इतिहास हा द्वेषाचा नाही तर उपजीविकेचा प्रशस्त मार्ग बनू शकतो…!

सभ्यता, संस्कृती, संस्कार, परंपरा, भौगोलिक समृद्धी आणि शौर्याची प्रतीके यांनी मिळून इतिहास तयार होतो. हा ‘इतिहास’च आपली खरी ओळख असते. जे लोक आपल्या समृद्ध इतिहासाला नुसतीच दंतकथा म्हणून स्मरणात न ठेवता त्याची प्रतीके जतन करून ठेवतात त्यांचाच भविष्यकाळ उज्ज्वल असतो. इतिहासाकडे न पाहता वर्तमानाकडे पहा असा सल्ला देणाऱ्यांना एकच सांगावे वाटते. इतिहास हा ‘द्वेषाचा’ नाही तर उपजीविकेचा प्रशस्त मार्ग आहे. आज अवकाशात झेपावलेला माणूस संगणकीय विचारप्रणालीला महत्व देताना आपली सभ्यता, संस्कृती, संस्कार, परंपरा, भौगोलिक समृद्धी आणि शौर्याची प्रतीके याचे जतन करण्यापेक्षा ते नष्ट करू पहात आहे. आधी त्याचे विद्रुपीकरण करण्यासाठी तो उतावीळ दिसत आहे. इतिहाससुद्धा फक्त आपल्या उपजीविकेचेच साधन नाहीतर देशाच्या अर्थकारणाचा प्रमुख स्रोत बनू शकतो यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांना माझा हा मुद्दा शंभर टक्के पटू शकतो. आज जगात असे अनेक देश आहेत ज्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत हा तिथली संस्कृती, परंपरा, वारसा आणि भौगोलिक समृद्धी आहे. अशा देशांचे अर्थकारण हे केवळ पर्यटनावरच अवलंबून आहे. अर्थात अशा देशांचे भौगोलिक क्षेत्रफळ, लोकसंख्या ही आवाक्यातील असल्याने कदाचित त्या देशांचे चलन केवळ पर्यटनाच्या मुख्य व्यवसायावर देखील मजबूत असावे. भारतासारख्या विशाल भूभाग आणि लोकसंख्या असलेल्या देशाला केवळ भौगोलिक समृद्धीच्या जोरावर पर्यटन व्यवसायातून देश चालविण्याएव्हढे अर्थकारण होणार नाही हे जरी खरे असले तरी या पर्यटन व्यवसायावर अवलंबित अनेक छोटे व्यवसाय आणि त्यावर गुजराण करणाऱ्या समाजातील गरीब आणि मध्यमवर्गीयांतील एका मोठ्या वर्गाला उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल.

भारतासारख्या निसर्ग आणि प्राचीन संस्कृती-सभ्यतेने ओतप्रोत भरलेल्या या देशात पर्यटनाला देखील एक प्राचीन इतिहास आहे. त्याकाळी दळणवळणाची साधने अपुरी असतानाही देश-विदेशातील पर्यटक आपल्या संस्कृती-सभ्यतेचा अभ्यास करण्यासाठी, इथल्या खुललेल्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी भारतात येत होते याचे इतिहासात देखील दाखले मिळतात. इथल्या वैभवाची लयलूट करणारे ब्रिटिश हे व्यापारी म्हणून भारतात आले आणि राज्यकर्ते बनले हा पारतंत्र्याचा इतिहास देखील आपल्याला मुखोदगत आहे. मुद्दा हाच आहे की पर्यटनाला वाव देणारे अनेक ठिकाणे आपल्या ‘अवती-भवती’ आहेत. आपण मात्र ना पर्यटन व्यवसायाबाबत उत्साही आहोत ना आपल्या ‘अवती-भवती’ असणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणांची जपणूक करण्यासाठी आग्रही आहोत. वाढती महागाई, बेरोजगारी आणि व्यवसायातील सततच्या वाढत्या अनिश्चीततेबरोबरच जाती-धर्माच्या वर्चस्वाच्या घाणेरड्या राजकीय संघर्षात आपण आपल्या तेजस्वी इतिहासाचे रोज करीत असलेल्या ‘विद्रुपीकरणा’मुळे आपल्या हातून आपलाच ऐतिहासिक वारसा नष्ट होवू लागला आहे.

इतिहासातील राजवटींच्या राजधान्या असलेली शहरे, पुरातन वास्तू, मंदिरे, गड-किल्ले, हजारो वर्षांचा इतिहास असलेली ठिकाणे एकतर ‘विद्रुप’ होवू लागली आहेत किंवा अनास्थेमुळे, पडझडीमुळे उद्ध्वस्त होवू लागली आहेत. जाती-पातीच्या आणि धर्मद्वेषाच्या संघर्षात आपण रोज इतिहासाची मोडतोड करीत वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतो. या द्वेषातूनच आपण जीर्ण-विदीर्ण होणाऱ्या आपल्या इतिहासाकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत आहोत. इतिहासाला कवटाळून कुणाचं पोट भरणार आहे का..? हाच बाळबोध प्रश्न आपण मर्दुमकीच्या अविर्भावात विचारत असतो. पण आपल्या भोवती विखुरलेला हाच आपला इतिहास आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनू शकतो याचा कधी शांतपणे आपण विचार करणार आहोत की नाही..? लोक चळवळ उभारून आपणच आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा संरक्षित केल्या तर त्याला पर्यटनस्थळाचे स्वरूप येवू शकते. नेहमी सरकारच्या नावाने ‘कंठशोष’ करण्यात आपण अग्रेसर असतो. आपल्याला सगळ्या गोष्टींची सुरुवात ही नेहमी सरकारने करावी असेच वाटत असते. ढिम्म प्रशासनाच्या ‘कासवगती’ची आपण चेष्टा करीत आपल्याच उदरनिर्वाहाच्या साधनांची आपण विल्हेवाट लावत असतो. फार दूरचा विचार करण्याची काहीच गरज नाही. आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील नव्हे तर आपल्या गावातील ऐतिहासिक वारसा जपत त्याला पर्यटन स्थळाचे स्वरूप देण्याची लोकचळवळ उभारली तर स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात सुटू शकेल. जिथे आवश्यक आहे तिथे जनरेट्याच्या माध्यमातून सरकारला दखल घ्यायला भाग पाडले जाईल.

हा विषय मांडताना मी मुद्दामच माझ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या स्मृतिस्थळांच्या छायाचित्रांचा या लेखात वापर केला आहे. जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल संगम येथील हरिहरेश्वराचे मंदिर असेल, तेथील पहिला मराठी भाषेतील शिलालेख असेल, अक्कलकोटचे राजे फत्तेसिंहराजे यांचा राजवाडा असेल, जवळपास आठशे-साडेआठशे वर्षांपूर्वी बांधलेला सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला भुईकोट किल्ला असेल किंवा ब्रिटिशांबरोबर झालेल्या शेवटच्या मराठेशाहीचे ‘पानिपत’ करणाऱ्या मोहोळ तालुक्यातील आष्टीची युद्धभूमी जिथे इंग्रजांनी युद्धाच्या स्मृती नष्ट करण्यासाठी तलाव बांधला. जो आता ‘येवतीचा तलाव’ म्हणून ओळखला जातो. ही सर्व छायाचित्रे जिल्ह्यातील नुसताच ऐतिहासिक वारसा सांगणारी नाहीत तर लोकसहभागातून या स्थानाचे महत्व वाढवीत याला पर्यटन स्थळ बनविले तर त्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांचा ‘राबता’ वाढेल. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील अर्थकारण गतिमान होईल. स्थानिकांना छोट्या-छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराच्या आणि उपजीविकेच्या संधी प्राप्त होतील. ‘पुराणातील वांगी’ म्हणून जर इतिहासाची आपण अवहेलना, फरफट करणार असू तर बकाल वसाहती आणि भणंग समूहाचे आपण नेतृत्व करीत आहोत असेच म्हणता येईल. बघा हा विचार तसा साधाच आहे….पण रोजगार उपलब्ध होण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्तीचे भाग-भांडवल मागणारी ही लोकचळवळ उभारणे आता काळाची गरज आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

6

)

 1. aaliya sayyad

  Nice

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   थॅंक्यु आलिया🙏🙏

   Like

 2. smitahingne

  खरं आहे. सोलापूर चा म्हणावा तसा अजून विकास झाला नाही. छान मांडणी.

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   थॅंक्यु स्मिता. 👍👍

   Like

 3. Rupali

  Agadi barobar. Solapurch kan hich sthiti jawal pas sagali kade aahe.

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   सगळीकडे सारखीच स्थिती आहे, हे मात्र खरे. म्हणूनच उदाहरणादाखल सोलापूरच्या स्थळांचा उल्लेख केला आहे.

   Liked by 1 person

%d bloggers like this: