमेंटचे जंगल, झाडांची कत्तल, रासायनिक औषधांचा भडिमार, वाढते वायू प्रदूषण, मोबाईल टॉवरची वाढलेली संख्या यासारख्या असंख्य कारणांमुळे पशु-पक्ष्यांच्या जीवनचक्रावर विपरीत परिणाम होत आहे. यातूनच गेल्या काही वर्षांत पशु-पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. गेल्या दशकभरात भारतातून गिधाडं, कावळे, चिमण्या, पोपट या पक्ष्यांची संख्या कमालीची घटली आहे. चार दिवसांपूर्वीच टाटा उद्योग समूहाचे माजी चेअरमन आणि शापुरजी पालनजी समूहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर पार्थिवावर पारशी पद्धतीने अंत्यसंस्कार न करता हिंदू धर्म पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. पारशी पद्धतीने अंत्यसंस्कार न करण्यामागे गिधाडांची रोडावलेली संख्या हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. अर्थात पारशी समाजाला हा प्रश्न अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. पारशी धर्मीयांत अंत्यसंस्काराची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. ते हिंदूंप्रमाणे मृतदेहावर अग्निसंस्कार करत नाहीत किंवा ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांप्रमाणे दफन देखील करत नाहीत. मृत्यू नंतर टॉवर ऑफ सायलेन्समध्ये मृतदेह अंतिम विधिनुसार ठेवला जातो. त्यानंतर गिधाडे येवून तो मृतदेह खातात. गिधाडांनी मृतदेह खाणे हा देखील पारशी धर्मियांच्या प्रथेचा एक भाग आहे. आता सायरस मिस्त्री यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का करण्यात आले ? एकतर कोरोना काळात केंद्र सरकारने विषाणूंच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एसओपी जारी करताना पारशी समाजाच्या अंत्यसंस्कार पद्धतीवर बंदी घातली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील सरकारच्या या एसओपी विरुद्ध आदेश देण्यास नकार दिला होता. या कारणाबरोबरच अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे गिधाडांची संख्या खूप कमी झाल्याने कित्येकदा टॉवर ऑफ सायलेन्समध्ये मृतदेह हे गिधाडांच्या प्रतीक्षेत पडलेले असतात. यातून मृत्यूनंतर त्या मृतदेहाची विटंबना होण्याची शक्यता वाढते. या संवेदनशील विषयावर मार्ग काढण्यासाठी पारशी समूह आता वेगळ्या अंत्यसंस्कार पद्धतीचा अवलंब करण्याच्या मानसिकतेत पोहोचला आहे. अर्थात जगाच्या पाठीवर अत्यल्प संख्येत असणाऱ्या पारशी समाजातील परंपरावादी गट अधिक तीव्रतेने या बदलाच्या विचारधारेला विरोध करताना दिसत आहे. मात्र काही नव्या विचारसरणीच्या लोकांनी अंत्यसंस्काराच्या पद्धतीत आपल्याला पटेल असा बदल स्वीकारण्याचा निर्णय अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे.

पारशी रुढीमध्ये जसा गिधाडांच्या संख्येतील घटते प्रमाण हा बदलाचे संकेत देत आहे त्याचप्रमाणे हिंदू रुढीप्रमाणे अंत्यसंस्कारानंतर मुक्तीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘पिंडदान’ आणि श्राद्ध पक्ष काळातील पितृशांतीसाठी काकस्पर्श या धार्मिक नियमामध्ये एकतर कावळ्या ऐवजी कोणत्याही पक्ष्याचा स्पर्श हा बदल स्वीकारला पाहिजे की नाही, यावर आता जनजागृती आणि साधक-बाधक चर्चा करणे अपेक्षित आहे. एकतर निसर्गसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन कटाक्षाने केले तर जीवनचक्र सुरळीत सुरू राहील. अन्यथा या धार्मिक विधींमध्ये कालानुरूप बदल स्वीकारणे अपरिहार्य बनेल. रुढीवादी-परंपरावादी भूमिकेतून अश्या विषयांना अधिक संवेदनशील बनविण्याच्या अट्टाहासाने आपण निसर्गाचे संतुलन तर बिघडवूच याबरोबरच सामाजिक विकृतीला देखील बढावा देवू.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा