‘भगवा ते तिरंगा’….विरोधकांना चकमा देणारी मोदींची ‘राष्ट्रभक्ती’ची थेअरी..!

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात-अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध स्फूर्तिदायक घटना यांचे सतत स्मरण रहावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानापूर्वक संरक्षण करण्यासाठी दि. ११ ऑगस्ट २०२२ ते दि. १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत मोदी सरकारने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम संपूर्ण भारतभर राबविण्याची तयारी केली आहे. देशातील २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेशातून यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घरा-घरावर राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणून ‘तिरंगा ध्वज’ डौलाने फडकविण्याचा हा राष्ट्रभक्तीचा उपक्रम राबविण्याचा संकल्प तडीस नेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चकमा देणारी राष्ट्रभक्तीची थेअरी मांडली आहे. १३० कोटींच्या वर लोकसंख्या असलेल्या देशात बेघर आणि झोपडपट्टीत राहणारी लोकसंख्या वगळली तरी देशात किमान ७० ते ७५ कोटी घरे गृहीत धरली तरी एकाच वेळी ७० ते ७५ कोटी घरांवर ‘तिरंगा’ राष्ट्रध्वज फडकवणे हा देखील एक विश्वविक्रम होईल.

केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्या-राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, उद्योगविश्व यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करणे अपेक्षित आहे. याकरिता ‘तिरंगा ध्वज’ हा निशुल्क असणार नाही. नागरिकांनी तो स्वेच्छेने विकत घेण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यात येत आहे. नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन देण्याविषयी उत्पादकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्यातील जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांना आवश्यक असलेल्या ध्वजांची संख्या निश्चित करण्याचे काम प्रत्येक राज्यातून प्रशासकीय पातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांना ध्वजारोहण करण्यासाठी आदर्श आचारसंहितेमध्ये अधिक व्यापकता आणि सुलभता आणण्यात आली आहे. ज्यातून राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. देशभर प्रत्येक राज्यातून प्रशासकीय पातळीवर हा उपक्रम शेवटच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. महाराष्ट्रात देखील एकूण ३४ जिल्ह्यातून १ कोटी ४६ लाख ८ हजार ५३२ घरांवर राष्ट्रध्वज उभारणीचा संकल्प महाराष्ट्र शासनाने केला असून नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यसरकार आणि प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाली आहे. नागरिकांना सहजतेने आणि परवडणाऱ्या दरात राष्ट्रध्वज विकत घेण्यासाठी शासकीय पातळीवर आणि खासगी उत्पादक-विक्रेते राष्ट्रध्वज उपलब्ध करून देतील.

हे झालं जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या विश्व विक्रमी उपक्रमाविषयी…आता थोडेसे राजकारणाविषयी…. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि समविचारी पक्ष म्हंटलं की ‘भगवेकरण’ असं समीकरण रूढ झालेल्या भारतीय राजकीय पटलावर नरेंद्र मोदी सारखे नेतृत्व तिरंगा राष्ट्रध्वजाचे उदात्तीकरण जगावर ठसविण्यासाठी जेंव्हा स्वातंत्र्यदिनाचा औचित्यपूर्ण मुहूर्त साधते तेंव्हा मोदी विरोधकांना मूग गिळून गप्प बसण्याची वेळ येते. आरएसएसच्या मुख्यालयावर कधी तिरंगा फडकवला होता का ? असा प्रश्न विचारून आरएसएस आणि भाजपच्या राष्ट्रप्रेमावरच शंका घेणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना जनमानसात तिरंग्याविषयी राष्ट्रभावना जागृत करणारे उपक्रम इतक्या व्यापकतेने राबविल्याचे आता मोदी विरोधकांनाही आठवावे लागेल. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी शासकीय-निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि खासगी आस्थापनेवर ध्वजारोहण करण्याची परंपरा निर्माण करताना लोकशाही हे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य या संकल्पनेलाच झाकून टाकले गेले होते. नाही म्हणायला अश्या सोहळ्यातून दर्शक म्हणून सर्वसामान्यांचा सहभाग असायचा. त्याला स्वतंत्रपणे स्वतःच्या दारात राष्ट्रध्वज उभारणीला कधी प्रोत्साहन देणारा उपक्रम व्यापकतेने राबविल्याचे विरोधकांना देखील स्मरत नसावे. याउलट ध्वजारोहणाच्या अतिशय कडक आचारसंहितेमुळे सर्वसामान्य यापासून दूर असायचा. नजरचुकीनेही ध्वजारोहणावेळी काही विपरीत घडले, ध्वज नीट फडकला नाही, ध्वजाच्या दोरीची गाठ निसटली तरी देखील संबंधित कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्यात. एकीकडे गुढी पाडव्याला आपल्या घरावर गुढी उभारून संस्काराचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या देशबांधवांना मात्र राष्ट्रीय उत्सवात आपल्या दारात राष्ट्रध्वज उभारणी करण्याचे स्वप्न नियमांच्या बागुलबुवामुळे साकारताना अडथळे असायचे. ‘भगवेकरण’ करणारे म्हणून टीकेचा धनी बनलेल्या भाजप आणि आरएसएसने राष्ट्रध्वजाला दिलेल्या या महत्वाने विरोधकांची तोंडे बंद केली आहेत. तिरंग्याचा एक रंग करून भगवा राष्ट्रध्वज करतील, अशी भीती दाखवून निवडणुकीतून आरोपांची राळ उडविणाऱ्या विरोधकांचा हा मुद्दा तर नरेंद्र मोदी यांनी कायमचाच निकाली काढला आहे. निदान आता राष्ट्रध्वजावरून तरी भाजप-आरएसएसवर तोंडसुख घेण्याचा प्रकार विरोधकांकडून केला जाणार नाही. काहीही असो….चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून अयोध्देला परतलेल्या प्रभू रामचंद्रांचे स्वागत म्हणून ‘गुढी’ उभारणाऱ्या भारतीय संस्कारात आता सर्वसामान्यांना आपल्या दारात राष्ट्रध्वजही अभिमानाने उभारता येणार आहे. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी कदाचित हेच आश्वासक पाऊल असावे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Comments (

5

)

 1. kekaderajesh

  It Is very Great and Historical Moment for all of Us….

  Liked by 1 person

 2. Rajiv Shete

  सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही उभा करणार का तिरंगा तुमच्या घरावर? उत्तर पाठवा, घराच्या फोटो सकट जय हिंद जय महाराष्ट्र.

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   होय, नक्कीच.

   Like

 3. aaliya sayyad

  Nice 👍

  Liked by 1 person

  1. मुकुंद हिंगणे

   धन्यवाद आलिया🙏🙏🙏

   Like

%d bloggers like this: