
वाचायला सुरुवात करण्या अगोदरच सांगतो….हे कसलं शीर्षक ? नक्की कोणत्या भाषेतील ? असला कोणताही थुकरट सवाल मनात न आणता ही सोशल मीडिया मुक्त विद्यापीठाची स्वतंत्र भाषा आहे असा समज करून आत्मसात करावी. मग मराठी की इंग्लिश की संस्कृत किंवा पाली, हिब्रू, मोडी असे सामान्यज्ञानाचे ‘तारे’ तोडणारे बुद्धिकौशल्य न वापरता बात को समझो ना यार……तर मराठी भाषेतील प्रस्तावना पूर्ण करून मूळ विषयाला सुरुवात करूयात……

सध्या राज्यात सत्तांतरामुळे उडालेल्या चर्चेचा (कट्ट्यावरची विधानसभा) रोख आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा राहिला नाही. देवेंद्रजी यांचातर पूरपरिस्थिती असल्याने महाराष्ट्रातील त्यांच्या समर्थकांनी अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा देखील केला.(दरवर्षी नित्यनेमाने येणारा वाढदिवस थोडीच थांबणार ?) तर एकनाथरावांच्या नातूप्रेमासह फॅमिली फोटोसेशन देखील झाले आहे. आता मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि रुसवेफुगवे याचा अंक झाला की मग दोन वर्षे किरकोळ धुसफूस वगळता कट्टा विधानसभेत फार मोठ्या चर्चा झडतील असे काही वाटत नाही. मग गल्लीतील कट्टा विधानसभा चालणार कशी ? कट्टा विधानसभा देखील लोकशाहीच्या संकेतानुसारच लोकांमधून निर्वाचित (गल्लीतून पुरेसा वेळ देणाऱ्या) सदस्यांमधून बनलेली असते. या विधानसभेचा अध्यक्ष देखील चार पावसाळे जास्त बघितलेला, गावातील लफडी-कुलंगडी तोंडपाठ असलेला निवडला जातो. तर अश्या सर्वश्रेष्ठ अश्या कट्टा विधानसभेत आगामी दोन वर्षे फक्त आणि फक्त उद्धवजी ठाकरे त्यांचा डावखुरा फलंदाज संजय राऊत अधूनमधून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार आणि अजितदादा पवार ही काका-पुतण्याची जोडी मध्येच एकनाथराव आणि देवेंद्रजी यांच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करणारे विषय असे काहीसे कट्टा विधानसभेचे विषय राहणार आहेत. यातही आपत्कालीन विषय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, पाकिस्तानच्या कुरघोड्या, श्रीलंकेची भिकारवस्था, रशिया आणि अमेरिकेची भारताने कशी जिरवली यासारखे खमंग भेळयुक्त विषय कट्टा विधानसभेच्या सत्र अधिवेशनात मांडायची मुभा मिळणार आहे ? तर सध्याचा कट्टा विधानसभेत एकच कळीचा विषय आहे ? शिवसेना कुणाची ? उध्दवसाहेबांचं नेमकं काय चुकलं ? सत्तावन्न वर्षांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेने राजकीय सोय म्हणून वेळोवेळी काँग्रेसला झुकतं माप दिलं होतं, मग आत्ताच असं काय झालं की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे सुपुत्र वाट चुकले ? आता कट्टा विधानसभेच्या अधिवेशनात यावर चर्चा झडू लागल्यात. बाकी शिवसेनेतून बाहेर पडताना ‘विठ्ठल बडव्यांच्या गराड्यात’ ही सिच्युएशन मात्र नेहमीच उभी केली जाते. जेंव्हा-जेंव्हा शिवसेना फुटली त्या प्रत्येकवेळी बंडखोरांचा फुटण्याचा हा ‘कॉमन फॅक्टर’ राहिलेला आहे. त्यामुळे युगे अठ्ठावीस कमरेवर हात ठेवून पंढरीत बडव्यांच्या गराड्यात विटेवर निर्विकार उभारलेल्या विठ्ठलाला देखील शिवसेनेतील फुटीची भीती वाटत असावी. नुकतीच आषाढी एकादशी यथासांग पार पडली. नेमकं त्याच पार्श्वभूमीवर सत्तांतराच्या नाट्यात शिवसेना फुटली अन् मग विठुनामाचा गजर अन बडव्यांचा उद्धार झाला. विठुरायाच्या कुंडलीत बहुदा शिवसेना हा पॉवरफुल ग्रह ठाण मांडून बसलेला असावा. एरवी शिवसेना आणि त्यांच्या मावळ्यांचं आराध्यदैवत हे आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. भाषणाची सुरुवातच या नामस्मरणाने केली जाते. मग फुटीच्या वेळीच विठोबाचा जप कश्यासाठी ? याची कट्टा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात घमासान चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या तटस्थ असलेले कट्ट्यावरचे विरोधक फुल्ल राडा करण्यासाठी कट्टा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची वाट पहात बसलेत.

तर शिवसेना कुणाची ? या राजकीय संघर्ष नाट्याचा शेवट काय असावा यावर आता महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातून, शहरातून, गल्लीबोळातून, सोसायट्यामधून, अपार्टमेंटमधून तर रिकामपणात गॅलरीतून डोकावून याच विषयावर ‘चिखल’ केला जात आहे. मुळात शिवसेनेतून उभी फूट पाडत सत्तांतर घडविणाऱ्या एकनाथराव शिंदे आणि गटाची कारणे ही सोयीची वाटतात. जसे १९९९ मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याचा मुद्दा पुढे करून ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार साहेब यांनी काँग्रेसमध्ये उभी फूट घडवून आणत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि लगेचच समोर आलेल्या निवडणुकीत काँग्रेस बरोबर आघाडीदेखील केली. आताही काहीश्या फरकाने तसेच घडतेय. या बंडाच्या पाठीशी जर भारतीय जनता पार्टीची ‘थिंक टँक’ कार्यरत आहे असं मानलं तर ठाकरेंची शिवसेना नेस्तनाबूत करणे हा भाजपाचा अजेंडा असूच शकत नाही. अर्थात कुणाच्या इराद्याने कुठलाही राजकीय पक्ष नेस्तनाबूत होत नसतो. एखादा पक्ष राजकीय पटलावरून नाहीसा झाला असला तरी त्याच्या पतनाला तो स्वतःच कारणीभूत असल्याचा इतिहास आहे. एकतर शक्तीहीन किंवा अंतर्गत बंडाळीने त्रस्त झालेला राजकीय पक्ष एखाद्या बलाढ्य पक्षात अटी व शर्तींसह विलीन होतो अथवा तो स्वतःच आपले कार्य थांबवतो. त्यामुळे भाजपा हा पक्ष शिवसेनेला संपवायला निघालाय ही हाकाटी राजकीय खेळी म्हणून ठीक आहे, परंतु प्रत्यक्षात असं काही घडण्याची सुतराम शक्यता वाटत नाही. शिंदेगटाला हाताशी धरून ठाकरेंचे पक्षावरील वर्चस्व कमी करून त्यांना ‘नामधारी’ करण्याची खेळी असू शकते. अश्या घटना भारतीय राजकीय पक्षांमधून अनेकवेळा सराईतपणे घडल्याचे आपल्या समोर आहे. त्यामुळे पक्षचिन्हावर अधिकार सांगत चिन्ह गोठविण्यापर्यंत ना भाजपा खेळी खेळेल ना शिंदेगटाला यात स्वारस्य असावे. शेवटी आगामी निवडणुकीत मतदारांसमोर सगळ्यांनाच मतं मागायला जायचं आहे. मतदार दुखावतील अशी कोणतीही कृती करायला कुठल्याच राजकीय पक्षाची ‘थिंक टँक’ परवानगी देत नसते. वारसाहक्काने नेतृत्व हाती आलेले राजकीय दावपेचात दुबळे पडतात हे सत्यच आहे त्यामुळे या खेळात उद्धव ठाकरे हे दावपेचात दुबळे पडल्याचे दिसत आहे. याचाच फायदा घेवून त्यांना ‘नामधारी’ करण्यासाठीच आता राळ उठवली जाईल. कालपर्यंत सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेल्या उद्धव ठाकरे यांना नाकर्ते नेतृत्व म्हणून सिद्ध केले जाईल ही खेळी खेळल्या जावू शकेल. किंवा सध्या त्यांच्याभोवती असलेला गराडा तोडून मध्यस्थी करण्याची नवी खेळी केली जाईल. शेवटी जर या बंडामागे भाजपाचा हात असेल तर भाजपाला काय हवे आहे ? याचा विचार करणे महत्वाचे ठरेल. शिवसेनेकडे असलेल्या हिंदुत्वाच्या मतांना आपल्याकडे वळविण्यामध्ये भाजपाला ‘इंटरेस्ट’ असणे स्वाभाविक आहे. त्यासाठी त्यांच्या सोयीचे नेतृत्व उभे राहण्यासाठी त्यांनी बंडखोरांना पाठबळ देणे यात राजकीयदृष्ट्या गैर काहीच नाही. ठाकरे यांनी देखील सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करत भाजपाला २०१९ मध्ये तोंडावर पाडले होतेच ना ! आता न्यायालयीन लढाईतून यशस्वीपणे माघार नेमकी कधी घ्यायची हे उद्धव ठाकरे यांच्या खेळीवरच अवलंबून राहील. शेवटी पक्षाचे तुकडे झालेले कुणालाच राजकीयदृष्ट्या फायद्याचे ठरणारे नाही. मात्र या राजकीय वस्त्रहरणाने गावागावात, शहरातून कट्टा विधानसभेत नेत्यांचे चारित्र्य ढासळत चालले आहे हे मात्र नक्की….!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा