
भित्रा परंतु चपळ म्हणून परिचित असलेला ससा हा प्राणी मूळचा ऑस्ट्रेलियाचा प्राणी नाही. हा प्राणी ऑस्ट्रेलियात आला कसा ? याची पण रंजक कहाणी आहे. सुमारे १६३ वर्षांपूर्वी म्हणजेच १८५९ मध्ये ख्रिसमसची सांताक्लॉजची भेट म्हणून आलेल्या २४ सश्याची पैदावार वाढत जावून आजच्या घडीला ती वीस कोटींच्या घरात पोहोचली आहे. अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या ऑस्ट्रेलियामध्ये वीस कोटी ससे धुमाकूळ घालत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून सश्यांचा समूळ नायनाट करण्याचा चंग बांधणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अजून तरी या मोहिमेत यश आलेले नाही. पिके, गवत, झाडे-झुडपे, वनसमृध्दी, पर्यावरण आणि वन्यजीवांना धोका पोहोचविणाऱ्या या सश्यांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सश्यांना ठार मारून टाकण्याची मोहीम राबविणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अजूनतरी पुरते यश मिळालेले नाही. सश्यांच्या या उच्छादाने ऑस्ट्रेलियाला दरवर्षी कृषी उत्पादनसंबंधी १६०० कोटी रुपयांचे (भारतीय चलनामध्ये) नुकसान होत आहे. हीच खरी ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी आहे.

१६३ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात सश्यांच्या झालेल्या प्रवेशाची कहाणी अगदीच दंतकथा वाटावी अशी आहे. दि. २५ डिसेंबर १८५९ रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न बंदरावर इंग्लंडहून आलेल्या जहाजातून थॉमस ऑस्टिन नावाच्या माणसा करिता ख्रिसमसची सांताक्लॉजची भेट म्हणून २४ ससे आले होते. थॉमस ऑस्टिन हे मूळचे इंग्लंडचे मात्र ते मेलबर्न येथे स्थायिक झाले होते. त्यांना ससेपालनाची आवड होती. म्हणूनच त्यांच्या बंधूने ख्रिसमसला भेट म्हणून २४ युरोपियन ससे पाठवले होते. या चोवीस सश्यामध्ये जंगली आणि पाळीव अश्या दोन्ही प्रकारचे ससे होते. त्याअगोदर सुद्धा १७८८ मध्ये युरोपातून पाच ससे ऑस्ट्रेलियात आणल्याची नोंद सापडते. त्यानंतर त्याच्या पुढच्या ७० वर्षात आणखी ९० ससे आल्याची देखील नोंद सापडते. मात्र सश्यांच्या वंशानुक्रमानुसार जादा संख्या ही थॉमस ऑस्टिनला भेट म्हणून आलेल्या २४ सश्यांबरोबर जुळते. या २४ सश्यांनी पुढीलकाळात आपली वंशावळ वाढती ठेवली. बाहेरून आलेल्या सस्तन प्राणीवर्गातील सश्यांची ऑस्ट्रेलियात बेहिशोबी वाढ झाली. १६३ वर्षात २० कोटी सश्यांची संख्या हे जगातील एकमेव उदाहरण ठरले आहे. ऑस्टिनला भेट म्हणून आलेल्या २४ सश्यांची वंशावळ एव्हढी वाढली कशी ? यावर अलीकडेच झालेल्या संशोधनातून एक गोष्ट उजेडात आली. ऑस्टिनला इंग्लंडहून पाठवलेले ससे मेलबर्नला पोहोचण्यासाठी ८० दिवस लागले होते. या ८० दिवसात जंगली आणि पाळीव सश्यामध्ये ‘इंटरब्रिडिंग’ झाले. त्यामुळे १०० किलोमीटर प्रतिवर्षं या गतीने सश्यांची पैदास पसरत गेली.

ऑस्ट्रेलिया या द्वीप समूहाचा शोध हा दीड-दोन हजार वर्षांपूर्वीचा असला तरी इथल्या मूळ जमातींना हटवून वसाहती करणाऱ्या ब्रिटिशांना देखील मानव वसाहती एव्हढ्या वेगाने वाढविता आल्या नाहीत. निडर मनुष्य देखील भित्र्या सश्या इतक्या वेगाने लोकसंख्या वाढवू शकत नाही. हे अगदीच विज्ञान विरोधी वाक्य असले तरी गमतीदार विचार म्हणून त्याकडे पाहिले तरी. मानवी लोकसंख्या आणि सश्यांची संख्या यातली तफावत नक्कीच लक्ष वेधून घेणारी आहे. वन, पर्यावरण,वन्यजीव आणि पशुजीवनाच्या संरक्षणाबाबत सतत जागृत असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आता मात्र २० कोटी उपद्रवी सश्यांच्या विरोधात एकप्रकारचे महायुद्धच खेळावे लागत आहे. ससेमुक्त ऑस्ट्रेलिया (Rabbit Free Austreliya) ही चळवळ गेल्या १५-२० वर्षांपासून गतिमान करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अजूनतरी त्यात यश मिळालेले नाही. एकाच गतीने सातत्याने काम करीत राहिले तर यश मिळते या आशयाची कथा म्हणून ‘ससा आणि कासवाची शर्यत’ ही गोष्ट भारतीय जनमाणसात लोकप्रिय अशी संस्कारमूल्य दर्शविणारी गोष्ट पिढ्यानपिढ्या पासून प्रचलित आहे. ऑस्ट्रेलियाला मात्र सशाच्या विरोधात शर्यत जिंकण्यासाठी आता कासव किंवा कासवगती देखील उपयोगी पडणार नाही. दरवर्षी पीक उत्पादनात १६०० कोटींचे नुकसान सोसणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भित्र्या सश्याला का घाबरावे लागतेय याचं हे कारण आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा