

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर गेल्या ६० वर्षांपासून मजबूत पकड असणाऱ्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याचा दबदबा सर्वश्रुत आहे. सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील आणि कै. रत्नप्रभादेवी यांच्या संस्कारात वाढलेल्या पुढच्या पिढीने सोलापूर जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आपली विकासात्मक प्रतिमा निर्माण केली. सहकार क्षेत्र आणि राजकारणात अगदी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या धर्मपत्नी सौ. नंदिनीदेवी (वहिनीसाहेब) यांनी मात्र सत्ता-संपत्ती यामध्ये न रमता माळरानावरची शेती फुलविण्याचे स्वप्न बघितले. चक्क वीस वर्षे शेतात राबून सगळं माळरान हिरवेगार तर केलेच, याबरोबरच शेतीतील केळीच्या उत्पादनाला परदेशी बाजारपेठ मिळवीत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एक नवा ‘आदर्श’ निर्माण केला.

२००० साली अकलूजपासून जवळच असलेल्या निमगाव (मगर) इथल्या माळरानावरची चाळीस एकर जमीन सौ. नंदिनीदेवी उर्फ वहिनीसाहेब यांनी विकत घेतली. त्यावेळी त्याठिकाणी यायला-जायला अगदी कच्चा रस्ता देखील नव्हता. तिथून साडेतीन किलोमीटर अंतरावर नीरा नदीचा उजवा कॅनॉल आहे. सुरुवातीची भौगोलिक स्थिती म्हणजे जिकडे नजर जाईल तिकडे माळरान, खुरटी काटेरी झुडपे….. दूरपर्यंत एकही सावलीसाठी झाड नाही की एखादं घरही नाही. कुसळ (गवत) भरलेल्या माळरानाला शेतीसाठी उपयुक्त बनविण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा एक बोअर घेतली. शेतात कामासाठी येणाऱ्या शेतमजुरांना प्यायला पाण्याची सोय झाली. नीरा उजव्या कॅनॉलच्या लगत विहीर खोदण्यासाठी थोडे जमीन क्षेत्र घेतले. तिथे विहीर खोदून लिफ्ट इरिगेशन द्वारे साडेतीन किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन मधून शेतीत पाणी आणले. या प्रयत्नामुळे सर्व क्षेत्र ओलिताखाली आले. सुरुवातीला आजूबाजूच्या खेडेगावातील शेतकरी वहिनीसाहेबांच्या या धडपडीला हसत होते. मात्र शेतात पाणी खेळू लागल्यावर सर्व शेतकऱ्यांनी सोसायटी, जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेत लिफ्ट इरिगेशन करीत आपल्या शेती बागायती केल्या. आता लोकांनी ठिकठिकाणी आपआपल्या शेतात बंगले बांधले आहेत. निर्जन-निर्मनुष्य असलेले माळरान हिरवेगार आणि वस्त्यांनी गजबजलेले दिसत आहे.




सर्व सुखं पायाशी लोळण घेत असताना पती विजयसिंह हे राज्याचे कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री असतानाही सौ. नंदिनीदेवी कधी मुंबईत रमल्या नाहीत की मंत्र्याची पत्नी म्हणून प्रसिद्धी माध्यमांपुढे आल्या नाहीत. केवळ मातीत पाय घट्ट रोवून शेती फुलविण्याचे व्रत त्यांनी जोपासले. त्यांच्या या श्रमाचा आदर विजयसिंह देखील करतात. माझी पत्नी शेतकरी आहे हे अभिमानाने सांगणारा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला आहे. सौ. नंदिनीदेवी यांच्या कृषिसेवेची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २००६ साली त्यांना मानाच्या ‘कृषिभूषण’ पुरस्काराने देखील गौरविले आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
प्रतिक्रिया व्यक्त करा