
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील लोकशाहीप्रमाण राजकारण अधिक परिपक्व होत चाललंय, असा डांगोरा गेल्या कित्येक वर्षांपासून पिटवला जात आहे. अनुभवसंपन्न असणे आणि शिक्षित-उच्चशिक्षित असणे हे दोन वेगवेगळे स्तर आहेत. यानुसार भारतीय लोकशाही ही निश्चितच अनुभवसंपन्न झाली आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. कारण ७५ वर्षांचा कालावधी हा थोडा तर नक्कीच नाही. मात्र लोकशाही शिक्षित-उच्चशिक्षित झाली आहे का ? हा प्रश्न उरतोच. खरंच लोकशाही नेमकी कितवी इयत्ता उत्तीर्ण असेल हो ? लोकशाही ही राजसत्ता चालविणारी एक आदर्श प्रणाली आहे, ती व्यक्ती नव्हे. हे जरी खरं असलं तरी ही प्रणाली निर्वाचित व्यक्तींचा अर्थात लोकांमधून निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा समूह चालवीत असतो. या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेवरच लोकशाहीची शैक्षणिक पात्रता ठरते. आजवर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची सरासरी शैक्षणिक पात्रता तपासली तर ती इयत्ता दहावी किंवा फारतर बारावीच्या आसपास गटांगळ्या खाताना दिसते. नाही म्हणायला सत्तेतील प्रमुख पदांवर एखाददुसरा अपवाद वगळता उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी दिसलेत हीच अशिक्षित लोकशाहीची बूज राखणारी बाजू आहे. आजकाल जे ‘सवंग’ राजकारण केले जाते यावरून तरी लोकशाही अनुभवसंपन्न असली तरी आशिक्षितच राहिली आहे असं म्हणता येईल. लोकशाहीने देखील या देशाला राजसत्ता चालविणाऱ्या तीन पिढ्या दिल्या आहेत, त्यामुळेच आता निवडून देताना मतदारराजा उमेदवाराची शैक्षणिक पात्रता तपासतोय. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सत्ताधीश देखील आपल्या वारसदारांना उच्चशिक्षित करताना दिसत आहे.

श्रीमंतीत अन् लाडाकोडात वाढलेली राजकारण्यांची पिलावळ फारच अपवादात्मक स्थितीत सर्वसामान्यांचा भरणा असलेल्या शाळांतून शिकताना (आपली बापजाद्याची पॉवर दाखवताना) दिसतात. सर्वसामान्यांसारखी भिकार स्वप्ने त्यांनी पाहू नयेत म्हणून त्यांना खास इंग्रजी माध्यमाच्या मशिनरी शाळेत भर्ती केल्या जाते. अश्या संस्थांना दरवर्षी डोनेशन, नियमात बसवून काही लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न पालकांकडून केला जात असल्याने अश्या शाळांमधील गुरुजनवर्ग पुढे या पिलावळींचे ‘राजकीय सल्लागार’ वगैरे पदावर बसून आपल्या निवृत्तीकाळाची ‘बेगमी’ करून ठेवतात. डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर व्हायचं, इंजिनिअरच्या मुलाने इंजिनिअर व्हायचं, वकिलांच्या मुलाने वकील व्हायचं अगदी तसंच पुढाऱ्याच्या मुलाने पुढं बापाची गादी चालवायची ही नवी उतरंड समाजमान्य झाली आहे. आयुष्यभर आपली ‘पालखी’ वाहणाऱ्या कार्यकर्त्याच्या ढुंगणावर लाथ घालून पुढारी आपला राजकीय वारसदार म्हणून आपल्याच दिवट्याला सत्तेच्या गादीवर लोळायची संधी देतो. त्यात आता उच्चशिक्षित चेहरा हवा या नव्या अपेक्षांमुळे पुढाऱ्यांनी आपल्या मुलांना विदेशात नावाजलेल्या विद्यापीठातून पैश्याच्या थैल्या रिकाम्या करीत उच्चशिक्षित केलेले असते. आता ही ऑक्सफर्ड रिटर्न मुले भारतात परत आल्यावर आपल्या घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग किती करतात ? ज्या विषयाचे शिक्षण घेतले आहे त्याच क्षेत्रात ते करिअर करताना दिसतात का ? भारतात इतर क्षेत्राचं माहीत नाही मात्र दोन अशी क्षेत्रं आहेत जिथे शिक्षण कुठल्याही विषयाचं घेतलेलं असो अथवा अर्धवट अवस्थेत सोडून दिलेलं असो याक्षेत्रातून प्रवेश हमखास मिळतो. अट फक्त एकच असते. ते वारसदार असायला हवेत. नेता आणि अभिनेता ही दोन क्षेत्रे ढेकणांसारखी वारसदारांनी बजबजून गेलेली फक्त भारतातच दिसतात.

आपल्या नेत्याचा मुलगा विदेशात शिक्षण घेतोय याचं कार्यकर्त्यांना आणि मतदारांना देखील आकर्षण असते. या ग्लॅमरचा टक्का मतांमध्ये रुपांतरीत व्हावा यासाठी या फॉरेनला गेलेल्या ‘लेकरांच्या’ सुट्टीला परत आल्यावर मतदारसंघातून ‘भेटयात्रा’ देखील आयोजित केल्या जातात. मतदारांनी आगामी नेतृत्व म्हणून लक्षात ठेवावे हाच त्यामागील हेतू असतो. पिढीदरपिढी सत्तेचे वारसदार मतदारांवर लादण्यासाठीच नेतेमंडळी आता आपल्या मुलांना विदेशी शिक्षण देण्यासाठी सरसावले आहेत की काय? बरं ! विदेशात उच्च शिक्षण घेवून आल्यानंतर वाजतगाजत राजकीय क्षेत्रातील पदार्पण सोहळा केला जातो. मतदारसंघाला ‘वारस’ मिळाल्याचा जल्लोष केला जातो. त्याची सुरुवात ‘नगरसेवकपद’, ‘पंचायत समिती सदस्य’ किंवा ‘थेट सरपंच’ पदापासून केली जाते. यासाठी विदेशातून शिक्षण घेवून आलेले दिवटे गल्लीबोळातील दादा, गुंड, मवाली, अर्धशिक्षित कार्यकर्त्यांसमोर आपली विद्वत्ता पाजळतात. आपला वारसा तेव्हढ्याच ताकदीने राजकारणात आपला ‘जम’ बसवणार याची खात्री झाल्यावर नेता मग देशसेवेने भारावलेले ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयो’ टाईप संबोधन करीत आपली निवृत्ती जाहीर करतात. मुळात बापाजाद्याची ‘खाज’ म्हणून उच्चशिक्षण पदरात पाडून घेणाऱ्या या पिलावळीमुळे लोकशाही आणि भारतीय राजकारण ‘शिक्षित’ होतंय का ? अजूनही आपले राजकारण, सत्तासंघर्ष आणि त्यासाठी वापरात येणारे डावपेचाचे ‘फंडे’ तेच ते पारंपारिक, सनातनी असेच आहेत. अजूनही जातीपातीच्या आणि गटबाजीच्या पलीकडे जावून विकासाचे राजकारण करणारे बोटावर मोजण्या एव्हढेच आहेत. मग या उच्चशिक्षित आणि विदेशी शिक्षण घेतलेल्या पिलावळीमुळे लोकशाही ‘शिक्षित’ होतेय का ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा