बिनघोर ऱ्हावा…. सत्ता आपलीच, चिंचेच्या झाडावरला ‘भुत्या’ गरजला…!


भुस्कटवाडी सध्या लई चर्चेत आलीय. त्याचं कारण बी तसंच हाय. संपूर्ण राज्यात भुस्कटवाडी गावाला कोरोनाकाळात लसीकरण मोहिमेत ‘एक नंबरच’ गाव म्हणून ‘फेमस’ करणाऱ्या भुस्कटवाडी ग्रामपंचायतीमध्ये लई मोठं कांड घडलंय. तीन गटांना सोबत घेवून ग्रामपंचायतीवर सत्ता करणाऱ्या भाकरे-पाटलांच्या कारभारावरच थेट हल्ला झालाय. दोन वर्षात दीड वर्ष तर निक्कं बंदच होता. त्यो कोरोना अंगात शिरू नये म्हणून सरकारनं ‘लॉक डाऊन’चं लावलं होतं. समदी लोकं, बायाबापडी, चिलेपिले, म्हातारी-कोतारी समदी घरात कोंडलेली. भुक्कड जनावरं पांजार पोळात कोंडत्यात तशी. समदं बंद असल्यानं भाकरे-पाटीलबी आपल्या वाड्यातूनच ग्रामपंचायतीचा गाडा हाकीत होतं. वाड्याच्या पडवीतच मुक्कामाला असलेला गडी ग्रामपंचायतीच्या फायली, सदस्यांच्या चिठ्ठ्या घ्यायचा अन वाड्यातल्या सेपरेट खोलीत तोंडाला मास्क लावून बसलेल्या भाकरे-पाटलांना चार फूट लांबूनच परभारे निरोप पोहोचवायचा. त्यामुळं स्वतःच्या गटातील सदस्यांना पण भाकरे-पाटलांचं दर्शन दुर्मिळ व्हायला लागलं व्हतं. लॉक डाऊनमुळं कारभार करणं लैच बेचव झालं व्हतं. भाकरे-पाटलाला मिरवायची,शेत-शिवारात फोटोग्राफी करायची लई हौस पण ती बी हौस पुरी व्हत नव्हती. सरपंच झाल्यापास्न गावांतन नीट मिरवायला बी मिळालं नव्हतं. गावात फेरफटका मारायला गेलं अन् तश्यात कोरोनाची लागण झाली तर ? म्हणून भाकरे-पाटील वाडा सोडून ग्रामपंचायतीत पण येत नव्हतं. भाकरे-पाटलांना पाठिंबा दिलेले दोन गट मात्र वाड्यावर जाऊन आपआपल्या विकासकामांचा ‘सुमडीत’ निपटारा करत व्हती. भाकरे-पाटलांचे निष्ठावान म्हणून फेमस असलेली सदस्य मंडळी मात्र यामुळं लैच दुखावली व्हती. वाड्यावर गेलं तर पडवीत बसलेला गडी त्यांना भाकरे-पाटलांचं दर्शनबी मिळू देत न्हवता. धुसफूस लैच वाढू लागली व्हती. पण समदी निष्ठावान मंडळी लॉक डाऊन उठायची वाट बघत व्हती. एकदा का लॉक डाऊन उठलं की सरपंच सायेब ग्रामपंचायतीत यायला सुरुवात करतील. मग सरपंचाचं दर्शनबी व्हईल अन गाऱ्हाणबी मांडता येईल या इराद्यानं समदी निष्ठावान मंडळी गपगुमान बसली व्हती. ग्रामपंचायतीच्या हाफिसात सरपंच सायेब यायला बी लागले. मास्क आजूनबी तोंडावरच व्हता. पण डोळ्यावर बांधल्या सारखं वागू लागले, पुन्हा तेच घडायला लागलं. निष्ठावंतांना सरपंच भेटत नव्हते पण आघाडीतील दोन्ही गटांचे सदस्य सरपंचाच्या सहीने विकासनिधी पळवत व्हते. आता करावं तरी काय ? हे गाऱ्हाणं सांगायचं तरी कुणाला ? तवा समद्या निष्ठावानांनी एक ‘गेम’ आखला. ग्रामपंचायतीत मिटिंग चालू असतानाच एकामागून एकानं काढता पाय घेतला अन् थेट गावाबाहेरचा रस्ता धरला. समद्यांनी ठरवलं..आता सरपंचांना चांगलीच अद्दल घडवायची. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ असं सरपंच अन् त्यांच्या गड्याने कितीबी कोकिळकंठाने पार बेंबीच्या देठापासून कोकललं तरी माघारी फिरायचं नाय. पुढं काय होईल ते होवू देत. समदी वढ्याच्या बाजूनं चालत गावाची वेस ओलांडून आली. माळरानावरच्या चिंचेच्या झाडावर वास्तव्याला असलेल्या ‘भुत्या’ला यावर तोडगा मागायचा असा समद्यांनी ईचार पक्का करून चिंचेचं झाड गाठलं. अरे हो…! गोष्ट सांगताना ह्यो ‘भुत्या’ कोण ? त्ये सांगायचं इसरलोच की…. आता क्लायमॅक्स शॉट घ्यावा लागतोय.

भुस्कटवाडीच्या माळरानावर चिंचेच्या झाडावर राहणारा ‘भुत्या’ म्हंजी लई मोठं डेंजर कॅरेक्टर. भुतेंद्र घडणावीस नाव त्याचं. प्रेमानं लोक त्याला ‘भुत्या’ म्हणतात. चांगल्याला लई चांगला तर खराबला लई डेंजर. गेम वाजवायचा म्हणलं की शंभर टक्के वाजवणारच. त्यानं बी भुस्कटवाडीच्या ग्रामपंचायतीची सरपंच म्हणून सत्ता भोगलेली. पण मागच्या टायमाला इलेक्शन नंतर सत्तेची हाव वाढल्याने भाकरे-पाटलाने त्याला दगा देत विरोधी गटांना जवळ केलं अन् सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात टाकून घेतली. भुत्याची लईच ‘टर’ उडवली. ‘मी पुन्हा येईन’ म्हणत चाणक्य सारखं शेंडीला गाठ मारून भुत्या गावाबाहेर पडला ते थेट माळरानावरच्या चिंचेच्या झाडावर येवून राहिला. काय पण झालं तरी ग्रामपंचायतीवर परत आपली सत्ता आणल्या बिगर गावात जायचं नाही म्हणून त्याने आपला मुक्काम या चिंचेच्या झाडावर हलवला. तवापास्न त्याचे समर्थक सल्ला घ्यायला चिंचेच्या झाडाकडे यायला लागले. भाकरे-पाटील पयल्यापास्न भुत्याला वचकून असायचा. तर या ष्टोरीतला भुत्या नावाच्या कॅरेक्टरचा ह्यो क्लायमॅक्स…आता ष्टोरी पुढं चालू….मिटिंग सोडून ग्रामपंचायतीतून बाहेर पडलेल्या भाकरे-पाटलांच्या गटातील बंडखोरांनी पयल्यांदा चिंचेचं झाड गाठलं. भुत्या झाडाच्या फांदीच्या टोकावर बसून वायफाय कनेक्शन ‘ओके’ करत व्हता. निष्ठावान बंडखोरांनी भुत्याचं पाय धरलं. टेन्शनमध्ये येवून बंडखोरी केली, काय चुकलं तर नाय ना ? असं भुत्याला ईचारलं. वायफाय चालू झाला व्हता. आकाशाकडं बघत भुत्या काय तरी पुटपुटला….सिग्नल मिळाला. भुत्या निष्ठावान बंडखोरांवर गरजला…..बिनघोर ऱ्हावा, भाकरे-पाटील कितीबी कोर्टाच्या चकरा मारू देत सत्ता आपलीच. आता आलात तर माळरानावर चरत असलेलं बोकड हुडकून आणा….मस्त पार्टी करू…इथून दुसऱ्या गावाला निघून जावा. मी निरोप पाठवल्या नंतरच भुस्कटवाडीत पाय ठेवायचा. अल्पमतात आलेलं भाकरे-पाटील अन् त्यांचा गडी ईथुनपुढं केकाटत ऱ्हायलं पायजेत. समद्यांनी हुडकून बोकड आणला. चापून खाल्ला…..’काय माळरान…..काय बोकडसमदं ओकेमध्ये हाय’ म्हणत पुढचा रस्ता धरला…..!

विशेष सूचना :- या कथेतील प्रसंग, पात्र, घटनाक्रम सर्व काल्पनिक आहे. वास्तवाशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.


2 प्रतिसाद ते “बिनघोर ऱ्हावा…. सत्ता आपलीच, चिंचेच्या झाडावरला ‘भुत्या’ गरजला…!”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: