आर्थिक घोटाळ्यात अडकलेला पहिला मराठी संपादक

एकदा का आपल्या अब्रूचं खोबरं उधळायला लागलं की तो माणूस आपल्याला चिकटलेल्या किंवा चिकटवून घेतलेल्या समाजमान्य उपाध्यांचं सुरक्षा कवच आपल्या भोवती गुंडाळायला लागतो. तर त्या उपाध्यांशी निगडित असणारा वर्ग ‘तो आपला कुणीच नाही’ या अविर्भावात त्याची उरलीसुरली (नसलेली) अब्रू चव्हाट्यावर आणायला लागतो. शिवसेनेचे जगतव्यापी प्रवक्ते, मुखपत्राचे तथाकथित कार्यकारी संपादक, राज्यात सत्ता निर्माण करणाऱ्या महाआघाडीच्या संस्थापकांपैकी एक, संसदेमध्ये आपल्या पक्षाची बाजू मांडणारे, ठाकरे शैलीचे प्रचारक आणि प्रसारक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखनशैलीचे वारसदार समजणारे, प्रबोधनकार ठाकरे यांच्या समृद्ध पुरोगामीत्वाचा आणि विज्ञानवादी हिंदुत्वाचा खंदा पुरस्कर्ता असलेले संजय राऊत हे पत्रा चाळ प्रकरणाच्या कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यात ईडीच्या सापळ्यात अडकले अन् त्यांची गत अगदी अशीच झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांच्या सोज्वळ आर्थिक फसवणुकीच्या घडामोडी माध्यमांमधून पावसाळी धबधब्यासारख्या कोसळू लागल्यानंतर माध्यमांना देखील त्यांचा नेमका कोणत्या उपाधीमागे दडलेला चेहरा प्रकाशात आणावा याचा प्रश्न पडला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर दररोज सकाळी-दुपार-संध्याकाळ असा तीन वेळेचा डोस पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पावित्र्यात देणारा संपादकच आर्थिक घोटाळ्यात बरबटलेला आढळल्यानंतर या दिव्य महर्षीचा नामोल्लेख नेमका कोणता करावा…? हा प्रश्न माध्यमातील बोरू बहाद्दरांना सतावत आहे. राजकीय सूडबुद्धीने भाजपा ‘ईडी’च्या कारवाईचा ‘बडगा’ उगारत असल्याच्या विरोधकांच्या सामूहिक ‘कंठशोष’ तारसप्तकात आपलाही सूर मिसळत माध्यमांनी संजय राऊत यांना जवळजवळ आपल्या ‘निर्भीड पत्रकारितेच्या’ बिरादारीतून वगळण्याचीच भूमिका घेतलेली दिसत आहे. त्यामुळे कधीकाळी क्राईम रिपोर्टिंग करत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक पदापर्यंत पोहोचलेल्या संजय राऊत यांचा सध्याच्या प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार म्हणून तरी उल्लेख का होत नाही ?

आताची पत्रकारिता शंभर टक्के सोवळ्यातील पत्रकारिता नाहीय हे खरं आहे. किंबहुना या व्यवसायाचं पावित्र्य राखणारे पत्रकारितेचे पूजक आणि वाहक नाहीत असं म्हणणं जास्त संयुक्तिक आहे. या अगोदरही खंडणी मागणारे, चारित्र्य हनन करणारे, ब्लॅकमेल करणारे, विनयभंग करणारे, हत्या घडवून आणणारे, समाजात दुफळी माजवीत दंगे घडवून आणणारे अनेक टिनपाट तसेच नामचीन पत्रकार या समाजाने बघितलेले आहेत. त्यामुळे आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या संजय राऊत यांचा कार्यकारी संपादक असल्याचा उल्लेख हवाय कश्याला ? हा मध्यमवर्गीय प्रश्न सर्वांनाच पडू शकतो.. तर याचं सरळ साधं उत्तर म्हणजे संजय राऊत हे पक्षात आणि राज्यात आज जे मोठं प्रस्थ बनू पहात आहेत त्याची सुरुवात ही पत्रकार म्हणूनच आहे. आधी लोकप्रभा मधून काम करीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात प्रवेश मिळविला. स्व. बाळासाहेबांची मर्जी संपादन करताना त्यांच्या मॅरेथॉन मुलाखती, खास ठाकरे शैलीतील अग्रलेख, स्तंभलेखन करीत मुखपत्रातून शिवसेनेची भूमिका मांडत संजय राऊत कधी स्व. बाळासाहेबांच्या मर्जीतले झाले हे खुद्द शिवसेनेतील वजनदार नेत्यांना देखील समजले नाही. जोपर्यंत स्व. बाळासाहेब यांच्या संपूर्ण नियंत्रणात शिवसेना आणि सामना वृत्तपत्राचा कारभार होता तोपर्यंत त्यांना कधी सल्लागारांच्या फळीची गरज भासली नाही. स्व. बाळासाहेब हेच प्रथम आणि अंतिम प्रमाण होते. त्यांच्यानंतर ‘मातोश्री’वर सल्लागारांची फळी कार्यरत झाली. संजय राऊत नावाची नवी ताकद बाळसे धरू लागली ती ह्याच फळीतून. सामान्य शिवसैनिकाप्रमाणे कधीच रस्त्यावर उतरून आंदोलन न केलेले संजय राऊत हे सामनाच्या पानापानातून डरकाळ्या फोडत शिवसेनेचे कागदी वाघ बनले. सामना दैनिकात नोकरी करणारा बोरू बहाद्दर शिवसेनेचा नेता म्हणून ओळखला जावू लागला. क्राईम रिपोर्टर ते नेता बनलेल्या संजय राऊत यांनी गेल्या तीन वर्षात विशेषतः महाआघाडीची निर्मिती करीत उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्याची जी राजकीय खेळी यशस्वी केली त्यातून त्यांच्यातील सुप्त अवस्थेत असलेल्या कुटनीतीची ओळख बहुदा उध्दवजींना झाली असावी. त्यामुळे सारथ्य आपोआपच संजय राऊत यांच्याकडे आले. त्यातूनच बाळसे धरलेली संजय राऊत नावाची ताकद स्वतःची पत्रकार असलेली मूळ ओळख पुसण्यात बहुदा यशस्वी झाली असावी किंवा माध्यमांना दररोज तीन टाइम ‘रतीब’ घालणारा ‘प्रवक्ता’ अधिक जवळचा वाटत असल्याने माध्यम समूहाला ते नोकरी करणारे पत्रकार किंवा कार्यकारी संपादक असल्याचे कदाचित विस्मरण झाले असावे.

आता या घोटाळा प्रकरणात त्यांची ओळख ही सामनाचे कार्यकारी संपादक म्हणूनच असावी हेच जास्त संयुक्तिक ठरेल. कारण हे प्रकरण २०११ मधील आहे. तेंव्हा संजय राऊत हे जरी स्व. बाळासाहेबांच्या मर्जीतले म्हणून ओळखले जात असले तरी ते सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून मुंबईत स्वतःची वेगळी ओळख ठेवून होते. आर्थिक घोटाळ्यात हस्तेपरहस्ते नियंत्रण ठेवणे त्यांना कदाचित याच पदामुळे शक्य झाले असावे. जर शिवसेनेचे नेते म्हणून ते काही उपद्व्याप करायला गेले असते तर स्व. बाळासाहेबांनी पार्श्वभागावर लत्ता प्रहार केला असता. आता आर्थिक घोटाळ्यातील संशयित हा पत्रकारितेतील व्यक्ती असावा हा पोटशूळ का ? तर भलेही आज पत्रकारिता हा व्यवसाय बनला असला तरी आजदेखील वाचकवर्ग त्याला ‘व्रतसेवा’ समजतो. सभ्य, शालीन, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, शिक्षित आणि परोपकारी वृत्तीने लोककल्याणासाठी आणि समाजहितासाठी चरितार्थ चालविण्या इतकेच मानधन घेत लोकार्पण केलेली सेवा म्हणूनच पत्रकारितेकडे आजदेखील पाहिले जाते. कदाचित माध्यमांना याची उपरती झाली असावी म्हणून संजय राऊत यांचा उल्लेख पत्रकार-संपादक असा न करता प्रवक्ता-चाणक्य असा करून उरलेली अब्रू झाकण्याचा प्रयत्न करीत असावेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असणारा एखादा व्यक्ती मिळेल ती नोकरी स्वीकारायची म्हणून पत्रकारितेत येवून जर मिळणाऱ्या पगारातून बचत करून निवाऱ्यासाठी आठ बाय दहाची एखादी खोली जरी बांधू शकत असेल तर त्याला उर्वरित आयुष्यात ज्येष्ठ पत्रकार म्हणून मिरवायला धन्य वाटेल. तिथे संजय राऊत सारखा कोट्याधीश होणार असेल तर…..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

0

)

%d bloggers like this: